पत्रास कारण की....
'तुला यातलं काय हवं ते घे'..आईने माझ्यासमोर लहानसा खजिना मांडून ठेवला होता..'तुला आलेली पत्रं आहेत ही'..समोर मांडलेल्या लहान मोठ्या कागदांकडे मी हरखून पहात होते. लहान पिवळ्या एन्व्हलप मधे भरलेलं एक पत्र, निळ्या इनलँड लेटर वर लिहिलेलं दुसरं..पोस्टकार्ड भरून लिहिलेलं अजून एक. माझ्या दहावी बारावीच्या परिक्षेआधी अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि निकाल लागल्यानंतर अभिनंदन देण्यासाठी लिहिलेली पत्र! माझ्या नावाने आलेली सर्वात पहिली पत्र असल्याने आईने जपून ठेवली होती.
मी अलगद एक कागद उचलला. वहीच्या पानावर लिहिलेला मजकूर, त्याची शैली आणि थोडंस लांब वळणदार अक्षर मला कुठूनही ओळखता आलं असतं. एकदम गलबलून आलं..अप्पासाहेब! माझे आजोबा, आईचे वडील..पत्रव्यवहार हा शब्द कसा प्रचलित झाला असेल, ते अप्पासाहेबांकडे बघून समजायचे. सामाजिक, कौटुंबिक बांधीलकीचा तो एक नियम आहे, म्हणून कदाचित व्यवहार हा शब्द पत्राबरोबर जोडत असतील. अप्पासाहेब पत्रव्यवहारात अतिशय चोख होते. नातेवाईकांना, मित्रमंडळींना किंवा कुठल्या कामानिमित्त वेगवेगळ्या कचेरीत लिहिलेल्या पत्रांची त्यांच्याकडे नोंद असायची. कोणाकडे शुभ प्रसंग असोत, दुःखद काही घडलं असेल, कोणी महत्वाच्या परीक्षेला बसत असेल तर अश्या सगळ्या घटनांची पत्रातून चौकशी करणे, अभिनंदन करणे, सांत्वन देणे ते न चुकता करायचे. आम्हा नातवंडावर दूर रहात असल्याने अंमळ जास्त प्रेम. ते वरचेवर येणाऱ्या पत्रातून जाहीर व्हायचं. आज आईने दाखवलेल्या पत्रातूनही असच कौतुक ओसंडून वाहत होतं. माझा निकाल चांगला लागला म्हणून शेजारी पेढे वाटून आल्याचं कळवलं होतं. कायस्थ प्रभू समाजात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करत तेव्हा माझे नाव तिथे नोंदवून आल्याचे कळवलं होतं. पत्रातून माझ्या मैत्रिणींची चौकशी केली होती..मी हळूच पत्रावरून हात फिरवला. ह्या पत्राला कधीतरी आप्पासाहेबांचे हात लागले असतील, ह्या विचाराने भरून आलं. त्यांच्या मनातल्या आठवणींबरोबर दृश्य रूपात दिसणारं एक प्रतीक मिळालं. मी ते पत्र जपून ठेवलं. अशी कितीतरी पत्र होती, काकी, आत्या, मावश्यानी लिहिलेली. मी दहावीची परीक्षा देतेय हा किती जणांसाठी कौतुकाचा विषय होता! ह्या गोष्टी आठवणीत ठेवून मनापासून शुभेच्छा देणारी पिढी हळूहळू त्या इनलँड लेटर आणि पोस्टकार्ड सारखी नामशेष झाली.
पत्रलेखन हा शाळेत असताना भाषा अभ्यासातील अतिशय महत्वाचा घटक! किंबहुना, मुलांमधील लेखनकलेची सुरुवात कदाचित ह्या पत्रांमधून होत असेल. शाळेतल्या पत्रांचे केवढे नियम होते! मायना लिहायचा म्हणजे कसरत.. तीर्थरूप कुठे, तिर्थस्वरूप कुठे, चि. कोणाला म्हणायचं, प्रिय कोणाला उद्देशायच, ह्या सगळ्याचे नियम होते. नुसता स.न. की सा.न. की शि. सा. न!! मग विषय लिहा, मग मजकूर, तो परिच्छेदात लिहायचा, खाली परत कळावे लोभ असावा, तुमची, आपली, इत्यादी इत्यादी लिहून झालं की पत्र संपायचं.
