आठवणीतली गाणी

आठवणीतल्या गाण्यांची एक गम्मत आहे. आवडत्या गाण्यांपेक्षा वेगळी! आवडीची गाणी आपण निव्वळ ती आवडतात म्हणून ऐकतो. चव घेत, सावकाश..एखाद्या गाण्याची गायकी भुरळ पाडते, एखाद्याचे शब्द तर एखाद्याचं संगीत! पण आठवणीतल्या गाण्यांचं तसं मुळीच नाही. अश्या गाण्यांशी कित्येक प्रसंग, माणसं जोडलेली असतात. आयुष्यभर आपण मग त्या गाण्याचा त्या माणसांशी आणि प्रसंगांशी संबंध लावत राहतो. ही गाणी मी कित्येकदा नुसत्या त्या गाण्यांशी संलग्न आठवणी उजळता याव्यात म्हणून ऐकते. ह्या गाण्यांचं एक बरं असतं. ती कायम मनात खोल कुठेतरी वाजत राहतात. आठवली की दृष्टीआड आणि स्मृतिआड गेलेली माणसं अवचित परत भेटतात. विसरलेली ठिकाणे परत जशीच्या तशी दिसू लागतात. ती ऐकत असताना गतायुष्याचा एखादा हरवलेला तुकडा अचानक हाती लागतो आणि कधी कधी मनाला जाणवणारी अपूर्णता काहीशी कमी होते.


मी ७/८ वर्षाची असतानाची वेळ असेल. तेव्हा गालगुंडाची (mumps) साथ आली होती आणि माझ्यासकट माझे कित्येक मित्र मैत्रिणी ह्यात धारातीर्थी पडले होते. तापाने फणफणलेल्या अवस्थेत बाबांनी मला गाणी ऐकवायला सुरुवात केली आणि तेव्हा ऐकलेल्या काही गाण्यांच्या जोरावर मी आजतागायत मुंबईच्या मौल्यवान आठवणी जपून ठेवल्या आहेत. हम दोनो ह्या चित्रपटातलं 'अच्छा जी मैं हारी' गाणं ऐकलं की अजून मला ते गालगुंडाचे दिवस आठवतात, जुने सवंगडी आठवतात, भरभक्कम वजनाचे, तीन वर्तुळ एकमेकांवर ठेवल्यासारखे दिसणारे आणि एखादं पोर डिस्पेन्सरीत आलं रे आलं की त्याला आधी इंजेक्शन टोचणारे आणि नंतर काय झालंय हे विचारणारे पटेल डॉक्टर आठवतात. डबल डेकर ने एकटे शाळेत जाणे आठवते, किंग जॉर्ज शाळेतील ते फेमस कॅन्टीन आठवते आणि त्यात मिळणारे जगप्रसिद्ध बटाटेवडे आठवतात. मुंबईचा पाऊस, त्यात मारलेल्या उडया, चौपाटी, सायनचा किल्ला ह्या सगळ्या आठवणी निव्वळ ह्या गाण्यामुळे ताज्यातवान्या राहिल्या आहेत.

मौसम चित्रपटातलं 'दिल ढूँढता है फिर वहीं' हे गाणं माझं आठवणीतील आणि आवडीचंही आहे. मी दुसरीत असताना हा पिक्चर रिलीज झाला होता आणि हे गाणं सतत अवतीभवती वाजायचं. त्याच सुमारास आमच्या सोसायटी मध्ये कधी नव्हे ती चोरी झाली होती. किंवा चोरीचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी वाटलेली भीती कधी तरी अजूनही ते गाणं ऐकताना आठवते. त्या चोरीच्या खुणा शोधायचा जणू मी मनात हट्ट च धरला होता. अशीच डिटेक्टिव्हगिरी करताना मला  दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर एका भिंतीवर एक लाल ओघळ दिसला. हे नक्की त्या चोराचं रक्त असणार अशी माझी खात्री पटली. नंतर खूप दिवसांनी तो ओघळ पुलंच्या म्हैस मधल्या ऑर्डरली सारख्या कोणीतरी पान खाऊन पचापच थुंकल्यामुळे पडला होता हे कळलं आणि प्रसिद्ध होऊ घातलेली शलाका होल्म्स कायमची पडद्या आड गेली. ☺️☺️

