महागायक
किशोरकुमारवर काही लिहायचं म्हणजे खूप धाडस पाहिजे. एकतर तो चित्रपटसंगीत जगतामधील बापमाणूस!! ऑथोरिटी एकदम! त्यात त्याच्यात आकंठ बुडालेल्या चाहत्यांचा अजस्त्र मोठा कळप आहे. कुठे एखादा शब्द कमीजास्त लिहिल्या गेला, तर (कमीतकमी digitally) चाल करून येणारा घोळका थोपवू शकणार असाल तरच लिहावं! हा असा फॅन्कलब भारतात फार कमी जणांच्या नशिबात आलाय. त्याच्या पश्चात इतकी दशके उलटून गेली तरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे लोक लाभलेत यावरून त्याची पुण्याई लक्षात यावी! पण तरी आज (त्या फॅनक्लब ची भीती दूर सारून) हिम्मत करून त्याच्यावर चार ओळी लिहिणार आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा असलेल्या महागायकाबद्दल थोडी कृतज्ञता म्हणून! खरंतर मी किशोर ची निस्सीम चाहती नाही! (There..I said it!). मी त्याला तासंतास ऐकते. पण मधूनच रफीचं 'लिखे तुझे खत तुझे' ऐकू येतं..मधेच लताच 'ये रातें नई पुरानी' वाजतं, अचानक आशाचं 'साथी रे, भूल ना जाना मेरा प्यार' कासावीस करून जातं आणि मी मग किशोरला विसरून ह्या सगळ्या मंडळींमध्ये रमते. कुठे मर्मभेदी बोल, कुठे काळीज चिरत जाणारे आर्त स्वर, कुठे ...