म्हैसूर सिल्क आणि बरंच काही

जुन्या घरातून दुसऱ्या घरी सामानाची अदलाबदल सुरु होती. कधीतरी कामी येतील म्हणून ठेवलेल्या कितीतरी वस्तूंची आता गरज नाही हे लक्ष्यात आल्यामुळे, वेगवेगळ्या प्रभागात रवानगी करत होते. सरळ फेकून देणे, गरजूना वाटणे, आश्रमात नेऊन देणे किंवा स्वत:बरोबर पुढे घेऊन जाणे हे मुख्य विभाग. अचानक हाती एक साडीचं बोचकं लागलं. सहा वर्षात कधी न बघितलेल्या साड्या अचानक झुळझुळत बाहेर पडल्या. सवयीप्रमाणे प्रत्येकीला नीट न्हाऊ माखू घालून 'ड्राय क्लिनिंग' चं तीट लावून ठेवलं होतं. मी अक्षरश: आनंदाने चित्कारले. ह्या साड्या अंगाला लागून किती वर्षे लोटली होती! प्रत्येकीची स्वतःची कहाणी आणि आठवण. नोकरीनिमित्त गरज होती तेव्हा घेतलेल्या शिफॉन किंवा तत्सम प्रकारातल्या 'लाइटवेट' साड्या, एक दोन थेट लग्नातल्या जरीकाठी आणि नंतर फारश्या न नेसल्या गेलेल्या, एखादी अशीच कोणीतरी भेट म्हणून दिलेली. सगळ्यात शेवटी हाताला अलगद एक म्हैसूर सिल्क लागली. कण्हेरीच्या फुलाच्या रंगाची, नेव्ही ब्लू काठ असलेली. दोन पिढ्यांच अंतर कापून माझ्यापर्यंत पोचलेली.

अचानक शहारा आला. कमीत कमी 35/40 वर्षे जुनी साडी असेल. माझ्या आजीची साडी. तिच्या पश्चात तिच्या साड्यांची वाटणी करत असताना अलगद माझ्या हातात आलेली. तलम, मऊ आणि आजीची होती म्हणून किंचित जास्त भरजरी. मी अलगद उघडून पहिली. तेच नाजूक पोत आणि झळाळी. ती साडी नेसून, अंबाड्यावर गजरा अगर शेवंतीची वेणी नेसून समारंभाला उभी राहिलेली आणि 'बरं दिसतय ना गं पातळ?' असं विचारणारी आजी डोळ्यासमोर आली.

ह्या साडीवरून हात फिरवत होते, तेव्हा अजून एक गोड आठवण जागी झाली. नागपूरच्या आजीची. बाबांच्या आईची. ह्या आजीची गोष्ट थोडी वेगळी. ही आजी नऊवार नेसत असे. तिच्या ट्रंक मध्ये ब्राऊन पेपर मध्ये गुंडाळलेल्या घडीत असलेल्या नव्याकोऱ्या नऊवारी साड्यांची चळत असे. त्या लांबचलांब तलम, काठ असलेल्या साड्या निरखणे हा माझा छंद. प्रत्येक साडीवर पांढऱ्या रंगाची 'पोलकी' स्वत: शिवून ती वापरत असे. रोजची नेसायची नऊवार आजी स्वत: धुवत असे. तिला झेपेपर्यंत. म्हणजे जवळ जवळ ती 80/85 वर्षाची होईपर्यंत. हाताने आपटून, खळबळून, घट्ट पिळून झालं की तो जड नऊवारीचा पिळा आजी खांद्यावर ठेवून व्यवस्थित चौपदरी घडी घालून वाळायला दांडीवर टाकत असे. वयाप्रमाणे तिच्या मानेत कापरे भरलं होतं. हातात तेवढा जोर राहिला नव्हता, पण तिने कधीही ही नऊवारी धुण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर टाकलेली मला आठवत नाही. आजी चणीने लहानशी, शेलाट्या बांध्याची. पांढरे शुभ्र पण लांब केस असलेली. ती नऊवार वाळत पडली की ती केस नीट चापून चोपून त्याची लांब वेणी घालायची आणि मग ती वेणी वळवून तिचा हाताच्या तळव्याएवढा गोल अंबाडा बांधायची. त्यावर आकडे खोचून झाले की कपाळाला भलं थोरलं कुंकू बोटाने नीट गोल पसरवून लावायची. हे सगळं करत असताना तिच्या हातातल्या बांगड्या सतत किणकिणत असायच्या. आणि मान सतत थोडी हलत असे. त्यामुळे की काय, आजीच्या प्रत्येक हालचालीत कमालीची लयबद्धता आली होती. प्रत्येक काम पूर्ण करायची विशिष्ट लय. तिला पुरण पोळ्या लाटताना पहायचे तेव्हाही ती लय उठून दिसायची. आम्ही गोळा करुन आणलेल्या पारिजातकाच्या फुलान्चे हार करत बसायची, तेव्हाही एका सन्थ लयीत तिची बोटे चालत असत. कुठल्याही कामात गोंधळ न करताही ते शान्ततेत आणि वेळेत कश्या पद्धतीने पूर्ण करता येतं ते धडे आजी आम्हाला दाखवून देत असे.

