वाऱ्यावरती गन्ध पसरला..
आठवणींचा संबंध थेट आपल्या पाच इंद्रियांशी जोडल्या गेलाय. रस, रूप, गन्ध, स्पर्श, शब्द ह्या पाच इंद्रियांतून डोकावणाऱ्या जाणिवांचा संबंध थेट मनाशी आणि मनात खोल लपलेल्या आठवणीत असतो. म्हणून एखादं जुनं गाणं ऐकलं की हुरहूर लागते किंवा एखादा जुना फोटो पाहिला की मन प्रसन्न होतं आणि एखादा ओळखीचा गन्ध हव्याहव्याशा आठवणींच्या गावात घेऊन जातो. खूप आधी कधीतरी ह्या विषयावर लिहायला सुरुवात केली होती, ते लिखाण तसच कुठेतरी अर्धवट पडून होतं. मग एका मैत्रिणीने तिच्या अमेरिकेतल्या घरचे जाईच्या फुलांचे फोटो पाठवले आणि म्हणाली, ह्याचा सुवास मला आमच्या जुन्या घराच्या अंगणात घेऊन जातो, सगळ्या आठवणी गर्दी करून येतात. मी मनात म्हटलं ,'खरच की, अगदी ह्याच आठवणींच्या ओढीने आपण काही बाही खरडायला बसलो होतो, ते राहून गेलं, पूर्ण केलंच पाहिजे'. असं ठरवून सरसावून नेटाने लिहायला बसले आणि..... नेमका मला कोरोना झाला. बाकी त्रास कमी असले तरी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, वास घेण्याची हळूहळू मंदावत गेलेली क्षमता. (आणि ती टिकून राहावी म्हणून माझी चाललेली धडपड). शेवटी कधीतरी ती 'वास घे...