वाऱ्यावरती गन्ध पसरला..
आठवणींचा संबंध थेट आपल्या पाच इंद्रियांशी जोडल्या गेलाय. रस, रूप, गन्ध, स्पर्श, शब्द ह्या पाच इंद्रियांतून डोकावणाऱ्या जाणिवांचा संबंध थेट मनाशी आणि मनात खोल लपलेल्या आठवणीत असतो. म्हणून एखादं जुनं गाणं ऐकलं की हुरहूर लागते किंवा एखादा जुना फोटो पाहिला की मन प्रसन्न होतं आणि एखादा ओळखीचा गन्ध हव्याहव्याशा आठवणींच्या गावात घेऊन जातो.
खूप आधी कधीतरी ह्या विषयावर लिहायला सुरुवात केली होती, ते लिखाण तसच कुठेतरी अर्धवट पडून होतं. मग एका मैत्रिणीने तिच्या अमेरिकेतल्या घरचे जाईच्या फुलांचे फोटो पाठवले आणि म्हणाली, ह्याचा सुवास मला आमच्या जुन्या घराच्या अंगणात घेऊन जातो, सगळ्या आठवणी गर्दी करून येतात. मी मनात म्हटलं ,'खरच की, अगदी ह्याच आठवणींच्या ओढीने आपण काही बाही खरडायला बसलो होतो, ते राहून गेलं, पूर्ण केलंच पाहिजे'. असं ठरवून सरसावून नेटाने लिहायला बसले आणि.....
नेमका मला कोरोना झाला. बाकी त्रास कमी असले तरी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, वास घेण्याची हळूहळू मंदावत गेलेली क्षमता. (आणि ती टिकून राहावी म्हणून माझी चाललेली धडपड). शेवटी कधीतरी ती 'वास घेणे व्यवस्था' पूर्णपणे ठप्प पडली आणि मग मी ह्या गंधमय आठवणींमध्ये जरा जास्तच गुंतले. आयुष्यात जर कुठले गंध शिल्लक राहिले नाहीत तर काय घडेल ह्याचं प्रात्यक्षिक गेल्या 2/3 दिवसात मिळालं. अगदी डेटॉलचा, साबणाचा किंवा फोडणीला घातलेल्या कांदालसूणचाही वास येत नव्हता. 'नासिक आंधळेपण' किंवा 'nasal blindness' असं मी ह्या अवस्थेला नाव दिलं. लगेच सगळीकडे कळवून टाकले, 'आज वास आणि चव गेली. आता पुलं म्हणतात ती अवस्था आहे...ग्लुकोज बिस्कीट चहात बुडवून खाल्लं काय की काडेपेटी बुडवून खाल्ली काय, सगळं सारखंच!' स्वयंपाकघरात दोन मास्क बाळगत काम करत असताना, आंधळ्या नाकाने चाचपडत असताना नको नको त्या आठवणी यायला लागल्या. लोणकढ्या तुपाचा वास, मेथीच्या भाजीचा खमंग वास, गरम वाफाळत्या भाताचा सुगन्ध. आई ग! हे सगळं परत कधी अनुभवता येईल की नाही???
मग मी मुद्दाम चिरपरिचित सुगंधांचा मागोवा घेत आठवणींवर जोर देऊ लागले, तसतसं लक्षात येऊ लागलं की खरंच मानवाचं नाक सुद्धा किती कार्यक्षम असतं. सतत बिझी! निरनिराळ्या वासांमार्फत नवनवीन जाणिवा जाणून घ्यायच्या आणि त्या मेंदूकडे पाठवायच्या. मग मेंदू त्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये फाईल करून ठेवतो. पुढे कधीतरी आपण एखादी आठवण मेंदूला तपासायला दिली की तो बरोबर रेफरन्स काढून आपल्याला संदर्भ पाठवतो. आठवणींची मिसळ तयार!
