म्हैसूर सिल्क आणि बरंच काही
जुन्या घरातून दुसऱ्या घरी सामानाची अदलाबदल सुरु होती. कधीतरी कामी येतील म्हणून ठेवलेल्या कितीतरी वस्तूंची आता गरज नाही हे लक्ष्यात आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रभागात रवानगी करत होते. सरळ फेकून देणे, गरजूना वाटणे, आश्रमात नेऊन देणे किंवा स्वत:बरोबर पुढे घेऊन जाणे हे मुख्य विभाग. अचानक हाती एक साडीचं बोचकं लागलं. सहा वर्षात कधी न बघितलेल्या साड्या अचानक झुळझुळत बाहेर पडल्या. सवयीप्रमाणे प्रत्येकीला नीट न्हाऊ माखू घालून 'ड्राय क्लिनिंग' चं तीट लावून ठेवलं होतं. मी अक्षरश: आनंदाने चित्कारले. ह्या साड्या अंगाला लागून किती वर्षे लोटली होती! प्रत्येकीची स्वतःची कहाणी आणि आठवण. नोकरीनिमित्त गरज होती तेव्हा घेतलेल्या शिफॉन किंवा तत्सम प्रकारातल्या 'लाइटवेट' साड्या, एक दोन थेट लग्नातल्या जरीकाठी आणि नंतर फारश्या न नेसल्या गेलेल्या, एखादी अशीच कोणीतरी भेट म्हणून दिलेली. सगळ्यात शेवटी हाताला अलगद एक म्हैसूर सिल्क लागली. कण्हेरीच्या फुलाच्या रंगाची, नेव्ही ब्लू काठ असलेली. दोन पिढ्यांच अंतर कापून माझ्यापर्यंत पोचलेली. अचानक शहारा आला. कमीत कमी 35/40 वर्षे जुनी साडी असेल. माझ्या आजीची सा...