महागायक

किशोरकुमारवर काही लिहायचं म्हणजे खूप धाडस पाहिजे. एकतर तो चित्रपटसंगीत जगतामधील बापमाणूस!! ऑथोरिटी एकदम! त्यात त्याच्यात आकंठ बुडालेल्या चाहत्यांचा अजस्त्र मोठा कळप आहे. कुठे एखादा शब्द कमीजास्त लिहिल्या गेला, तर (कमीतकमी digitally) चाल करून येणारा घोळका थोपवू शकणार असाल तरच लिहावं! हा असा फॅन्कलब भारतात फार कमी जणांच्या नशिबात आलाय. त्याच्या पश्चात इतकी दशके उलटून गेली तरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे लोक लाभलेत यावरून त्याची पुण्याई लक्षात यावी! पण तरी आज (त्या फॅनक्लब ची भीती दूर सारून) हिम्मत करून त्याच्यावर चार ओळी लिहिणार आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा असलेल्या महागायकाबद्दल थोडी कृतज्ञता म्हणून!


खरंतर मी किशोर ची निस्सीम चाहती नाही! (There..I said it!). मी त्याला तासंतास ऐकते. पण मधूनच रफीचं 'लिखे तुझे खत तुझे' ऐकू येतं..मधेच लताच 'ये रातें नई पुरानी' वाजतं, अचानक आशाचं 'साथी रे, भूल ना जाना मेरा प्यार' कासावीस करून जातं आणि मी मग किशोरला विसरून ह्या सगळ्या मंडळींमध्ये रमते. कुठे मर्मभेदी बोल, कुठे काळीज चिरत जाणारे आर्त स्वर, कुठे गुंगवून टाकणारे संगीत. जुने हिंदी चित्रपट संगीत म्हणजे एक किमया आहे. त्यात प्रत्येक गायकाचे स्वतःचे मानाचे राखीव स्थान आहे. किशोर ह्या सगळ्या किमयागारांमधला एक प्रमुख जादूगार. लतादीदी ची आदरयुक्त भीती वाटते, आशाची नखरेल गाणी दिल खुश करुन जातात, मुकेश रडवतो, रफी त्याच्या अफाट रेंज ने स्तंभीत करतो. किशोर मात्र एकटा ह्या सगळ्या भावनांना स्वतःच्या परिघात एकवटून बसलाय. त्याच्या गायकीवर प्रेम करावं, की रडावं, की बेहद्द खुश होऊन हसावं, की उदास व्हावं ते कळेकळेपर्यंत किशोरकुमार नावाचं गारुड ऐकणाऱ्याच्या मनावर आणि कानावर चढलेलं असतं.

माझ्यासाठी किशोर 'चहा' सारखा आहे. रोजच्या सवयीचा, वाटेल तेव्हा उकळून पिण्यासारखा आणि थोडासा गृहीत धरलेला. आणि म्हणूनच कदाचित ह्या सगळ्या मातब्बर मंडळींपेक्षा किंचित जास्त जवळचा!  मी जन्मजात चहाबाज आहे. कोणी नुसतं चहा करू का असं विचारलं तरी माझ्या मनात तो चहा रुंजी घालायला लागतो. माझ्यासाठी चहा म्हणजे एक उत्सव जो रोज साजरा करता येतो. मला चहा कसाही चालतो - महाराष्ट्रात करतात तसा दूध पाणी वेगवेगळं तापवून केलेला, गुजराती लोकांसारखा आलं आणि भरपूर मसाले टाकून मस्त एकत्र आटवून केलेला, पावसाळ्यातला गवती चहा घालून उकळलेला, किंवा मग उन्हाळ्यातला थोडासा पुदिना घालून केलेला. मुद्दा असा की चहा पिण्या अगोदर तो आधी माझ्या मनात तयार होतो, गॅसवर मंद उकळत असतो तेव्हाचा एक anticipatory आनंद आणि दरवाळणारा गोड सुवास आणि पहिला घोट घेतल्यावर मिळणारे आत्मिक समाधान! चहा पिणे ही एक प्रोसेस आहे. माझ्या मनातला किशोर अगदी तसाच. आज काय ऐकायचं म्हणून मनात दबा धरून बसलेला उत्साह तसाच, मग गाणी शोधण्यातली मजा तीच, आणि वेगवेगळ्या मूड ची गाणी स्वस्थचित्ताने कान भरून ऐकणे पण तसेच..एक पूर्ण प्रोसेस! किशोर सुद्धा एक उत्सव आहे जो आपण सारेच जवळजवळ रोज साजरा करतो.