मार्च महिना आला की मला शाळेतले दिवस प्रकर्षाने आठवतात. नेहमी दुपारच्या शाळेत जाणारे आम्ही मार्च च्या शेवटच्या पंधरवड्यात सकाळी शाळेत जायचो. मौखिक परीक्षा, पीटी, चित्रकला ह्या तोंडी लावण्याच्या विषयांच्या परिक्षा द्यायला.. आंब्याच्या झाडांवर नुकताच फुटलेला कोवळा मोहोर आणि त्याचा गोड सुगंध ह्या मनातल्या राखून ठेवलेल्या आठवणी आहेत. बहुतेक घरांभोवती तेव्हा गृहिणी सडा टाकत. कुठेतरी रांगोळी रेखलेली असे. हवेतला नाजूक गारवा, सडा घातल्याने येणारा मातीचा दरवळ, जोडीला हा मोहोराचा सुगन्ध आणि सकाळी शाळेत जाण्यातली नवलाई.. ते सगळेच सुगन्ध मनात रेंगाळले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजाच वेगळी. लोणच्याच्या मसाल्यासाठी तेलावर परतलेली हिंग मेथी घर व्यापून टाकायची, पिकत आलेल्या आंब्यांच्या आणि खरबुजाच्या घमघमाटाने स्वयंपाकघर भारलेलं असायचं. दुपारच्या वेळी वाळ्याचा गन्ध घेऊन पसरलेला कूलर चा गारवा, सुट्टीत वाचायला काढलेल्या जुन्या पुस्तकांच्या ढिगाचा मला हवाहवासा वाटणारा सुगन्ध घेऊन येणारा उन्हाळा अजूनही नागपूरात तसाच साजरा होतो का?
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई ला जायचो तेव्हा ती मुंबई प्रथमदर्शनी, तिचं स्वतःच अस्तित्व तिच्या स्वतःच्या विशिष्ट वासानेच जाणवून द्यायची. आजही मुंबईत पाय ठेवताच तोच खारट वास नाकाशी झोम्बतो. पण लहानपणी त्याच्या जोडीला, सुकत घातलेल्या मासळीचा, भाजल्या मशेरीचा, तव्यावरच्या तेलपोळीचा, झालंच तर बसच्या धुराचा, आणि चौकाचौकात विकायला ठेवलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्यांचा एकजीव झालेला वास दरवळत असे. नंतर मोठे झाल्यावर कामानिमित्त भेटलेली मुंबई काहीशी उच्चभृ, शिष्ट झाल्यासारखी वाटली. गजरे नाहिसे झालेले होते आणि बसच्या धुराशी पण संबंध संपला होता. रस्त्यावरून जाताना मधेच नाकाशी झोम्बणारा सुकटीचा दर्प मात्र अजूनही मुंबई चं वेगळेपण जाणवून देतो.
आजीच्या मुंबईच्या घराचा पण एक विवक्षित वास होता. बहुतेक सगळ्या कपाटांच्यावर आप्पासाहेब बेगॉन स्प्रे मारून ठेवायचे. तो वास कायमस्वरूपी आठवणींत मुक्कामाला आला आहे. आजी गॅस असूनही स्टो पेटवून त्यावर निम्मा स्वयंपाक करायची किंवा पाणी तापवायची. त्याच्या रॉकेल चा वास मला भारी आवडायचा. कपाटातल्या धुवून ठेवलेल्या शुभ्र चादरीची चळतिला डाम्बराच्या गोळ्यांचा एक स्वच्छ सुगन्ध असायचा. आणि सगळ्यात आवडणारा गन्ध म्हणजे आजीच्या फिल्टर कॉफीचा. तिने कॉफी करायला काढली की अख्ख घर त्या कॉफीच्या वासाने भरून जात असे. त्या वासाची कॉफी घरी आणून बनवण्याचे माझे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. आजही ह्यातला एखादा वास कुठून आला तर मला त्या घरात घेऊन जातो. मनात कुठेतरी निर्धास्त, मोकळं वाटून जातं. लहानपणी वाटायचं तसं!
त्यावेळी आजीची आणि आईच्या ठेवणीतल्या साड्यांची पेटी उघडणे म्हणजे पण गंमत असायची. नीट मऊ सुती कापडात बांधून ठेवलेल्या भरजरी साड्या. बरेचदा त्यात लवंगा घालून ठेवत. झुरळे लागू नयेत म्हणून. त्या साड्यांना सणा- समारंभाला नेसल्यामुळे स्वतःचा असा भारदस्त सुवास असे. गुलाबपाणी, अत्तर, सुकलेल्या फुलांचे आणि लवंगांचे हे संमिश्र गन्ध मला कुठल्याही उंची परफ्युम पेक्षा अधिक मौल्यवान वाटतात. क्वचित कधी त्या जरी ला पण एक मेटॅलिक वास येत असे. वेगवेगळ्या सुवासांची अशी पखरण आणि त्यातून प्रतीत होणारी शालीन संस्कृती आज जरी नजरेआड गेली असली तरी विस्मृतीत अजिबात नाही.