त्यात ती तिची ट्रंक! पलंगाखाली घातलेली! मला हुक्की आली, की मी तिला ती उघडायला सांगायचे. त्या सुरेख घडीतल्या नऊवार बघून विस्फरीत होणे ही माझी सवय. एकेकीचे रंग पण गोंडस असत. "आजी ही कोणी दिली होती गं? ही कधी घेतलीस?" असले प्रश्न विचारून मी तिला भन्डावून सोडत असे. ती जमेल तितका आठवणीवर जोर देत तिच्या थरथरत्या आवाजात उत्तरे देई. "मग आता जुन्या सगळ्या देवून टाक, ह्यातल्या नेस", मी हट्ट करायचे. ती कधी ऐकायची तर कधी हसण्यावर उडवायची. एक दिवस तिच्या मनात आलं आणि मला म्हणाली, 'सगळ्या बहिणींना बोलवून घे, आपण नऊवारीची लूट करु'! Yay! मी लगेच नागपुरात होत्या तितक्या आत्येबहिणींना, वहिनींना निरोप देऊन आले. आणि मग प्रत्येकीने तिच्या आवडीची एक एक नऊवार घेतली. आजीच्या एका किरमीजी नऊवारीवर नव्या कोऱ्या नऊवारीवर माझं खूप प्रेम होतं. ती अर्थात मला मिळाली. तीतून दोन ड्रेस शिवून झाले.

पण ही गोष्ट नुसती माझ्या आज्यांकडून मिळालेल्या भेटींची नाही. नकळत त्या साड्यांमार्फत जे संस्कार, आशीर्वाद माझ्यापर्यंत पोचले होते, त्याची आहे. माझ्या दोन्ही आज्या वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या. वेगळे संस्कार घेऊन दोघीनी त्यांचे संसार केले. तरीही दोघींमध्ये एक खूप सारखा दुवा मला जाणवतो. कदाचित त्या पिढ्यांमधील सगळ्याच जणी त्याच अदृश्य दुव्याने बांधल्या गेल्या असतील. आणि तो म्हणजे प्रचंड मानसिक बळ ठेवत, उत्साही आयुष्य जगण्याचा मंत्र. तेव्हाच्या स्त्रियांना मी कधी उदास, रडवेलं पाहिलंच नाही. सतत कामात गढलेले हात; सुखी, समाधानी, प्रसन्न चित्तवृत्ती. शांत, स्थिर मानसिक स्थिती, जी हल्ली जरा कमीच दिसून येते. कोणाकडून अपेक्षांच ओझं नाही, की खूप कोणामधे भावनिक रित्या गुंतून पडण्याची सवय नाही. एखाद्या गरजवंताला मनापासून धीर देऊन, मदत करून मनाने पटकन वेगळं होण्याची खम्बीर वृत्ती. आज attachment आणि detachment ह्यातला फरक समजून घ्यायला अध्यात्माचे क्लास लावावे लागतात. सगळ्या सुखसोयी असताना मलूल होणाऱ्या मनाला समजवायला counsellors गाठावे लागतात. त्यावेळच्या परिस्थितीत हे असले त्रास बायकांच्या खिजगणतीत नसायचे.

