अक्षरांशी जडले नाते!!
गेल्या दोन महिन्यांत हो नाही करता करता शेवटी सोशल मीडिया ला राम राम ठोकला. सतत चे नको असलेले अपडेट्स, आत्यंतिक राजकीय आणि धार्मिक मतांमुळे दिसणारी आपल्याच मित्रपरिवाराची भेसूर स्वरूपं आणि अर्थशून्य तर्हेने घालवलेला वेळ ह्या सगळ्यांपासून फारकत घेतली. थोडा वेळ आणि प्रयत्न लागले पण जमलं! भरपूर पुस्तकं वाचायची हे ठरवून परत अक्षरांकडे वळले. वाचन तसं सुरू होतंच पण ह्या फेसबुक ट्विटर च्या कोलाहलात ते आतपर्यंत पोचत नव्हतं.
सुरुवातीला त्रासच झाला. सर्वसुखसोयींनी सुसज्ज असलेल्या शहरातल्या नवीन घरातून गावातल्या जुन्या वाड्यात गेल्यावर कसं वाटेल, तसं काहीसं. इथे आता फक्त मी आणि ही अक्षरे..मनात आलं तर पटकन ऐकायला एखादं गाणं नव्हतं की वाटलं तर एखादा मेसेज टाकून गप्पा मारायला कोणी मित्र मैत्रिण नव्हते. काय करू या अक्षरांचं?? पण लहानपणापासून ह्या अक्षरांशी असलेल्या सलगीवर विश्वास ठेवला आणि परत एकदा वाचन सुरू केलं.
मला आठवतंय तेव्हापासून मी वाचायचे. नुसतं पुस्तक वाचायचे असं म्हणणार नाही कारण घरी येणारा प्रत्येक कागद माझ्या डोळ्यांखालून गेलाच पाहिजे हा माझा दंडक होता. वाण सामान बांधून आलेले चुरगळलेले कागद मी नीट सोडवून वाचायचे. कधीतरी काही चांगलं दिसलं की पलंगाखाली घालून तो कागद सरळ करायला ठेवून द्यायचे. मी पहिलीत असतानाची गोष्ट असेल. मुंबईला असताना बाबांचे मामा घरी आले होते. मी ताईच्या पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात डोकं घालून बसले होते. 'काय करतेस बाळ?' आजोबांनी विचारलं, 'पुस्तक वाचतेय' मी उत्तर दिलं. त्यांना गंमत वाटली, जेमतेम अक्षरओळख झालेली ही पाहिलीतली मुलगी पाचवीच पुस्तक कशी वाचणार? त्यांनी म्हटलं, 'मला पण वाचून दाखवशील का?' मी हो म्हणून धडाधड वाचायला सुरुवात केली..आजोबांनी खुश होऊन एक रुपया बक्षीस दिला. मी फार हुशार होते अशातला भाग नाही, पण अक्षरं माझ्याशी खूप लवकर बोलायला लागली होती. गंमत म्हणजे माझ्या मनात प्रत्येक शब्दाला एक रंग होता/आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण 'शलाका' हा शब्द माझ्यासाठी निळा आणि हिरव्याच्या मध्ये कुठल्यातरी रंगाचा आहे. 'बाबा' हा शब्द पिवळा, आई शब्द लाल आणि पांढरा मिक्स, ताई हा रुपेरी!
हळूहळू हे वाचनाचं वेड वाढत गेलं. प्रत्येक परीक्षा आटोपली की ' गो पू' आणायला चला हा माझा बाबांकडे हट्ट असायचा. नागपुरात असताना विदर्भ बुक डेपो आणि आशा बुक डेपो ही दोन आवडीची दुकाने! नंतर त्या विदर्भ वाल्या काकांनी आपल्या भावाला दुकानातून काढलं आणि सगळी इस्टेट हडपली म्हणून त्या भावाला आशा बुक डेपो नावाच लहान दुकान काढावं लागलं असं मैत्रिणीने सांगितल्यावर मात्र मी विदर्भ बुक डेपो वर बहिष्कार टाकला. का कोण जाणे पण शेवटपर्यंत नंतर मी तिकडे फिरकले नाही. तिसरी चौथीत असे पर्यंत 'जादूची छत्री आणि इतर गोष्टी, जादूचे घड्याळ' ह्या पुस्तकांवर भागलं. जोडीला घरी किशोर चे अंक यायचे. पाचवीत असताना माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या वडीलांमुळे मात्र पुस्तकाच्या ज्ञानात खूप भर पडली. फडणवीस काकांकडे एक मोठं कपाट भरून पुस्तक होती आणि माझी आवड बघून त्यांनी ते कपाट माझ्यासाठी उघडं करून ठेवलं होतं. समग्र पु लं मी काकांमुळेच वाचले. माझ्या वाढदिवसाला मुद्दाम बाहेर जाऊन काका पुस्तक घेऊन येत, भेट म्हणून. "Adventures of Tom Sawyer, Prisoner of Zenda, The Treasure Island, Papillon' ही सगळी पुस्तकं मला काकांमुळे मिळाली. ही काही वर्ष फास्टर फेणे, गोट्या मंडळींबरोबर काढली. झालंच तर लक्ष्मीबाई टिळकांचं 'स्मृतिचित्र', चि वि जोशी आणि त्यांचा चिमणराव आणि गुंड्याभाऊ जोडीला होतेच की!