देवघरातले सुगंध असेच! भारदस्त, पवित्र तरीही मनाला भुरळ पडणारे. सणवार आटोपले आणि जेवणे झाली की मला देवघरात जायला खूप आवडे. पारिजातक, शेवन्त, गुलाबाच्या परिमलाने व्यापलेले देवघर. चंदन कापराच्या वासाने पवित्र झालेले देवघर. पुरणपोळीचा खमंग वासाने घमघमलेले देवघर. आमचं देवघर थोडं अंधारलेलं होतं. दुपारच्या वेळी तिथे शांत तेवत असलेल्या निरंजनाकडे बघत सगळे सुगंध मनात साठवून घेत मी स्वस्थ बसून रहायचे. देवांच्या काहीश्या गंभीर , गूढ दिसणार्या रूपाची आणि त्या सुगंधी वलयाची मला विलक्षण ओढ वाटत असे.
असे किती गन्ध आहेत आजूबाजूला, बरेचदा नुसते हे गन्ध मला जुन्या दिवसांच्या दारात आणून पोचतं करतात.
पहिल्या पावसाचा जीव वेडावणारा मृदगन्ध मैत्रिणींबरोबर

हादडलेल्या खमंग भजी, भेळ आणि समोश्याची चव घेऊन येतो, वेलींवर फुललेल्या जाईजुईचा नाजूक सुवास श्रावणातली लगबग घेऊन येतो, सणासुदीला घराघरातून येणारे खमंग वास दिवाळीच्या तयारीचा उत्साह जोडीला आणतात तर औषधांचा, स्पिरिटचा वास क्वचित नको असलेल्या आठवणींना उजाळा देतो.
सांगायची गम्मत अशी की कोरोनामय वासविहीन अवस्थेत मी हे लिहायला सुरुवात केली आणि अचानक दोनेक दिवसांनी देवापुढे लावलेल्या अगरबत्तीचा नाजूक वास नाकाशी किणकिणला. 'खरं की काय??' मी आनंदून जरा नाकाला ट्रेन करून पाहिलं. तर तो अवचित आलेला परिमल परत कुठेतरी दडून बसला होता. मग दुसऱ्या दिवशी थोडा अजून जास्त वेळ नाकाला भिडला. इतर सटरफटर गन्ध पण थोडे थोडे परतायला लागले. पण तरीही तंत्र बिघडलं आहेच. काही विवक्षित गन्ध जास्त उग्र जाणवतात, काही अगदी अजिबात जाणवत नाहीत. एखाद्या चवीचं जसं आपण पृथक्करण करू शकतो तसं आता मी एखाद्या वासाचं करू शकते.
आजच्या घटकेला मी माझे घ्राणेंद्रिय 80% परत सुधारू शकले आहे. उरलेलं 20 टक्के पण हळूहळू होईल. पण वासहीन अवस्थेत काढलेल्या ह्या सुगंधी यात्रेची पण निराळी गम्मत होती. गन्ध नसल्यामुळे ते असतानाच्या येणाऱ्या आठवणींची! यातले कुठले गन्ध तुम्हालाही भेटत असतील तर आवर्जून लिहा..नोंद करून ठेवा! न जाणो कधी तुमचं नाक काही दिवसांसाठी संपावर गेलं, तर ह्या आठवणी नक्कीच सोबत करतील.

Very nicely written 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखूप सुंदर आणि मार्मिक लिहिलंय शलु . ब्लॉग वाचताना हेच सगळे सुगंध मी पण अनुभवले ..... तुझी लिहिण्या तली पोसिटीव्हीटी खूप आवडते मला . असेच सुरेख लिखाण करून आम्हांला आनंद देत जा
उत्तर द्याहटवाkhup sunder apratim lihilayas Shalaka ...mi shilpachi shaletli maitrin
उत्तर द्याहटवाThanks..नाव लिहिलंस तर नक्की ओळखेन मी! ☺️
हटवामस्तच....🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you!
हटवा