अश्विन शुद्ध पक्षी...
स्त्रीत्वाचा, आदीशक्तीचा सगळ्यात मनोहारी सोहळा येऊ घातलाय..नेहमीचं विश्व असतं, तर ह्या क्षणी सगळीकडे झगमगाट असता, टाळ्यांच्या गजरात, शंखध्वनी करत तिचं आवाहन झालं असतं, रंगीबेरंगी रेशमी वस्त्र परिधान करून तिच्या कौतुकात रात्र रात्र गरबा करून जागवली असती. पूजा अर्चना, आरत्यानी आसमंत दुमदुमला असता. पण जग बदललंय. ह्यावर्षी देवीदेवतांचे उत्सव सरकारी परवान्यांचे धार्जिणे झाले आहेत. मंदिरांची किवाडे अजून उघडली नाहीत. मूर्त्यांचे, दर्शनाचे नियम आखल्या गेले आहेत. जीव उधळून सण साजरे करणारे लोक स्वतःचा जीव जपायची धडपड करतायत. खरतर ह्या विश्वव्यापी शक्तीबद्दल बोलायची माझी मुळीच पात्रता नाही. तरीही आज पृथ्वीवर अवतरलेल्या पण या वर्षी नजरेस न पडणाऱ्या जगन्मातेबद्दल आणि तिच्या मी अनुभवलेल्या पर्वाबद्दल लिहिण्याचा हा अत्यन्त तोकडा प्रयत्न! मला कळायला लागलं तेव्हापासून माहेरी साजरे होत असलेले शारदीय नवरात्र मला आठवते आहे. नवरात्राचा आणि माझा संबंध आम्ही मुंबई सोडून नागपूरला गेल्यावर आला. त्या वर्षी पहिल्यांदा घरचं नवरात्र पाहिलं तेव्हा मला देवीची भयंकर धास्ती होती. देवी बसते म्हणजे कुठे बसते, कशी दिसते...