काही बाबतीत माझी मत ठाम आहेत. उदा. लता आणि किशोर ह्यांनी वेगवेगळी गायलेली सारखी गाणी, ही बहुतेक वेळा लताची वरचढ आहेत. 'रिमझिम गिरे सावन'.. लताच्या गाण्यात त्या 'गिरे' वर ती अर्धी नोट वर गाते आणि त्यामुळे त्या गाण्याला अजून गोडवा आलाय. 'चंदा ओ चंदा' किंवा 'मेरे नैना सावन भादो' ह्या गाण्यांचं पण तेच. कधी तरी रफीच्या आवाजात जास्त माधुर्य आणि भाव जाणवतात. तो काही गाणी चक्क हसऱ्या स्वरात गाऊ शकतो. करुण भाव मुकेशनेच आळवावा. 'कस्मे वादे प्यार वफा सब बातें है, बातोंका क्या'..हे जीवघेणं गाणं फक्त मन्ना डे गाऊ शकतो.

पण तरीही, किशोर एक अजब मिश्रण आहे. 'जा रे जा रे कारे कागा..' म्हणत आपल्याला त्यानेच मनमुराद हसवावं. 'चांदनी रे झूम' म्हणत त्याच्या बिटिया रानी साठी अंगाई त्यानेच गावी. 'एक रूठी हुई तकदीर जैसे कोई, खामोश ऐसे है तू तसवीर जैसे कोई' म्हणत नायिकेवर कटाक्ष त्यानेच टाकावा. 'रूप तेरा मस्ताना' म्हणत भोवतालच तापमान त्यानेच वाढवावं. 'तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नही' असं म्हणत सरणाऱ्या काळाला त्यानेच क्षणभर थांबवावं. 'कभी पलकों पे आँसू हैं, कभी लब पे शिकायत है;  मगर ऐ ज़िन्दगी फिर भी, मुझे तुझसे मोहब्बत है.. ' हे बहुतेकांच्या मनातले भाव त्यानेच प्रकट करावेत. 'साथी ना कारवा है, ये तेरा इम्तिहान है' विषण्ण करणाऱ्या एकटेपणामध्ये त्यानेच साथ द्यावी; 'कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभीं तो ढलेंगे'..उदास मनावर हळुवार फुंकर त्यानेच घालावी. 'याद तू आये, मन हो जाये, भीड के बीच अकेला'..म्हणत आपल्या प्रेयसीची आठवण त्यानेच काढावी. 'मनमीत जो घाव लगाये उसे कौन मिटाये'..त्यानेच विचारावं! 'तुमने कभी किसी से प्यार किया??' असं विचारत अक्ख्या तरुणाईला त्यानेच जागवावं. "प्यार तुम्हे किस मोड पे ले आया.." वेडगळ भावंडांची गमतीदार समजूत त्यानेच घालावी. 'राह पे रहते हैं...यादोंमे बसर करते है" अशी मनाला हुरहूर पण त्यानेच लावावी. मानवी मनाच्या अगणित भावना आणि त्यावर चढलेला त्याचा अजरामर साज!

चाहत्यांना मनमुराद हसवण्याचा जणू पण घेऊन तो धरतीवर अवतरला होता. 'इना मीना डिका, पांच रुपैय्या बारा आना; मै हू झूम झूम झुमरू; मेरी प्यारी बिन्दू' असल्या कित्येक गाण्यांतून आणि बरेचदा त्यात स्वतः वेडेवाकडे नाच करत करत त्याने सगळ्याना दिलखुलास हसवलंय. किशोर चा genre म्हणजे थोडासा मनमौजी प्रकारातला. स्वैर उडत्या चालीची, हलकी फुलकी रोमँटिक गाणी गाण्यात त्याचा हातखंडा. भक्तीगीत, गजल ह्या पठडीतली त्याची गाजलेली गाणी तशी कमीच. पण आयुष्याबद्दल चार तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगणारी कित्येक अर्थपूर्ण गाणी त्याने चिरंजीवी केली आहेत. 'ये जीवन है', "जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, वो फिर नाही आते'; "जिन्दगी का सफर, है ये कैसा सफर" ह्या गाण्यांमधली व्याकुळता न समजू शकणारा माणूस विरळाच! "गाडी बुला रही है, सीटी बजा रही है", हे गाणं मी लहानपणी पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा बालगीत असेल असे समजून खूप हसले होते. "आते है लोग, जाते है लोग..पानी के जैसे रेले; जाने के बाद आते है याद, गुज़रे हुए वो मेले"; हे कडव्याचे शब्द मोठे झाल्यावर आणि आलेल्या अनुभवांमुळे मनावर कोरले गेले. 'इक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नही'..हे गाणं ऐकलं की अवचित जग सोडून गेलेला कलीग आठवतो. 'पुढच्या आठवड्यात मीटिंग घेऊन ठरवून टाकू' असं आश्वासन देत परत कधी न भेटलेला तो उत्साही, थोडासा गबाळा पण सगळ्यांचा लाडका जीव आठवतो. त्याच्या जाण्याची दु:खद बातमी कळली तेव्हा रेडिओवर किशोर हेच गाणं गात होता.

