अश्विन शुद्ध पक्षी...
स्त्रीत्वाचा, आदीशक्तीचा सगळ्यात मनोहारी सोहळा येऊ घातलाय..नेहमीचं विश्व असतं, तर ह्या क्षणी सगळीकडे झगमगाट असता, टाळ्यांच्या गजरात, शंखध्वनी करत तिचं आवाहन झालं असतं, रंगीबेरंगी रेशमी वस्त्र परिधान करून तिच्या कौतुकात रात्र रात्र गरबा करून जागवली असती. पूजा अर्चना, आरत्यानी आसमंत दुमदुमला असता. पण जग बदललंय. ह्यावर्षी देवीदेवतांचे उत्सव सरकारी परवान्यांचे धार्जिणे झाले आहेत. मंदिरांची किवाडे अजून उघडली नाहीत. मूर्त्यांचे, दर्शनाचे नियम आखल्या गेले आहेत. जीव उधळून सण साजरे करणारे लोक स्वतःचा जीव जपायची धडपड करतायत. खरतर ह्या विश्वव्यापी शक्तीबद्दल बोलायची माझी मुळीच पात्रता नाही. तरीही आज पृथ्वीवर अवतरलेल्या पण या वर्षी नजरेस न पडणाऱ्या जगन्मातेबद्दल आणि तिच्या मी अनुभवलेल्या पर्वाबद्दल लिहिण्याचा हा अत्यन्त तोकडा प्रयत्न!
मला कळायला लागलं तेव्हापासून माहेरी साजरे होत असलेले शारदीय नवरात्र मला आठवते आहे. नवरात्राचा आणि माझा संबंध आम्ही मुंबई सोडून नागपूरला गेल्यावर आला. त्या वर्षी पहिल्यांदा घरचं नवरात्र पाहिलं तेव्हा मला देवीची भयंकर धास्ती होती. देवी बसते म्हणजे कुठे बसते, कशी दिसते हे कळायच्या पलीकडचे दिवस होते. तिची यथासांग पूजा अर्चना करण्याचे अधिकार आजोबा आणि काकांकडे राखीव होते. त्या दोघांचा थोडा धाक असल्याने मी कशीबशी घाबरत आरती झाल्यावर अंदाजाने मंत्रपुष्पांजली अर्पण करून मुकाट दूर पळत असे. पहिलं वर्ष असच गेलं. शेवटी एक दिवस आईला घाबरत विचारलं "आई देवी तुम्हाला कशी दिसते? नक्की कुठे बसते देवघरात? आणि मला कशी दिसत नाही?" मग त्यादिवशी आईबाबांनी मला घटस्थापना म्हणजे काय ते सांगितले. भाद्रपद पौर्णिमेच्या आधी आणि गणपती उठले की घरी सगळे तयारीला लागत. नदीकाठची माती आणून धुबून ठेवायची, दोन काड्या बारीक तासून दोन्हीकडून टोकदार करून घेतल्या जायच्या. मग एक नारळ आणून त्याला नीट तासून गुळगुळीत करून ठेवल्या जायचं. घटस्थापनेला घटावर विड्याची पाने लावून त्यावर हा नारळ बसवला जायचा. नारळाच्या शेंडीतून त्या तासलेल्या दोन काड्या काटकोनात खोवल्या जायच्या. आडव्या काडीला दोन आणि उभ्या काडीच्या वर एक अशी झेंडूची फुले टोचली जायची. नारळाचे डोळे म्हणजे जणू देवीचे डोळे! त्या नारळाला वस्त्र आणि बाकी शृंगार चढवले जायचे. चौरंगावर माती पसरून तीत गहू पेरून त्या मातीत ह्या घटाची स्थापना होत असे. मग विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जायची. पुढील नऊ दिवस देवीच्या उत्सवात साजरे होत असत.