मधुबन खुशबू देता है....
रोज संध्याकाळी चालायला जाते तेव्हाचे माझे दोन नियम आहेत. मावळत्या सूर्याचे आणि सप्तरंगी आकाशाचे फोटो काढायचे आणि रोज कुठलातरी genre पकडून गाणी ऐकायची. मग एखाद्या दिवशी थेट किशोरी आमोणकर असतात सोबतीला, एखाद्या दिवशी चक्क सुनिधी चौहान, कधी लता, आशा, रफी, किशोरदा हे दिग्गज तर कधी अरिजीत सिंग, श्रेया घोषाल हे नव्या दमाचे गायक; कधी जुने नावाजलेले संगीत दिग्दर्शक तर कधी हल्लीचे गोंगाटमय संगीतज्ञ. एखाद्या दिवशी भक्तीरस तर लगेच दुसऱ्या दिवशी 90 च्या दशकतील इंडिपॉप! त्यात आता 'आमच्यावेळी खूप सुरेल संगीत असायचं, आताच्या गाण्यांना काही अर्थ नाही' अशी कुरकुर करण्याइतकं वय पण वाढलंय. अश्यात कधीतरी अचानक एखाद जुनं पण त्यावेळी त्यात फार इंटरेस्ट न घेतलेलं गाणं कानावर पडतं. वर्तमान परिस्थित सतत 'हिरीये, सोनिये' ऐकून ऐकून विटलेले आपले कान एखाद्या सुमधूर गाण्यासाठी किती हपापले होते ते जाणवतं. त्यादिवशी अचानक येसूदास यांनी गायलेलं "मधुबन खुशबू देता है.." लागलं आणि चालता चालता चक्क डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी कधी नीट ऐकलंच नव्हतं. इतके सुंदर बोल, इतका सुरेख भावार्थ! साधा, सरळ, सक...