योग्य वयात योग्य वाचनाने काय होतं ते मी स्वतः अनुभवलंय. एका मैत्रिणीच्या शेजारी राहणाऱ्या एक काकू आर्टस् कॉलेजच्या लिब्ररीअन होत्या. मला वाचायला आवडतं हे कळल्यावर त्यांनी मैत्रिणीकरवी पुस्तकं पाठवायला सुरुवात केली. लुईसा मे अल्कोट च नामांकित little women, आम्ही त्याचा शांताबाई शेळक्यांनी केलेला 'चौघीजणी' हा अनुवाद त्यांच्यामुळे वाचला. वीणा गवाणकरांचं 'एक होता कार्व्हर', चार्ली चापलीनवरील 'हसरे दुःख' ह्या त्यांनी पाठवलेल्या पुस्तकांनी माझा शालेय जीवनकाल व्यापला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून कार्यरत असणारे पालक, शिक्षक आमच्या पिढीला भेटले हे नशीबच आहे. शाळेत मराठी शिकवणाऱ्या भांडारकर मॅडम म्हणजे मराठी भाषेच्या तज्ञा! पाठयपुस्तकातले धडे आणि कविता ह्यांचं रसग्रहण मॅडमच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. शिकवताना त्या कुठल्या निराळ्याच दुनियेत जाऊन पोचायच्या आणि बोलत राहायच्या. त्यातले जमतील तितके शब्द वेचून घेत मी वह्याच्या वह्या भरल्या आहेत. एका कल्पनेचे इतके पदर असू शकतात ही जाण त्यांच्यामुळे मिळाली.
शुद्धलेखनावर माझा लहानपणापासून भर होता. त्याला कारण देखील मुंबई आणि नागपूरच्या शाळेतून शिक्षकानी घेतलेले परिश्रम. शुद्धलेखनाच्या चुका माझ्या डोळ्यात तांदळातल्या खड्यांसारख्या टोचतात. अक्षरांना चुकीची अंगडी टोपडी घातलेली बघितली की आजही जीव कासावीस होतो. अलीकडे एका बहिणीला तिचं पुस्तक तपासून द्यायला मदत केली. सवयीप्रमाणे एक एक चूक नजरेत खुपायला लागली. 'नुसती धावती नजर फिरव मी दोन तीनदा तपासलय' हे सांगितलेलं असून मी कामाला लागले. सगळ्या अक्षरांची विस्कटलेली वस्त्र सारखी केली. नंतर तिचं उत्तर आलं, 'मनापासून धन्यवाद. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेतून सुटल्या. तू कसं केलंस?' माझं नातं आहे ह्या अक्षरांशी आणि त्यामुळे तिथे काही उणे-अधिक चालत नाही असं म्हटलं असतं तर तिला कळलं असतं का? मी ते नुसतंच हसण्यावारी नेलं.
तर एकीकडे माझं वाचनाचं वेड बघून आई काळजीत पडली. तिने बाबांच्या मागे धोशा लावला की जरा हिला समजावा. हिला फारश्या मैत्रिणी नाहीत, कोणाशी फार बोलत नाही. अक्खा दिवस कोपऱ्यात वाचत बसते. मग बाबांनी तत्परतेने बाहेर जाऊन माझ्यासाठी दोन पुस्तके (!!) आणली. 'मित्र कसे मिळवावे आणि संभाषणकला' डेल कार्नेई ची भाषांतरीत पुस्तकं! My first self help books..मी ती पण भराभर वाचून काढली. आईने कंटाळून दोघांपुढे हात टेकले. मी डोळ्यांवर एवढा ताण देते तर मला चष्मा लागेल ही आजीला काळजी, म्हणून ती पण मागे असायची. पुस्तक दूर धर, डोळ्यात जीवदया नेत्रप्रभा घाल अश्या सूचना सतत सुरू असायच्या. सरते शेवटी मला एकदाचा चांगला जाड भिंगाचा चष्मा लागला आणि आजीने माझा नाद सोडला.
