मधुबन खुशबू देता है....

रोज संध्याकाळी चालायला जाते तेव्हाचे माझे दोन नियम आहेत. मावळत्या सूर्याचे आणि सप्तरंगी आकाशाचे फोटो काढायचे आणि रोज कुठलातरी genre पकडून गाणी ऐकायची. मग एखाद्या दिवशी थेट किशोरी आमोणकर असतात सोबतीला, एखाद्या दिवशी चक्क सुनिधी चौहान, कधी लता, आशा, रफी, किशोरदा हे दिग्गज तर कधी अरिजीत सिंग, श्रेया घोषाल हे नव्या दमाचे गायक; कधी जुने नावाजलेले संगीत दिग्दर्शक तर कधी हल्लीचे गोंगाटमय संगीतज्ञ. एखाद्या दिवशी भक्तीरस तर लगेच दुसऱ्या दिवशी 90 च्या दशकतील इंडिपॉप! त्यात आता 'आमच्यावेळी खूप सुरेल संगीत असायचं, आताच्या गाण्यांना काही अर्थ नाही' अशी कुरकुर करण्याइतकं वय पण वाढलंय. अश्यात कधीतरी अचानक एखाद जुनं पण त्यावेळी त्यात फार इंटरेस्ट न घेतलेलं गाणं कानावर पडतं. वर्तमान परिस्थित सतत 'हिरीये, सोनिये' ऐकून ऐकून विटलेले आपले कान एखाद्या सुमधूर गाण्यासाठी किती हपापले होते ते जाणवतं.

त्यादिवशी अचानक येसूदास यांनी गायलेलं "मधुबन खुशबू देता है.." लागलं आणि चालता चालता चक्क डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी  कधी नीट ऐकलंच नव्हतं. इतके सुंदर बोल, इतका सुरेख भावार्थ! साधा, सरळ, सकारात्मक आशय असलेलं हे गाणं आधी खरंच जरा दुर्लक्षल्या गेलं. हल्लीची अंगावर येणारी सवंग आणी थोडीशी बिभित्स गाणी कुठे आणि मनावर हळुवार फुंकर घालणारे हे प्रगल्भ शब्द कुठे!

"जीना उसका जीना है, जो औरोंको जीवन देता है"! हा विचार आजच्या समाजात कुठेतरी लोप पावला आहे नाही? कधीतरी कोणाच्यातरी चेहऱ्यावर हलकस हसू यावं म्हणून आपण प्रयत्न करतो? समोरच्या व्यक्तीचं जगणं आपल्यामुळे थोडं सुसह्य, आनंदी होणार असेल तर तस कार्य निर्व्याजपणे आपल्या हातून घडतं का? एखादी कौतुकाची थाप, एखादी मनापासून दिलेली दाद आपल्या हातून अलगद निघते? फार घट्ट जवळचं नाते नसेल तर आपण बरेचदा अलिप्त बसतो. एकन्दरीत स्वतःपुरते आक्रसलेल जीवन जगता जगता सामाजिक देणे आणि जाणीव ह्यांची भरपूर उणीव मला भोवताली जाणवते. म्हणून त्यादिवशी जरा डोक्यावर ताण देऊन माझ्या आयुष्यात आलेले, भवताली अनुभवलेले  'मधुबनी क्षण' आठवत बसले.