स्वत:ला फेमिनिस्ट म्हणवणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत हक्क, स्वातंत्र्य ह्याचा आरडा ओरडा करणाऱ्या भगिनी पाहिल्या की मला आजीच्या पिढीतल्या बायका आठवतात. अवघ्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या, त्यांच्या परिघामध्ये स्वतःचा आब राखून असलेल्या आणि आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी दृष्टिकोन असलेल्या ह्या खऱ्या फेमिनिस्ट स्त्रिया! सायन ची आजी मी सुट्टीत मुंबईला गेले, की माझा छंद ओळखून माझ्या बोटाला धरून लायब्ररी मध्ये बसवून यायची. आम्हाला हाताला धरून, निरनिराळ्या बसेस बदलून अख्खी मुंबई पालथी घालायची. माझा प्रत्येक गुण सगळीकडे वाखाणून सांगायची. कधी कुठल्या गोष्टीचं मनावर दडपण आलं की 'तू काही काळजी करू नकोस बेटा, मी तुझ्या पाठीशी आहे' असं खंबीर आश्वासन द्यायची. मनातली भीती पटकन दूर पळून जात असे. (ती दुसऱ्याचं घर उन्हात बांधायची आमची गंम्मत चक्क मी नववीत होते तोवर चालली 😄).

नागपूरच्या आजीची शिस्त वेगळी. त्यावेळी थोडी कडक वाटायची. तिला देव आणि धार्मिक कुलाचारांचं खूप होतं. त्याबाबतीत कमी जास्त चालत नसे. घरातल्या प्रत्येक मुलीने स्वयंपाक घरात सहभाग घेतलाच पाहिजे हा तिचा अलिखित नियम होता. कसे बसायचे, कसे वागायचे ह्या बाबतीत ती खूप जागरूक असे. तिच्यामुळे आम्ही बहिणी लहान असल्यापासून पुष्कळ शिस्तीत जगलो. त्या शिस्तीचे महत्त्व आज समजतंय. काही गोष्टी आता आयुष्याचा हिस्सा बनून राहिल्या आहेत. कधी कधी निव्वळ त्या शिस्तिच्या जोरावर बरेच प्रसंग निभवून नेता येतात. प्रेमळ शिस्तीने तिने आटोक्यात ठेवलेलं तिचं भलं मोठं कुटुंब आजही बऱ्यापैकी एकत्र आहे. ह्या हिशेबाने मला माझ्या दोघी आज्या खऱ्या फेमिनिस्ट वाटतात.

काल परवा एका वेबसाईट वर मेडिटेशन चे प्रकार बघत होते. 'Meditation to reignite your inner feminine energy' असं काहीतरी वाचलं आणि चक्रावले. अरेच्या..हल्ली ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात? मी उभं आयुष्य अश्या शक्तिस्वरूप स्त्रियांना डोळ्यासमोर बघितलंय. आजी, आई, काकी, मावशी, आत्याच्या स्वरूपात. कुटुम्बा वर सावली धरायला, वळण लावायला आणि त्या मेडिटेशन मध्ये होतं तस 'nurture' करायला त्यांना कधी अशी गरज भासली नाही. मग आपल्या पिढीला काय झालंय?

काही महिन्यांपूर्वी एक परिचयाची - मैत्रीण म्हणणार नाही कारण तितकं सहज आमचं नातं नव्हत- तिच्या अचानक जाण्याची बातमी कानावर पडली. डिप्रेशन मधे जाउन, हळूहळू तब्येतीवर निरनिराळे आघात घेवून, झिजून गेली. पाठोपाठ मागे वेगवेगळ्या थेअरीज. 'मनाने खचली होती, नवरा दारू पित होता, सासूशी पटत नव्हतं, मैत्रिणींनी भांडण केलं होतं म्हणून एकटी पडली होती' वगैरे वगैरे. सगळं ऐकताना मी बधीर झाले. तिचं अचानक लोकांशी संबंध तोडून टाकणे मला जाणवत होतं, पण ही अशी कारणे असतील खरंच? इतक्या क्षुल्लक कारणान्साठी जीव पणाला लावायचा? अशी समोरच्या व्यक्तिमध्ये ती स्वत:ला शोधत बसलीच कशी? थोडसं प्रेम, थोडिशी मान्यता ह्यासाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहण्यातकी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट नाही. राहून राहून मनात विचार येत होता.

