कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।
भाबड्या ह्या भक्तासाठी देव करी कामकौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।।
माणिक वर्मा ह्यानि गायलेलं आणि माझ्या आवडत्या पु. लं नी संगीतबद्ध केलेलं हे गीत. हे माझ्या आजीचंही आवडीचं गीत म्हणून जास्त लक्षात आहे! आजीचा आवाज सुरेल, त्याला भरपूर चढ होता. तिला गाण्याची प्रचंड आवड. पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तिला जेमतेम गोल साडी नेसून कॉलेज ला इंटर पर्यंत शिकण्याची काय ती मुभा मिळाली होती. गाणं शिकणं तर दूरची गोष्ट. नाही म्हणायला आजीचे माहेरी भरपूर लाड झाले. माझे पणजोबा म्हणजे डहाणू चे अण्णा चौबळ. पुढे मुंबईला येऊन स्थिरावले. चार मुलांनंतर आजी पहिली मुलगी, त्यामुळे तिच्यावर अण्णा आजोबांचा विशेष जीव! तिला एकटीलाच फक्त रोज चांगलं तांब्याभर धारोष्ण दूध प्यायला मिळायचं म्हणे. तिला घरातले सगळे जण ताई म्हणत. तेव्हाच्या परिस्थितीत मुंबईत देखील मुली परकर पोलक्यातून सरळ नऊवारीत प्रवेश करायच्या आणि संसाराला लागायच्या. पण अण्णा आजोबांनी आजीला आवर्जून एस.एन. डी. टी कॉलेजात घातलं. त्यावेळी तिचे मोठे भाऊ तिला लुगडं नेसून कॉलेज ला जायला लावायचे. चक्क त्याही काळी कॉलेज मधे लुगडं नेसून येते म्हणून चिडवणार्या हाय-फाय मुली होत्या. शेवटी आजीने बंड पुकारलं. 'मी साधं पाचवारी 'पातळ' नेसून जाणार, लुगडं अजिबात नेसणार नाही'..असं म्हणत. लेकीच्या मायेखातर अण्णा आजोबांनी ते पण मान्य केलं. आणि अश्या तर्हेने मिस.गुलाब चौबळ आणि त्यांची सख्खी मैत्रीण मिस. कमल परुळेकर ह्या पाचवारी पातळ नेसून लोकल ट्रेन मधून कॉलेज ला जायला लागल्या. त्यांची कॉलेज ची प्रिंसिपल ,'कमल अँड गुलाब, अ बंच ऑफ फ्लॉवर्स' असं म्हणत स्वागत करायची म्हणे!
ह्या सगळ्या गोष्टी मला अर्थात आजीने सांगितल्या. तिचं गाण्याचं प्रेम, आणि तिच्या लग्नानंतर माझ्या आजोबांच्या रुपात तिला त्या संदर्भात मिळालेली त्यांची साथ, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्या तोंडून अगणित वेळा ऐकल्या आहेत. मुळात माझे आजोबा - त्यांना आम्ही अप्पासाहेब म्हणायचो-, ते अतिशय शिस्तप्रिय! ते सांगली जिल्ह्यातल्या बोरगाव ह्या गावचे इनामदार होते, पुढे कामासाठी मुंबईला येऊन राहिले, पण तो इनामदारी खाक्या त्यांनी शेवटपर्यंत बाळगला. प्रत्येक गोष्ट तिच्या जागी असली पाहिले, आणि अवतीभोवती स्वच्छता असली पाहीजे ह्याकडे त्यांचं जातीने लक्ष असायचं. पण ह्यासाठी त्यांनी आजीला कधी त्रास दिला नाही. हातात स्वतः फडकी घेऊन फर्निचर पुसणे, रोज शुभ्र पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून (तो पोषख त्यांनीच धुवून इस्त्री केलेला असायचा) ऑफिस ला जाणे, रोज निगुतीने पत्रव्यवहार करणे आणि त्यांच्या प्रति जपून ठेवणे ही त्यांची रोजची आवडती कामं.
आजीकडे सुट्ट्यांमध्ये गेलो की त्यांचं स्टेशनरी चं कपाट हुडकणे हे आमचं आवडतं काम. त्यातून कायम मंद असा बेगॉन स्प्रे चा वास यायचा. हा स्प्रे घरात नियमित मारणे ही सुद्धा अप्पासाहेबांची सवय. ह्या कपाटामध्ये नीट एकावर एक रचून ठेवलेल्या कॅसेट्स असायच्या. मराठी भावगीते, नाट्य संगीत, अभंग, निवडक चित्रपट गीते अशी रेलचेल असलेल्या कॅसेट्स! सोनी 90 ची प्रत्येक कॅसेट त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे रेकॉर्ड करून घेतली होती. प्रत्येक कॅसेटवर गाण्याची लिस्ट लिहिलेली असायची. कधी त्या कॅसेट ची अदलाबदल झालेली मी पहिली नाही. रोज दुपारी बरोबर साडेतीन वाजता आजी दोघांची फिल्टर कॉफी करायची. ३.३५ ला ती कॉफी चर्रर्रर असा आवाज करत कपामध्ये पडायची. मग आजी चार मारी बिस्कीट एका बशीत घालून बाहेर यायची. दोघे निवांत कॉफी प्यायचे. आणि मग त्या कॅसेटच्या खजिन्यातून एखादी कॅसेट बाहेर निघायची आणि एक तास दोघेही तल्लीन होऊन गाणी ऐकायचे. सुधीर फडके, गीत रामायण, माणिक वर्मा, अभिषेकी, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी ही खास आवड! आणि मग पाच वाजता 'सरशी' करून आजी आजोबांबरोबर पिशवी घेऊन सामान आणायला बाहेर जायची. हा त्यांचा रोजचा सोहळा मी कित्येक वर्षे सुट्टीसाठी गेले की कौतुकाने बघत बसायचे.