ह्यात सगळ्यात प्रथम स्थान अर्थात माझ्या बाबांना आहे. त्यांनी आयुष्यभर सभोवती असलेल्या माणसांचे, नातेवाईकांचे उत्साहवर्धन केले. भोवताली असलेल्या लहानसहान गोष्टींमधला आनंद जोपासायला मला बाबांनी शिकवला. गरजवन्ताच्या पाठीशी उभे राहणे, जमेल त्याला जमेल तशी मदत करणे ह्या त्यांच्या स्वभावामुळे आज त्यांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही लोक त्यांची किती मनस्वी आठवण काढतात ते मी बघते. त्यांच्या कम्पनी मध्ये त्यांनी आवर्जून दोन मूक बधीर कामगार ठेवले होते. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत देत  बाबांनी त्यांची खाणखुणान्ची भाषा शिकून घेतली होती. ते अतिशय संयमाने, तासंतास त्यांना काम समजावून देत. त्यातल्या एकाला चालवता येत होती, म्हणून एक मोपेड घेऊन दिली. ते दोघे पण बाकी कामगारांपेक्षा जास्त गुणी निघाले. भरपूर परिश्रम घेउन आयुष्यात स्थिरावले. तश्या बाबांच्या अजून असंख्य आठवणी आहेत, त्यांचा एक स्वतन्त्र लेख होईल. पण समाजाने उपेक्षिलेल्या लोकांसाठी बाबांनी मनापासून घेतलेली मेहनत ही एक पहिली सुगंधी आठवण.

पुढे लग्न होऊन गुजरात मध्ये आले. नवीन नोकरी होती. माझी बॉस एक अतिशय महत्वकांक्षी, स्वतंत्र विचारांची, कर्तबगार व्यक्ती होती. साहजिकच लग्न वगैरे पारंपरिक गोष्टींवर तिचा फारसा विश्वास नव्हता. पण स्वतःच्या आईवडिलांकरता अक्षरश: झटत असे. तिच्या आईंचा माझ्यावर खूप जीव होता. मी इथे एकटी राहून सगळं सांभाळते म्हणून त्या फोन करून धीर देत असत. त्यांनी स्वतः फार हलाखीच्या परिस्थितीत सुरुवातीचे दिवस काढलेले. मुळात हौशी स्वभाव, म्हणून त्यांना त्यांच्या मुलीसाठी जे करायला मिळालं नाही, ते सगळं त्यांनी माझ्यामार्फत पूर्ण करून घेतलं. सकाळी ड्राइवर बरोबर गरम गरम गुजराती नाश्ता पाठवणे, मला दिवस गेले तेव्हा 'वाटेल ते खाऊ नकोस, मला सांग मी पाठवत जाईन ' अशी प्रेमळ दटावणी करणार्या नलिनी आंटी त्यांची प्रेमाची उधाळण माझ्यावर करायच्या. घरी आर्थिक सुबत्ता, कामाला भरपूर नोकर चाकर असताना, बऱ्याच गुजराती स्त्रियांसारख्या जातीने स्वतः स्वयंपाक करायच्या. त्यांच्या हाताची विलक्षण चव दिवसभर जिभेवर रेंगाळत असे. वाफाळलेला ढोकळा, हान्डवा, भेळ खावी तर त्यांच्या हातची. मला खावंसं वाटेल म्हणून त्यांनी पाठवलेलं बाळकैरीच भरलेलं लोणचं तर अक्ख्या जगात दुसरं कोणी बनवू शकणार नाही. 'तुम्ही authentic गुजराती रेसिपिज च पुस्तक काढा'  ह्या माझ्या मागणीला त्या थट्टेवारी उडवायच्या. दिवाळीला साडी, बाळाच्या बारश्याचा बाळंतविडा, माझे सगळे लाड त्यांनी मनापासून पुरवले. 'मी तुमच्यासाठी काय करू?' असं विचारलं की माझ्याकडून साबुदाण्याची खिचडी करून घेत. एकदा हक्काने किलोभर उपवासाचं लिंबू लोणचे घालून घेतलं. गम्मत म्हणजे, ह्या सगळ्यात त्यांचं माझं डायरेक्ट संधान असायचं. आमच्या दोघींचं सीक्रेट! बॉस ताई ह्या सगळ्या गोंधळात पडत नसे. कालान्तराने त्या अमेरिकेत मुलाकडे रहायला गेल्या, पण नवख्या प्रदेशात आलेल्या एका तरुण मुलीला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळून घेणाऱ्या नलिनी आंटी ही दुसरी खणखणीत 'मधुबनी' आठवण!