नऊ दिवस घरी कुमारिका पूजल्या जात. रोज सकाळी आमची पूजा झाल्याशिवाय आणि आम्ही पहिला घास घेतल्याशिवाय दुसरे कोणी जेऊ शकत नसे. आजी नाहीतर काकी रोज ओवळायच्या, भोपळ्याचे घारगे वाण म्हणून मिळायचे. त्यावेळी आम्ही ते घारगे तोंडं वेडीवाकडी करत खायचो, आज त्या घारग्यांच्या आठवणींनी मन कासावीस होतं. आजी हळदकुंकू लावून माझ्या भांगेत शेंदूर भरायची. मी चौथी पाचवीत असेन. त्या शेंदूरची मला भयंकर लाज वाटायची. पण आजीसमोर तिच्या धाकामुळे बोलायची टाप नव्हती. मग सकाळी जेवून शाळेला निघाले की मी रस्त्यात सायकल थांबवून तो शेंदूर पुसायचा आटोकाट प्रयत्न करायचे. तरी शाळेत एखादी भवानी भेटायचीच. "आ बाई, हिने बघ शेंदूर भरलाय" असं एखादीने पकडलं की बाकी सगळ्या जणी चिडवून बेजार करायच्या. ह्याउलट काकी ओवळायची तेव्हा सुटसुटीत होतं. तिला हक्काने सांगता यायचं, ती पण उगीच बारीक काडी घेऊन शेंदूर लावल्यासारखं करायची. असं नऊ दिवस चालायचं. नवरात्रीचे नऊ दिवस भाजकं अन्न खात असू. म्हणून आधीपासून डाळ तांदूळ भाजून ठेवत असत. आणि भात शिजवताना त्यात चिमूटभर हळद घालून शिजवल्या जात असे. सकाळ संध्याकाळी होणाऱ्या आरतीने, घर गर्जून जात असे. नवरात्रीच्या निमित्ताने परगावी असणाऱ्या चुलत आते भावंडांच्या भेटी व्हायच्या.
नवरात्रीला खरा रंग मात्र पंचमी पासून चढत असे. ललितापंचमीला संध्याकाळी ललितापूजन असायचे. नैवेद्याला ४८ कानवले आणि ४८ वडे ह्यांचा नैवेद्य. हे खास कायस्थी खाज्याचे कानवले, साधायला अतिशय कठीण! आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला घरातील गृहिणी मिळून हे करून ठेवत असत. सोबतीला वालाची खिचडी!
मात्र नवरात्र उत्सवातील सगळ्यात मानाचा मुकुटमणी म्हणजे नऊ सवाष्णींसाठी घातलेलं हळदीकुंकू! खास कायस्थ प्रभू घरांमध्ये प्रचलित असलेली ही रीत. ह्या हळदीकुंकवाला 'दुधाच्या सवाष्णी' असं म्हणतात. नऊ सवाष्णी आणि कुमारिका ह्यांची विधिवत षोडशोपचारे पूजा करणे हा ह्या दिवसाचा दंडक. ह्या हळदीकुंकवासाठी आधीपासून रीतसर आमंत्रणे जात. 'त्या दिवशी उपास करा' ही लाडिक आठवण करून दिली जायची. पंचमी नंतर आणि नवमीच्या आधी सकाळी साधारण १० वाजता हा समारंभ होत असे. त्या दिवशी घरातील पुरुष मंडळींची सकाळी ८ वाजता घराबाहेर रवानगी व्हायची. सकाळी जवळपास 7/8 लिटर दूध आटवून त्यात केशर, साखर, वेलची, सुकामेवा घालून तयारी केली जायची. ठेवणीतली चांदीची तबके, चांदीचे पेले बाहेर निघत, घासून लक्ख करून सजवून ठेवले जात. देवखोलीत नाहीतर दुसऱ्या मोठ्या खोलीत, झाडलोट करून खाली पाट आसने घातली जायची. असनांसमोर रांगोळी. सगळ्या जणी जमल्याशिवाय समारंभ सुरू होत नसे. आम्ही घरच्या असल्याने अर्थात कुमारिका म्हणून काय किंवा पुढे सवाष्णी म्हणून काय, पाहिलं स्थान आमचं!