पुढे आजोबा गेल्यावर आजीची दिनचर्या बदलली.आता ती नुसती अधून मधून गाणी गुणगुणायची. कधी टीव्ही वर लागली तर आनंदून जायची, पण त्यात ती मजा राहिली नव्हती. हळूहळू तिला वयापरत्वे विसर पडायला लागला. पण 'कौसल्येचा राम' आणि 'आकाशी झेप घे रे पाखरा' ही दोन गाणी मात्र सतत तिच्या तोंडी असायची. माझा मुलगा झाला त्यावेळी आजी आईकडे होती. खूप थकली होती. पण मी हट्ट धरला, बाळाचा पाळणा तूच गायचास म्हणून. तिची गाण्याची आवड मला माहित होती. तेवढ्यात तिचे आनंदाने लुकलूकलेले डोळे मी पाहिले. 'मला जमेल का ग?' तिने तरीही विचारलं. 'हो, नक्की जमेल आणि जोडीला आई आणि मावशी आहेत की' मी आश्वासन दिलं. माझ्या बाळाचं भाग्य की त्याला त्याच्या पणजीने गायलेला पाळणा ऐकताना त्याचं नाव मिळालं. 'कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, ह्या नंदाघरचा हा आनंद घ्या' ती गाताना एकही शब्द विसरली नव्हती. आई आणि मावशी तिला साथ देण्यापुरत्या काय त्या उरल्या होत्या. तिचा आवाज तेव्हाही छान खडा होता आणि कुठेही थरथरत नव्हता. थरथरत होते मी, डोळ्यात येणाऱ्या पाण्याला थोपवायची धडपड करत!
प्रत्येकाच्या मनात आजी नावाची एक सुगंधी कुपी असते. एखाद्या आठवणीने ती अलगद उघडली जाते, आणि तो मंद सुगन्ध कितीतरी वेळ मनात दरवळत राहतो. श्रीरामनवमीच्या निमित्ताने माझ्या मनातली ही कुपी पण अशीच हलकेच उघडली जाते. अजूनही श्रीरामनवमीला मी हटकून 'कौसल्येचा राम' ऐकते. आजीच्या मायेचा, माझा हक्काचा शेला पांघरून!!
Khupach chaan
उत्तर द्याहटवाThank you Teju..
हटवासुरेख .... सगळ्या आठवणी परत refresh झाल्या
उत्तर द्याहटवाThank you Tai..
हटवानमस्कार, मी कौस्तुभ कर्णिक, बाळ कर्णिक यांचा मुलगा. जुनी आठवण वाचून आनंद वाटला. आपल्या मुलीं इतकेच आपल्या भाच्यांवरील प्रेमामुळे मामी-आजीचा सहवास मलाही लाभला. मामा-मामी आमच्या घरी आवरजून येत. पुण्यात शिकत असताना मला हक्कानी बोलवत. मामांच्या अकाली जाण्याने मामींना कदाचित एकटेपण आले असेल. पण हसतमुख चेहरा आणि प्रेमाचा ओलावा कुठेच अटला नाही. पुढे अनेक वर्षांनी त्यांची भेट झाली, तेंव्हा वयोपरत्वे त्यांना थोडे विस्मरण झाले होते. पटकन कोण आलय हे लक्षात येईना. पण ओळख पटल्यावर मात्र मला लहान मुलासारख जवळ घेतलं होतं.
उत्तर द्याहटवाआठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद. मी लिहलेल्या एका आठवणीची link देत आहे.
http://schweinhaben.blogspot.com/2006/11/two-obituaries.html (last paragraph)
कौस्तुभ, किती दिवसांनी connect झालो..खूप छान वाटलं तुझा reply पाहून..लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या..आत्या आजींच्या हातची गव्हाची खीर अजून आठवते. ह्या आठवणी लिहून ठेवणे हे किती गरजेचं आहे ते आज लक्षात येतंय..
हटवाखूप सहज सुंदर लेखन!! वाचून आनंद झाला.
उत्तर द्याहटवाThank you..🙏
हटवासुंदर! त्या सुगंधी कुपितील मंद दरवळ आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद.
उत्तर द्याहटवाThank you dada! 🙏🏻🙏🏻
हटवा