पुढे मुलाला सांभाळायला ठेवलेली योगिनीबेन ही माझी तिसरी गोड आठवण. आज मी स्वतःला विचारलं की ह्या जगात माझ्यावर नि:स्वार्थ, निस्सीम प्रेम करणारी काही नावं शोध, तर हिच नाव नक्किच पहिल्या पाचात येईल. एका सर्वसाधारण ब्राह्मण परिवारातील ही साधीसुधी, निष्कपटी, निर्व्याज बाई, माझ्यापेक्षा वयाने 10/12 वर्षे मोठी. मला कितीतरी गोष्टी शिकवून गेली. कुठल्या गोष्टीचं किती ओझं घ्यावं, कुठली सोडून द्यावी, समाधान कशाला म्हणतात हे सगळं मी तिला बघून शिकले. माझ्या आयुष्यातील सगळ्या चढ-उतारात मला सावलीसारखी सोबत करणारी ही व्यक्ती. बर नसलं की झटकन माझी दृष्ट काढणारी, गरज पडेल तेव्हा दिवसरात्र माझ्या पाठीशी उभी राहणारी, एखाद्या सुरक्षा कवचासारखी असलेली! माझ्या घरच्या सणा-समारम्भाला स्वतःच्या घरचे कार्य समजून जीव खपवणारी! तिच्या माहेरी गेली की त्या गावातून माझ्यासाठी खोट्या मोत्यांच्या बांगड्या आणणारी! मी साडी नेसून तयार झाले की 'काळो टीको करजो बेन, भूलता नही' असं आठवणीने सांगणारी..पैश्याच्या मोबदल्यात काम करणारे लोक असतात, पण त्या जमाखर्चाच्या पुढे जाऊन आपल्या आतलं काहीतरी आजूबाजूला वाटत जाणारी ही योगिनी!

शाळेच्या रियुनियन साठी माझं चौदा पंधरा वर्षांनी नागपूरला जाण झालं. दोन तीन दिवस मजेत घालवल्यावर परतीसाठी एअरपोर्ट वर आले. आणि समोर साक्षात प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे बसलेले दिसले. प्रकाश आमटेंच आत्मचरित्र 'प्रकाशवाटा' वाचल्यापासून मी भारावले होते. आज चक्क ते समोर बसलेले..मी थोडस घाबरत त्यांच्याजवळ गेले. नाव सांगितलं आणि नंतर मात्र त्यांच्या अघळ-पघळ वैदर्भीय स्वभावाने विरघळून गेले. मग हिम्मत करून दहा मिनटं बोलले. त्यांनी नागपूरचे दोन तीन रेफरेंस सांगितले. 'हिची' बहिण नागपूरच्या सुळ्यान्कडे दिली आहे' असं सांगितलं, आपुलकीने चौकशी केली, मला त्यांच्याबरोबर फोटो काढू दिला. आधी 'सर' म्हणून केलेली सुरुवात शेवटी त्यांना 'काका' असं संबोधण्यापर्यंत गेली.  'तुमचं पुस्तक वाचलं होत तेव्हापासून एक गोष्ट करायची होती', असं म्हणत मी दोघांना वाकून नमस्कार केला'. खास नागपुरी शैलीत दोघांनी हात जोडून मला तोंड भरून आशिर्वाद दिले. आभाळाएवढ्या कर्तृत्वाची ऋषितुल्य माणसं! त्यांच्या व्यक्तीमत्वातील तेजस्वी झळाळी त्यांच्या विनम्र वागण्याने कशी लपणार? समाजासाठी रान वेचणारे, त्या आदिवासी बांधवांसारखेच इतर असंख्य लोकांमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ओलावा पसरवणारे आमटे कुटुंबीय-  त्यांना कल्पना नसेल, पण ही भेट माझ्या मनावर कायमचा एक सुखद शिडकावा करून गेली.