आईच्या आईची म्हणजे सायनच्या आजीची गोष्टच निराळी! आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे मुंबई ला जायचो. तिच्या घराजवळ एक लहानशी लायब्ररी होती. आम्ही येणार म्हटलं की आजी नाव नोंदवून ठेवायची. मग आवर्जून मला बोट धरून तिकडे पुस्तक निवडायला घेऊन जाई. लहान दुकानातली लहान लायब्ररी. तिकडे मुंबईचा टिपिकल वास यायचा. सुकवलेली मासळी, भाजलेली मशेरी, देवपुढची अगरबत्ती आणि तव्यावर टाकलेल्या तेलपोळीचा संमिश्र वास. पुस्तकांमध्ये खूप वैविध्य नव्हतं पण माझी वाचनाची सवय अबाधित राहावी म्हणून आजीने घेतलेले ते प्रामाणिक प्रयत्न होते! दिसेल त्याच्यासमोर आजी कौतुक करायची. आमची नात खूप वाचन करते अहो..मोठी मोठी पुस्तक 2/2 दिवसात संपवते असं तिने सांगितलं की लोक कौतुक करायचे. शाबासकी द्यायचे. मला प्रोत्साहन देण्याचा तो भाग होता..बाबापण पट्टीचे वाचक होते. कित्येक वर्षे ब्रिटिश लायब्ररी चे सदस्य होते. पर्ल बक च 'द गुड अर्थ,' लिओन युरिस च 'exodus' ही त्यांच्यामुळे वाचलेली पुस्तकं..दहावी ते बारावी ह्या वयात बहुतेक सर्वजण त्यावेळी ऐतिहासिक पौराणिक कादंबऱ्या वाचत असत. त्याप्रमाणे मी पण युगंधर, मृत्युंजय, श्रीमान योगी, छावा, स्वामी, राधेय ही पुस्तकं वाचून काढली. अभागी कर्णासाठी अश्रू ढाळले आणि श्रीकृष्णाच्या प्रेमात पडले..शिवराय तेंव्हापासून स्फूर्तिस्थानी आहेत.
बारावीच्या सुट्टीत मावशीकडे पुण्याला गेले आणि घराजवळच 'रसिक वाचनालय' बघून हरखले. 'गांधीहत्या आणि मी' हे जड आणि सुन्न करायला लावणारे पुस्तक तिथे वाचले. मावसबहीणीमुळे इंग्लिश पुस्तकांच्या दुनियेत प्रवेश झाला आणि मग एकापाठोपाठ एक fiction प्रकारातील वाचनाला सुरुवात झाली. Sidney Sheldon, Irving Wallace, Frederick Forsythe, Robin cook, John Grisham ही मंडळी आता मुक्कामी आली. पैकी रॉबिन कूक अत्यंत आवडीचा, त्याची मेडिकल mystry ची पुस्तक किती वेळ वाचली तरी मन भरत नसे. सिडने शेल्डन चं वैशिष्ट्य असं की त्याचं पुस्तक तुम्ही जसेच्या तसे उचलून चित्रपट बनवू शकाल. पुस्तक म्हणण्यापेक्षा पटकथा म्हणणे जास्त सोयीचे आहे. वेगवान कथानक, केंद्रभागी असलेली बुद्धिमान स्त्री आणि कथेला मिळणारी धक्कादायक वळणे..एका दुर्गम घाटातून भरधाव गाडी हाकल्याचा अनुभव देतात. शेलडन पण आवडीचा.
पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र जरा गम्मत झाली. एका पुस्तकामुळे मी चक्क थोडी लबाडी केली. झालं असं की एका मैत्रिणीकडे 'Gone With The Wind' पाहिलं. पुस्तकाबद्दल ऐकलं होतं म्हणून तिला मागितलं. चांगलं जाडजूड हजारांवर पानं असलेलं पुस्तक! अमेरिकन सिविल वॉर च्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेलं अजरामर पुस्तक आहे हे. अपरिचित संस्कृती, अपरिचित प्रदेश आणि बोली भाषा असूनही मी वाचायला बसले. १० पाने वाचू अस ठरवून वाचायला लागले आणि ५०० पाने पूर्ण झाल्यावर उठले. ज्यावेळी अक्षरं समजेनाशी झाली तेव्हा थांबले. अनुभव शब्दात पकडणे कठीण आहे, पण त्या दिवसापासून माझी पुस्तकाची परिभाषा बदलली. जिवंत, चालत्याबोलत्या, चुका करणाऱ्या, त्यातून सावरणाऱ्या धाडसी लोकांची ही कथा. जितकी सशक्त कागदावर आहे तितकीच सशाक्तपणे पडदयावर साकार झाली आहे. 'As god is my witness, I will never be hungry again.' अशी कडाडती भीष्मप्रतिज्ञा घेणारी Scarlett O'Hara, पडद्यावर बघतानाही अंगावर तसाच काटा आणते. दोन अहंकारी व्यक्तींची निव्वळ अहंकारापोटी होणारी ताटातूट आणि 'Frankly, my dear, I don't give a damn!' ह्या वळणावर जेव्हा ते कथानक थांबतं तेव्हाची अपूर्णता मनाला प्रचंड हुरहूर लावून जाते.
तर ह्या पुस्तकाच्या प्रेमापोटी ते परत करायला लागू नये म्हणून मी चक्क मैत्रिणीला ते माझ्याकडून हरवल असं सांगितलं! आणि घरी लपवून ठेवलं. थोडक्यात ह्या पुस्तकामुळे माझ्या हातून पाहिलं आणि कदाचित शेवटचं चौर्यकर्म झालं. चूक की बरोबर ते सांगता येणार नाही पण म्हणतात ना 'everything is fair in love and war' आणि मी तर पुस्तकाच्या प्रेमात पडले होते!
माझं अक्षरांशी जडलेलं नातं एका उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. ऍगथा ख्रिस्ती! देवाने जर कधी मला टाइम मशीन मध्ये बसवून मागे नेली, तर मी ऍगथाच्या डोक्यात जाऊन बसेन आणि तिचा मेंदू कसा काम करतो ते कोडं सोडवायचा प्रयत्न करेन. ऍगथाने इतकी प्रचंड सुंदर पुस्तक लिहिलीत, मोठमोठी रहस्य उलगडली, पण हे कसं केलं हे तिने जगाला घातलेलं आणि अजून न सुटलेलं रहस्य आहे. तिची कथेवरची, लेखनशैलीवरील पकड अनुभवणे म्हणजे निखळ आनंद आहे. स्वतःवर विश्वास ठेवून पुस्तक वाचायला सुरुवात करावी आणि सरते शेवटी नामोहरम होऊन ऍगथाला शरण जावे आणि तिला साष्टांग नमस्कार करावा असे कित्येक अनुभव मी घेतले आहेत. आज शंभर वर्षे उलटून गेली तरी राहस्यकथालेखनात तिला दुसरा उत्तराधिकारी निर्माण झाला नाही ह्यात काय ते आलं. तिची सगळी पुस्तक मी दोनच्या पाढयासारखी घोटली आहेत.
ह्या मंडळींबरोबर जोडीला मराठी वाचन सुरूच होतं. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, वि स खांडेकर, अरुणा ढेरे, प्रकाश नारायण संत, गौरी देशपांडे, ह्या सगळ्यांची बहुतेक पुस्तके आवडती आहेत. गोनिदांचं पडघवली आणि मृण्मयी, माडगूळकरांच बनगरवाडी, याशिवाय युगांत, व्यसपर्व, ऋतुचक्र, लंपन सिरिज आणि गौरीचं दुस्तर हा घाट आणि थांग, सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी, प्रिय जी. ए. आणि सोयरे सकळ ही आवडती आणि संग्रही असलेली पुस्तक. सध्या भैरप्पा, ध्रुव भट्ट, वीणा गवाणकर, रणजित देसाई, तेजस्वी पूर्णचंद्र राव ह्यांच्या सशक्त लेखणीने भारावले आहे.
अशीच आणखी असंख्य पुस्तके आहेत, काही विस्मृतीत गेलेली, काही मी मुद्दाम विसरलेली. पण वाचलेल्या प्रत्येक अक्षराने माझं आयुष्य समृद्ध केलंय. कठिण प्रसंगी साथ दिली आहे. थकलेल्या विचाराना नवचैतन्य दिले आहे. हे माझं अक्षरांशी जडलेलं नातं अबाधित राहावं म्हणून प्रयत्नशील असलेल्या सगळ्यांची मी आजन्म ऋणी आहे. सोशल मीडियाच्या कल्लोळात कुठेतरी हरवलेलं हे अक्षरधन आता नीट संचय करून ठेवायचे एवढीच इच्छा आहे.
Part2
उत्तर द्याहटवा