आजीच्या पिढी पेक्षा आजची परिस्थिती निश्चित वेगळी आहे. मनाचा खूप कस लागू शकतो असे अनुभव रोज येतात. पण परिस्थिती कशीही असली तरी ज्याला 'स्वमान' (स्वाभिमान नव्हे) म्हणता येईल, तो राखणे आपल्याच हातात आहे ना? स्वत्त्व आपणच जपलं नाही तर जग कशाला जपेल? आज कोणाकडे खरंच एवढा वेळ नाही. आता परत अशी स्वतःला हरवून बसलेली दुसरी अलका कुठे दिसू नये म्हणून प्रत्येकीने काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतः स्वतःची मैत्रीण व्हा, मार्गदर्शक व्हा, स्वत:मधलं वैशिष्ट्य ओळखा. त्यासाठी बाहेर जाऊन कर्तृत्व गाजवायची अट नाही. नोकरी, करीअर, घर, संसार, मुलं ह्या सगळ्याच्या पुढची ही गोष्ट आहे. हे आपलं आपल्या गाभ्याबरोबर तुटलेल्या नात्याबद्दल आहे. ते पुन्हा जोडायची जबाबदारी फक्त आणि फक्त आपली स्वतःची आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी उभ्या ठाकलेल्या स्त्रिया कधीच एकट्या, दुबळ्या पडू शकत नाहीत.  

हा 'स्वमान' कसा जपायचा तेच नेमकं आधीच्या पिढ्यातील ह्या प्रगल्भ स्त्रियांनी दाखवून दिलंय. कुठल्याही counsellor च्या मदती शिवाय. माझ्या दोन्ही आज्यांनी आयुष्यात खूप कष्ट भोगले. एकीने स्वतःचं वडिलोपर्जित घर एका हिन्सक दंगलीत भस्मसात होताना बघितल, तर दुसरीने तिच्या डोळ्यादेखत तिच्या 3 लहान मुलान्चे मृत्यू पाहिले. एवढ दुःख पचवूनही एक सात्विक पण अर्थपूर्ण जीवन जगलेल्या ह्या पिढीचे मनोबल कधी घटले नाही. स्वत:वरचा विश्वास कधी खचला नाही. माझ्या साध्यासुध्या आज्यान्चा कधी कोणी येता जाता अपमान करू शकत नव्हतं, त्यांना सहजा सहजी गृहीत धरू शकत नव्हतं. माझी खात्री आहे बाकी सगळीकडे सुद्धा अश्याच आज्या असतील. डोळे उघडे ठेवून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली तरी आज कित्येक समुपदेशकांचे दवाखाने ओस पडतील.

व्हिटनी ह्युस्टन चं एक नावाजलेलं गाण आहे. त्यात हे भाव समर्पक उतरले आहेत

I decided long ago
Never to walk in anyone's shadows
If I fail, if I succeed
At least I'll live as I believe
No matter what they take from me
They can't take away my dignity

Because the greatest love of all
Is happening to me
I found the greatest love of all
Inside of me
The greatest love of all
Is easy to achieve
Learning to love yourself
It is the greatest love of all

स्वतःवर अंगीभूत गुणदोषान्सहीत प्रेम करणे प्रत्येकीला जमले पाहिजे. मन:शांती, आरोग्य आणि आनंद मिळवण्याची ही पहिली पायरी आहे.

आजीच्या म्हैसूर सिल्क च्या निमित्ताने मनात एकापाठोपाठ एक आलेले विचार! हे सगळ आपल्याला माहीत असतंच, पण ह्या कोलाहलाच्या युगात कदाचित आपल्याला ह्या उजळणीची वेळोवेळी गरज भासते. ते त्या साडीमुळे मनातून बाहेर पडलं इतकंच!








टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!