एकदा एका गुरुवारी जरा उशिरा देवळात गेले. जवळ जवळ देऊळ बंद होण्याची वेळ झाली होती. दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर ओट्यावर येऊन बसले. "घ्या", अचानक कोणीतरी बोललं म्हणून चमकून बघितलं तर एक मध्यमवयीन स्त्री समोर एक मोठी पिशवी घेऊन उभी होती. त्या पिशवीत सुंदर गुलाबी रंगाचे सॅटिनचे रेशमाने भरलेले बटवे होते आणि काही लहान लॅमिनेट केलेले कार्डस्. बोललेला नवस फेडायला म्हणून तिने काही गोष्टी मुद्दाम बनवून घेतल्या होत्या. "भाविकांना वाटायच्या आहेत, घ्या तुम्ही", तिने आग्रह केला. मी एक बटवा उचलला. आत स्फटिका सारख्या चमकणाऱ्या मण्यान्ची सुंदर जपमाळ आणि लहान पुडीत सुका मेवा होता. मी थँक्स म्हणून ते घेतलं. तर तिने अजून आग्रह केला. "प्लीज अजून घ्या, हवे तितके, तुमच्या लोकांना वाटा". असं म्हणत 15/20 बटवे तिने हातात दिले. गणपतीची बारा नावं असेलेले छोटे कार्डस पण. हसून निघून गेली. मग मी तो अनपेक्षितरीत्या मिळलेला खजिना घेऊन निघाले. शेजारी काही घरांमध्ये दिले. आई, ताई, सगळ्यांना वाटले. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर अवचित मिळालेल्या त्या  सुबक प्रसादाने वेगळंच हसू उमटत गेलं.. अभावितपणे कोणीतरी केलेल्या कृतीचा आनंद कसा चेन रिऍक्शन सारखा द्विगुणित होत पुढे सरकला होता..

शोधायच्या म्हटल्या तर आयुष्यात अश्या कित्येक सुवासिक आठवणी आहेत. कोणीतरी अगदी सहज केलेल्या लहान लहान कृतींमधून मिळालेला निर्भेळ आनंद..मग ते मला बघून खुदूखुदु हसणारे एखादे लहानगे बाळ असो, की लिखाणावर आलेली एखादी अपरिचित पण दिलखुलास प्रतिक्रिया असो. आपली चूक ही होते की आपण आयुष्यातले कठीण प्रसंग जास्त कुरवाळतो आणि अश्या खर्याखुऱ्या आनन्दाला मुकतो. ह्या संदर्भात व्हिलिअम वर्डसवर्थ ह्यांनी लिहिलेली एक ओळ कायम लक्षात राहील..

‘The best portion of a good man's life is his little, nameless, unremembered acts of kindness and of love.’

सुगन्ध काय फक्त फुलान्चे नसतात. काही काही माणसे आणि त्यांची कर्तृत्वे पण सुगंधी असतात. अनाहूत पणे आपल्या आयुष्याला स्पर्श करून जातात. आयुष्यात कायम अश्या मधुबनी व्यक्तित्वांना ओळखण्याची आणि जोपासण्याची बुद्धी मिळो हेच देवाकडे मागणे आहे.

जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो,
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो,
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो,
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो,
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो,
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो,
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो,
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो,
उरीच ज्या आढळले हो!

– बा. भ. बोरकर







टिप्पण्या

  1. अप्रतिम .... मी पण आठवणीत रमले

    उत्तर द्याहटवा
  2. उत्तम
    अलंकारिक शब्दात गुंफलेला अप्रतिम लेख keep it up dear

    उत्तर द्याहटवा
  3. Human sentiments of the highest order and great that you could identify and vibrate with those and on top of it having marvelous ability to express them thw write words 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!