पुढे ज्युनिअर कॉलेज ला गेलो तेव्हा आशिकी नावाचा चित्रपट आला होता. रिलीज होण्याआधी त्याची गाणी सतत चित्रहारमध्ये लागायची. 'मैं दुनिया आआआ भूला दूँगा आआ' हे गाणं विश्वरूप दर्शन घडवत, मोठा आ वासत गाणारा तो नायक किती जणांना आठवतो? त्याच सुमारास बारावी साठी म्हणून मराठे सरांकडे केमिस्ट्री चा क्लास लावला होता. मराठे सर एकदम स्टायलिश इंग्लिश बोलायचे. बोलताना ते तोंडात मोठी गोल सुपारी ठेवून बोलतात असा माझा विश्वास होता..(विषयांतर केलं तर जगजीत सिंग पण तोंडात सुपारी ठेवून गजल म्हणायचे असं मला नेहमी वाटतं.. असो!) तर मराठे सरांच्या सुपारी केमिस्ट्री मध्ये त्यांनी alkanes, alkenes, alkynes शिकवायला सुरुवात केली. तेव्हाच हा मोठा आ वासून गाणी म्हणणारा रोहित की राहुल रॉय प्रसिद्ध झाला आणी ह्या दोघांचं नंतर माझ्या मनात एक पक्के समीकरण बनले. पुढे कॉलेज मध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकताना देखील हे दोघे आणि ते आशिकी चं गाणं काही केल्या डोक्यातून गेले नाही.

बारावीत असताना आजोबा वारले म्हणून मी आणि ताई दोघी जणी पुण्याला निघालो होतो. आई बाबा आधीच तिथे पोचले होते. तेव्हा प्रसन्न ट्रॅव्हल्स च्या बसेस नुकत्याच सुरू झाल्या होत्या. उदास मनस्थितीत, एकमेकींशी फार न बोलता आमचा हा प्रवास सुरु होता. रात्री एका धाब्यावर जेवणासाठी बस थांबली. तिथे सतत सडक पिक्चर ची गाणी वाजत होती. तेव्हापासून ती गाणी ऐकली की मला अजूनही काहीस उदास वाटतं, आयुष्यात पहिल्यांदा मृत्यूशी झालेली ओळख आठवते, आजी -आजोबांच्या आठवणी गर्दी करून येतात.

कॉलेज ला असताना आम्ही दिल्ली आणि राजस्थान बघायला आणि Pharmacy council च्या कॉन्फरन्स साठी  गेलो होतो. फत्तेपूर सिक्रि च्या आवारात फिरत असतानाची गोष्ट. बुलंद दरवाज्याजवळ गाईड माहिती देत होता. लाल पत्थर नावाच्या चित्रपटाचं तिथे शूटिंग झालं होतं वगैरे वगैरे. मी जरा चालत चालत बाजूला गेले. एका भिंतीला टेकून उभी राहणार इतक्यात - "हाथ मत लगाना बेटी, खून लग जायेगा" असं कोणीतरी मागून  जोरात ओरडले. मागे मुलांचा एक घोळका होता त्यातलं कोणीतरी त्या पिक्चर मधली डायलॉगबाजी करत होतं. मी दचकून मागे वळून पाहिलं तर ते हसायला लागले. 'इडियट्स' मी मनात म्हणत अजून आत गेले, संध्याकाळ होत आली होती. तिथे तो नवस बोलून धागा बांधायचा स्पॉट, बाजूला मांडलेली दुकानं, अंधारलेल्या गल्ल्या, अत्तराचा उग्र दर्प.... सगळं अचानक अंगावर आलं, नकोसं झालं, कधी एकदा इथून बाहेर पडतो असं वाटायला लागलं. 'गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं', आजही लाल पत्थर मधील हे सुश्राव्य गाणं ऐकलं की मला प्रकर्षाने ती संध्याकाळ आठवते.

दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट! आईकडे आम्ही दोघी गेलो होतो. ती पुण्यातली तशी शेवटची मोठी ट्रिप असणार होती, म्हणून रिवाजाप्रमाणे तुळशीबागेत जायचं ठरलं. त्यादिवशी पुण्याच्या सुखद हवामानाचे सगळे आडाखे धुळीला मिळवत सूर्य तळपत होता. तरी ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर भटकून आलो. दुपारी जेवणानंतर एक किमी दूर असलेलं पण बंदच ठेवलेलं बहिणीचं घर स्वच्छ करायला जायचं ठरलं. जीवघेण्या उन्हाळ्यात आम्ही रिक्षा शोधत हिंडलो. पण सगळ्या रिक्षा बांधवांचा कवड्या खेळण्याचा डाव रंगात आल्यामुळे आणि १ते ४ ही ऑफिशियल पुणेरी वामकुक्षीची वेळ असल्याने कोणी यायला तयार झालं नाही. शेवटी आम्ही चालत निघालो. अंतर जास्त नव्हतं पण आम्ही घरातल्या अवतारात, हातात बादल्या, ब्रश साबण अस घेऊन निघालो होतो. पण 'मरू दे, इथे कोण ओळखतंय आपल्याला' असं स्वतः ला समजावत निघालो. पुण्याने अचानक आपला पुणेरीपणा सोडून गुजराती साज चढवल्यासारखा उन्हाळा रणरणत होता. शेवटी आम्ही एकदाचे पोचलो, बाई ला पकडून आणलं आणि घर नीट नेटकं केलं. संध्याकाळी थकून जमिनीवर दम खात बसलो असताना जादू झाली. बघता बघता अचानक वातावरण पालटलं, गार वारा सुटला, ढग भरून आले आणि धुवाधार पाऊस पडला. सगळीकडे गारेगार झालं. ही किमया बघत आम्ही गच्चीत उभे होतो आणि खाली कोणा कडे तरी 'गारवा' लागला..मला एकदम हसू आलं. "ऊन जरा जास्त आहे' पासून ते अगदी 'पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो' पर्यंत सगळं आम्ही सकाळपासून जसंच्या तसं अनुभवलं होतं की! आता गारवा कधीही ऐकला तरी त्या दिवशीच्या गुलमोहरांचा खच पडणाऱ्या, थंडावा देणाऱ्या सुखद पावसाचीच आठवण येते.

कॉलेज मधे असताना आम्ही सतत पायात मोजे घालायचो म्हणून रोजा च्या गाण्यांचं 'मोजा जानेमन' असं सगळ्यांनी केलेलं विडम्बन आठवतं, पहिल्या वर्षी रॅगिंग च्या वेळी गाणी म्हणायला लावायचे त्यात 'जो जीता वोही सिकंदर' चे एकच गाणे म्हणून म्हणून मी वर्षभर सगळ्या सिनिअर्स च्या डोक्याला आणलेला वात आठवतो, पुढे ऑफिसमधून घरी येताना, मुसळधार पावसात, तिन्ही सांजेला गाडी थांबवून बाहेरचा कोंडलेला ट्रॅफिक सुटायची वाट बघत असताना ऐकलेली पाकिझा ची गाणी आणि त्यातला लताचा सुरम्य आलाप आठवतो.

अशी अजून अगणित गाणी.. प्रत्येकात कुठेतरी जुनी आवडती किंवा नावडती आठवण रुजली आहे. ही गाणी आणि त्या आठवणी आता एकमेकांचा अविभाज्य अंग आहेत. पुढेही राहतील. जशी मला ही गाणी गवसली, तशीच तुमच्या आठवणीतली गाणी तुम्हाला भेटत राहोत हीच सदिच्छा!








टिप्पण्या

  1. अप्रतिम ... माझ्या आठवणी पण ताज्या झाल्या

    उत्तर द्याहटवा
  2. वाह किती छान लिहिलं आहेस शलाका , हाही लेखनाचा विषय असू शकतो हो !! मला पण अशीच काही गाणी आठवली
    Too good 👍

    उत्तर द्याहटवा
  3. Very nice dear shalaka..khup chaan lihilaay..asa vatato ki mi pan tujha barobar hey sagla anubhavla aahey...

    उत्तर द्याहटवा
  4. एकदम अप्रतिम आहे सगळं,, वाचताना सगळं कसं डोळ्यासमोर येते, तुझ्या स्मरणशक्ती ला पण मानले पाहिजे,आता प्रत्येक गाणं ऐकतांना किंवा गुणगुणत असताना डोक्यात आणखी एक विचार राहील आणि आठवणींना उजाळा मिळेल,, हे सर्व तुझ्या लेखनामुळे,, आशीत लिहत राहा आणि आम्हाला नवनवीन कल्पना आणि तुझे जगावेगळे विचार कळतील ,,,

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतिम. सुरेख लिखाण. अशीच लिहत रहा. तुझे लिखाण खरोखंच भूतकाळातील आठवणीना उजाळा देते. तुझ्या ब्लॉगची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम समरणशक्ती आणि त्याचा समयसुचक पुनर्वापर! बढिया!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

अक्षरांशी जडले नाते!!