आजी, आई, काकी मिळून हे हळदीकुंकू द्यायच्या. दुधपाण्याने पाय अलगद पुसून स्वागत होत असे. मग मनगटावर चंदन लावून त्यावर शिंपल्याने रेषा आखल्या जायच्या. त्याच्यावर लहानसा काळा बुक्क्याचा टिळा. केसाला पुसटसं सुवासिक तेल लावून ते लहान कंगव्याने अलगद विंचरल्यासारखे करायचे. हळद, कुंकू, शेंदूर, अक्षता ह्यांनी पूजा व्हायची. आजी साजूक तुपावर काजळ पडायची, ते काजळ नाजूक काडीने लावायची. सरते शेवटी अत्तर, गुलाबपाणी आणि गजरे. त्यावेळी शेवंतीच्या वेण्या मिळायच्या. आपल्या हक्काची चमकणारी वेणी बघून मला खूप अप्रूप वाटायचं. सवाष्णींच सजवलेलं रूप निरखायला लहान नक्षीकाम केलेला आरसा फिरवला जात असे. हे करून झालं की समोर लहान ताटल्या ठेवल्या जायच्या. आणि मग खिरापतीला सुरुवात व्हायची. पाच फळे, सुका मेवा, पेढे, बत्तासे, साखरफुटाणे ह्यांची लयलूट व्हायची. मग काकी आतून दुधाने भरलेले चांदीचे पेले घेऊन यायची. आग्रह करकरून दोन तीनदा ते परत वाढलं जायचं. सरते शेवटी ओटी भरण्याचा कार्यक्रम व्हायचा. आजी प्रत्येकीसमोर कापूर आरती घेऊन यायची आणि लाह्यांनी ओटी भरायची. त्या आरतीच्या प्रकाशात दिसणारा आजीचा तेजस्वी चेहरा मी उभ्या जन्मात कधी विसरणार नाही. तिच्या नेहमीच्या साध्या चेहऱ्यावर त्या दिवशी एक वेगळंच धीरगंभीर वलय चढायचं. सगळ्या सवाष्णींच्या पाया पडून झालं की ह्या मनोवेधक रम्य सोहोळ्याची सांगता होत असे. संपूर्ण समारंभ अतिशय शांततेत, जास्त न बोलता पार पडायचा. आलेल्या सवाष्णी तृप्त मनाने, भारावून परतत असत. आणि आम्ही पोरी आपापली ताटली घेऊन दिलेला खाऊ खायला अंगणात धूम ठोकत असू.
पुढे अष्टमीचा उपास, नवमीचं पुरण वड्याचं पारणे झाले की नवरात्रीची सांगता होत असे. असा हा नऊ दिवस भक्तिरसात आकंठ बुडवून काढणारा सण. आजच्या जगात हे सगळं अतर्क्य वाटेल, पण त्यावेळी ही आमची जीवनपद्ध्ती होती. काही अंशी कठीण असणाऱ्या ह्या व्रताने आपसूक शिस्तीची, नियमनाची भावना आम्हा सर्वांच्या अंगात भिनवली. मला आजही इतक्या वर्षांनी नवरात्रीची आरती न चुकता म्हणता येते इतकी ही आठवण मनात घट्ट रुजली आहे. इतकी वर्षे उलटून गेली तरी त्या दिवसांची लगबग, चैतन्य अजूनही जसेच्या तसे आठवते. देवीपुढे तेवणाऱ्या अखंडज्योति सारखी नवरात्रीची ही सुगंधी आठवण मनाला कायम सोबत करेल.
उदे ग आई जगदंबे!!! ,🙏🙏🙏




Khupach chaan lihilaay dear shallu..asa vathoy mich hey sagla anubhavala
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाफारच छान लिहिलं आहेस...as always. 🙏
उत्तर द्याहटवाखूपच च्छान.
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर वर्णन केलं.. किशोर दादा
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर वर्णन केलं.. किशोर दादा
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर वर्णन केलं.. किशोर दादा
उत्तर द्याहटवाThank you Kishor dada! 🙏🙏
हटवाखूप सूंदर लिहिलं आहे shlu जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला!!
उत्तर द्याहटवा