सत्तर आणि ऐंशी च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीला सुगीचे दिवस आले होते. कर्णमधुर संगीत, अप्रतिम बोल अणि जोडीला एकाहून एक कसलेले गायक/ गायिका. 'सदाबहार' हा शब्द उच्चारला की आजही त्यापुढे 'नग्मे' हा शब्द न उच्चारता ऐकू येतो की नाही? किशोरकुमारने ह्या काळात गायलेल्या गाण्यांबद्दल माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अमिताभ बच्चन आणी राजेश खन्ना (आणि काही अंशी ऋषी कपूर) ह्यांचा अपवाद वगळता मला प्रत्येक गाण्यात स्वत: स्टुडिओ मध्ये गात असलेला किशोरच दिसतो. त्याच्या गाण्यांना पडद्यावर समर्थपणे पेलण्याची ताकद सगळ्या कलाकरांकडे नव्हती. अर्थात ह्यात त्या कलाकारान्चा दोष नाही. ही निव्वळ त्याच्या प्रतिभेची उंची आहे. आणि जोडीला गुलजार, बर्मन, आनंद बक्षी, लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या सगळ्या विभूतींनी एकमेकांना प्रोत्साहन देत घडवलेल्या सुरेख कलाकृतींचही तितकंच श्रेय आहे.

त्याचा आवाज खास बंगली पठडीतला. त्याच्या नंतर येऊ घातलेले कित्येक नवीन 'प्रती किशोर' बंगाल मधूनच पुढे आले. उदा. कुमार सानू, अभिजीत, बाबुल सुप्रियो आणी असे अजून कितीतरी..पण त्याच्या आवाजात होता तो 'थ्रो' कोणाच्याच आवाजात नाही. 'अब सोचूँ तुम्हें, याद नहीं है अब सोचूँ नहीं भूले....वो सावन के झूले'..अंगावर काटा यायला ही ओळ पुरेशी आहे. त्याच्या आवाजातली हळुवार मखमल पण दुसऱ्या कोणाकडे नाही..'छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा'..मउसूत गाणं!

किती गाणी आठवावीत. ते आभाळाला गवसणी घालण्यापेक्षा अवघड काम. त्याने आपल्याला तीन चार दशके इतक भरभरून दिल. पण तरी माझी काही स्वप्ने अर्धवटच राहिली. इतर गायकांची गाणी त्याच्या आवाजात ऐकायची इच्छा अपूर्णच राहिली. एका कार्यक्रमात त्याने लता चं 'तेरे बिना जिया जाये ना' दोन ओळी म्हटलं होतं - अप्रतिम! रफी चं 'कौन है जो सपनोमे आया' हे गाणं मला किशोरच्या आवाजात ऐकायचं होत. खास ते शेवटचं 'ओ प्रिया' त्याच्या बुलंद शैलीत ऐकायला आवडल असतं. 'कई बार यूं भी देखा है'.. रजनीगंधा मधील हे मुकेश चं प्रसिद्ध गीत..त्याच्या गळ्यात फिट बसलं असतं. 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा', आणि 'कुछ ना कहो' त्याच्या जिवश्च कंठःश्च मित्राने संगीतबद्ध केलेली शेवटची गाणी, त्याच्या आवाजासाठी मुद्दाम घडवल्यासारखी..ती गायची राहून गेली.

असा अवलिया किशोर! दोन तीन पिढ्या स्वतःच्या खिशात ठेवणारा. आजही सगळे म्यूझिक ऍप्स गाजवणारा, 'कभी अलविदा ना कहना' म्हणत निरोप घेणारा. आपल्यातल्या प्रत्येकाशी वैयक्तिक नाते राखून असलेला. अगणितवेळा ऐकूनही प्रत्येक गाण्यात दर वेळी नव्याने भेटणारा. माझ्यासाठी माझा रोजचा कडक फर्मास चहा - आणि मी त्याची 'चहा'ती - (निस्सीम नसलेली!!)

यादोंकी बारात निकली है आज दिल के द्वारे..
सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे..


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!