पत्रास कारण की....
'तुला यातलं काय हवं ते घे'..आईने माझ्यासमोर लहानसा खजिना मांडून ठेवला होता..'तुला आलेली पत्रं आहेत ही'..समोर मांडलेल्या लहान मोठ्या कागदांकडे मी हरखून पहात होते. लहान पिवळ्या एन्व्हलप मधे भरलेलं एक पत्र, निळ्या इनलँड लेटर वर लिहिलेलं दुसरं..पोस्टकार्ड भरून लिहिलेलं अजून एक. माझ्या दहावी बारावीच्या परिक्षेआधी अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि निकाल लागल्यानंतर अभिनंदन देण्यासाठी लिहिलेली पत्र! माझ्या नावाने आलेली सर्वात पहिली पत्र असल्याने आईने जपून ठेवली होती. मी अलगद एक कागद उचलला. वहीच्या पानावर लिहिलेला मजकूर, त्याची शैली आणि थोडंस लांब वळणदार अक्षर मला कुठूनही ओळखता आलं असतं. एकदम गलबलून आलं..अप्पासाहेब! माझे आजोबा, आईचे वडील..पत्रव्यवहार हा शब्द कसा प्रचलित झाला असेल, ते अप्पासाहेबांकडे बघून समजायचे. सामाजिक, कौटुंबिक बांधीलकीचा तो एक नियम आहे, म्हणून कदाचित व्यवहार हा शब्द पत्राबरोबर जोडत असतील. अप्पासाहेब पत्रव्यवहारात अतिशय चोख होते. नातेवाईकांना, मित्रमंडळींना किंवा कुठल्या कामानिमित्त वेगवेगळ्या कचेरीत लिहिलेल्या पत्रांची त्यांच्याकडे नोंद असायची. कोणाकडे शुभ प्रसंग...