मला स्वतःला पत्र लिहायला खूप आवडायचं. आणि ते कोणाकडून तरी मिळवायला पण!
मी चौथी पाचवीत असेन, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला आजीकडे गेले होते, तेव्हा अप्पासाहेबांचे जवळचे स्नेही परुळेकर आजोबा आले होते,अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले हेआजोबा, मुंबईच्या आयआयटीत प्रोफेसर होते. ती अफाट बुद्धिमत्ता त्यांच्या खुसखुशीत स्वभावातून मधेच डोकवायची. मी नागपूरला परत गेल्यावर मला परुळेकर आजोबांचं पत्र आलं. चांगलं जाड सहा पानांचं! त्यात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी कसे संशोधन केले आणि विज्ञान कसं प्रगत होत गेलं त्याच अतिशय सुरेख वर्णन प्रचंड विनोदी भाषेत लिहिलं होतं. उदा. 'आपण दोघे मिळून पाणी बनवूया, तू 2 हायड्रोजन आण, मी एक ऑक्सिजन आणतो, आपण पोत्यात घालून हलवून बघू, पाणी बनतंय का ते!' पुढे लिहिलं होतं, 'शिल्पाताईला मात्र हे सांगू नकोस हो! तिला मिश्या असत्या तर आपली ही गम्मत ऐकून, ती मिशीतल्या मिशीत हसली असती, कारण पाणी असं तयार होत नाही हे ती मोठी असल्याने तिला माहिती आहे'. माझी हसून मुरकुंडी वळली. मग पुढे विज्ञानाचे प्रयोग, जेम्स वॅट, स्टीम इंजिन, एडिसन ने लावलेले शोध असं सगळं विस्तृत आणि रंजक वर्णन त्या पत्रात होतं. आजवर मला आलेल्या पत्रातील सगळ्यात इंटरेस्टिंग पत्र. अश्या शिक्षकांच्या हाताखाली तयार होणारे विद्यार्थी किती नशीबवान! ते पत्र माझा हातून गहाळ झालं तेव्हा मी खूप हळहळले होते!
पेन फ्रेंड्स नावाची पद्धत लहानपणी खूप प्रचलित झाली होती. निव्वळ पत्रातून टिकवून ठेवलेली मैत्री. त्यासाठी एकमेकांस भेटले असण्याची अट नव्हती..कॉलेज मध्ये असताना मी मुंबईला ट्रेनिंग करायला एक महिना गेले होते. शनिवारी सुट्टी असल्याने आत्याकडे जायचं ठरवलं, जवळ जवळ 2 तासांचा बसचा प्रवास होता. वेळ कसा जाईल ह्या विवंचनेत असताना बाजूला एक माझ्याच वयाची मुलगी येऊन बसली आणि मला पहिली पेनफ्रेंड मिळाली, थोडी उशिरा का होईना! जुजबी ओळख होऊन गप्पा मारायला सुरुवात केली आणि ऍगाथा ख्रिस्ती हा कॉमन दुआ सापडला. तिच्याबद्दल बोलता बोलता ओळख वाढली, एकमेकींचे पत्ते घेतले आणि मग आम्ही एकमेकींना दीड दोन वर्षे पत्र लिहिली, तिचं लग्न होईपर्यंत.. आज तिला आठवत असेल की नाही काय ठाऊक, माझ्या मनात मात्र काही गोष्टी घर करून राहतात. बाकी बहिणी, मैत्रिणींशी सुद्धा माझा पत्रव्यवहार जमेल तेवढा सुरू होता.
मात्र गेल्या दोन दशकात पत्र लेखनाची कला एकंदरीतच हळूहळू लोप पावत गेली. स्वतः विचार करून हाताने लिहिलेल्या मजकूरापेक्षा आता रेडीमेड मेसेजेस पाठवल्या जाऊ लागले. इंग्लिशमध्ये पोचवलेल्या कोरड्या शुभेच्छा! नुसतं कर्तव्य म्हणून पार पडलेल्या एक कार्यात त्याचं रूपांतर झालं. एखाद्या गोष्टीची 'पत्रास नसणे' म्हणजे त्या गोष्टीबाबत पत्र लिहून दखल न घेणे असा होत असेल का? तर मग त्या अर्थाने हल्ली जो व्यक्तीसंवाद साधला जातो त्यात खरच कोणाला कोणाची पत्रास नसते की काय??
