चुनरी संभाल गोरी....
हा लेख खास ओढण्यांसाठी.. गेले दीड दशक नामशेष झालेल्या माझ्या प्रियसखी 'ओढणी'साठी! अचानक लुप्त झालेली ही मैत्रीण आता पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात अवतीर्ण होते आहे हे निमित्त साधून काही जुन्या आठवणीना उजाळा म्हणून घातलेला हा लेखनचा घाट! ओढणीचा माझ्या आयुष्यात फॉर्मल प्रवेश अर्थात मोठ्या बहिणींमुळे झाला. मला लहानपणापासून ह्या ओढण्यांच खूप अप्रूप होतं. वेगवेगळ्या रंगातल्या, कधी कलाकुसर केलेल्या ओढण्या लपेटलेल्या सगळ्या मोठ्या बहिणी म्हणजे माझ्यासाठी हिरोईन पेक्षा कमी नव्हत्या. कधी एकदा मोठी होऊन अश्या मस्त झोकदार ओढण्या घेऊन फिरेन असं झालं होतं मला. मग कधीतरी ताईच्या ड्रेसवरची ओढणी फ्रॉक वर लावून गिरक्या घेऊन बघणे, कधी डोक्यावरून घेऊन आरश्यासमोर मिरवणे असं करता करता कधीतरी माझ्यासाठी पहिला ओढणीवाला ड्रेस शिवला आणि काय विचारता... चांगल्या अर्ध्या डझन सेफ्टी पिना इकडे तिकडे खोचून ऐटीत माझं पार्सल घराबाहेर पडलं आणि त्या दिवसापासून ओढणी माझी घट्ट आणि जवळची मैत्रीण झाली. ऐशी-नव्वद च्या दशकात बहुतेकींची होती तशीच..बालपणातून तारुण्यात प्रवेश करताना मिळालेली एक जिवलग सखी! एखाद्या वस्त्राने...