समीकरणाचे नियम
"समीकरणाच्या बरोबर चिन्हांच्या डावीकडील संख्या उजवीकडे गेल्यास अथवा उजवीकडील संख्या डावीकडे गेल्यास त्या संख्येचे चिन्ह---" "बदलते" तारस्वरात आम्ही दोघी ओरडायचो. "समीकरणाच्या दोन्ही बाजूंस एकाच संख्येने गुणिले अथवा भागीले असता समीकरणाची किंमत"-- - " बदलत नाssssही" रोज संध्याकाळी देवापुढे दिवेलागणी झाली आणि शुभंकरोती म्हणून झाली की आमची शिकवणी सुरू होई. एकीकडे स्वयंपाक घरातून येणारा आईने वरणाला घातलेल्या खमंग फोडणीचा वास, दुसरीकडे देवापुढच्या उदबत्तीचा घमघमाट, आजी आजोबांची त्यांच्या खोलीत चालणारी खुडबूड आणि ह्या सगळ्याला व्यापून त्यावर घुमणारा बाबांचा खर्जातला स्वर. एक वेगळच रसायन तयार होत असे. रोजचे विषय वेगळे, दुसऱ्या दिवशी मग शुद्ध तरखडकरी बाजातून इंग्लिश चे वर्ग भरायचे. तर कधी तरी मराठी व्याकरणाचे वृत्त आणि अलंकार. मोरोपंतांची आर्या, भुजंगप्रयात, मंदारमाला, शार्दूलविक्रीडीत हे अलंकार आणि त्याची उदाहरणे नीट सुरात म्हणून दाखवत बाबा आमच्याकडून पाठांतर करून घेत असत. तर कधी भौतिकशास्त्राचे धडे - हा बाबांचा अत्यंत आवडता विषय. महत्त्वाची गोष्ट म्...