दोन तीन वर्षांपूर्वी एक थोडी वाईट गोष्ट घडली. माझ्या मुलाचा अगदी जवळचा मित्र लुकेमिया ने आजारी पडला. त्याला उपचारांसाठी चेन्नई ला घेऊन गेले. सुरुवातीला आमच्याशी फोनवर बोलणारा मुलगा हळूहळू बोलेनासा झाला. अतिशय क्लेशदायक उपचारामुळे गलितगात्र झाला होता, अंगात त्राण शिल्लक नव्हतं आणि मनातली उमेद संपली होती. एक दिवस मी मनाशी ठरवून त्याला छोटे मेसेजेस लिहून पाठवायला सुरुवात केली. हाताचं बोटही हलवू न शकणाऱ्या १५ वर्षाच्या मुलाला तुम्ही काय समजावणार? हसण्या खेळण्याच्या वयात तो मृत्यूशी झुंज देत होता. 'तुझं दुःख कळतं' हे सुद्धा मला त्याला बोलून दाखवता येत नव्हतं. तरी लिहीत गेले, ते त्याची आई त्याला वाचून दाखवायची. 'प्लिज लिहीत रहा, त्याला मदत होते आहे' असं मला सांगायची. कुठलेतरी प्रसंग, ह्या प्रसंगातून वर आलेल्या लोकांच्या गोष्टी, थोडंस मनाला उभारी देणारं काहीतरी खरडायचे. असे 1/2 महिने गेले, एक दिवस त्याचा स्वतःहून फोन आला. 'मला बर वाटतंय' असं सांगायला. त्यावेळी काय वाटलं ते शब्दात पकडणे कठीण आहे, पण मनापासून लिहिलेल्या ओळींमधून भावना व्यक्त होतात आणि त्याचा समोरच्यावर परिणाम होतो हे आकळल.
ह्यावर्षीपासून मी शाळेच्या whatsapp ग्रुप वर पण प्रत्येक मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्याबद्दल चार ओळी लिहिते, छोटेखानी पत्रच म्हणा हवं तर! त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, जवळीक वाढते आणि जुने बंध अजून थोडे घट्ट होतात. प्रत्येकीबद्दल लिहिण्यासारख्या तिच्या स्वतःच्या खास अश्या खूप बारीकसारीक गोष्टी आहेत ज्याचा बरेचदा त्यांना विसर पडतो. त्यादिवशी एक मैत्रीण मला म्हणाली ,'ज्या वयात आपण स्वतःबद्दल साशंक होतो, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा प्रश्न पडायला लागतात, तेव्हा कुणाकडून तरी आलेले असे आश्वासक लेखन मनाला नवीन स्फूर्ती देते, स्वतःला स्वतःची नवी ओळख करून देते'. अगदी हेच माझ्या मनात होतं. त्या लहान पत्रामुळे जर एखादा दिवस जुन्या आठवणींमध्ये, आनंदात जाणार असेल, आत्मविश्वास वाढणार असेल, तर खरंच काय हरकत आहे?
'आईचं पत्र हरवलं.. ते मला सापडलं' हा खेळ खेळणाऱ्या आपल्या पिढीच्या आयुष्यातून हस्तलिखित पत्रं कधी निसटून गेली, ते आपल्याला कळलं पण नाही. हळूहळू मोठे होत गेलो, तसे आपण थोडे सैलावलो. मायने लहान होत गेले आणि मजकूर जास्त वैयक्तिक! पुढे पुढे रेडिमेड पत्रांमधून आलेला कृत्रिमपणा जेव्हा नात्यात झिरपायला लागला तेव्हा कदाचित पत्रांचे महत्त्व लक्षात यायला लागले. म्हणून मला वाटतं, सगळ्यांनी पत्रं लिहीत राहावी. मायन्यासहित, मायन्याशिवाय, कारणानिमित्त किंवा कारणाशिवाय. जमलं तर कागदावर, नाहीतर हल्ली लिहितात तसे मोबाईल वर. पण लिहीत राहावी. शेवटी काय तर पत्रास जे कारण आहे, ज्या भावना आहेत त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याला महत्त्व!!!

नेहमीप्रमाणे खूप सुंदर .... सहज आणि ओघवती भाषा .... वाचत राहवेसे वाटते तुझे लिखाण
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
उत्तर द्याहटवा