समीकरणाचे नियम
"समीकरणाच्या बरोबर चिन्हांच्या डावीकडील संख्या उजवीकडे गेल्यास अथवा उजवीकडील संख्या डावीकडे गेल्यास त्या संख्येचे चिन्ह---" "बदलते" तारस्वरात आम्ही दोघी ओरडायचो.
"समीकरणाच्या दोन्ही बाजूंस एकाच संख्येने गुणिले अथवा भागीले असता समीकरणाची किंमत"-- - " बदलत नाssssही"
रोज संध्याकाळी देवापुढे दिवेलागणी झाली आणि शुभंकरोती म्हणून झाली की आमची शिकवणी सुरू होई. एकीकडे स्वयंपाक घरातून येणारा आईने वरणाला घातलेल्या खमंग फोडणीचा वास, दुसरीकडे देवापुढच्या उदबत्तीचा घमघमाट, आजी आजोबांची त्यांच्या खोलीत चालणारी खुडबूड आणि ह्या सगळ्याला व्यापून त्यावर घुमणारा बाबांचा खर्जातला स्वर. एक वेगळच रसायन तयार होत असे.
रोजचे विषय वेगळे, दुसऱ्या दिवशी मग शुद्ध तरखडकरी बाजातून इंग्लिश चे वर्ग भरायचे. तर कधी तरी मराठी व्याकरणाचे वृत्त आणि अलंकार. मोरोपंतांची आर्या, भुजंगप्रयात, मंदारमाला, शार्दूलविक्रीडीत हे अलंकार आणि त्याची उदाहरणे नीट सुरात म्हणून दाखवत बाबा आमच्याकडून पाठांतर करून घेत असत. तर कधी भौतिकशास्त्राचे धडे - हा बाबांचा अत्यंत आवडता विषय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबांनी सुरू केलेली ही आमची शिकवणी ते गेल्यानंतर आजही अबाधित सुरू आहे.
आज जर एका जागी बसून विचार केला तर मला नेहमी एक प्रश्न पडतो, की बाबा आपल्याला इतके ग्रेट का वाटतात? रूढार्थाने, एखाद्या यशस्वी माणसाला ज्या परिमाणांवर तोलल्या जातं त्या सगळ्यात बाबा नक्की हरले असते. वाटेल त्या मार्गाने वारेमाप पैसे कमावणे, सोयीनुसार तत्त्वांना मुरड घालणे, फक्त स्वतःपुरते किंवा स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित जगणे आम्ही त्या वेळीही आजूबाजूला पाहत होतो. पण आपल्या मूल्यांशी तत्त्वनिष्ठ राहून, कधीही कसल्या तडजोडी न करता परिस्थितीशी जो लढा बाबांनी दिला त्याला तोड नाही. त्यांच्या स्वभावामध्ये एक वेगळा शांतपणा आणि स्थैर्य होतं. सतत कार्यरत राहणे, हाती असलेल्या कामामध्ये शंभर टक्के रममाण असणे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मनाचा तोल किंचितही ढळू न देता आनंदी राहणे हे त्यांचे प्रामुख्याने मला जाणवलेले स्वभाव विशेष. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वभावातल्या विरोधाभासाने मला कायम आश्चर्यचकित केलंय. अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले बाबा, विज्ञानाला देव मानणारे बाबा आणि तरी त्यांचा दैवी (आणि काही अंशी अमानवी) शक्तींवर असलेला विश्वास मला कायम कोड्यात टाकतो. विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं, तरी अजून माणसाच्या बुद्धीला पुष्कळ उलगडे व्हायचे आहेत असं ते नेहमी म्हणायचे. खूप शिकलो म्हणजे आपण सर्वज्ञ झालो हा जो भाव बर्याच अंशी तथाकथित 'रॅशनलिस्ट' लोकांमध्ये येतो, त्याबद्दल बाबांना विचारलं की ते त्यांच्या खास शैलीत उत्तर द्यायचे - म्हणजे एखाद्या कवितेच्या ओळींमधून नाही तर श्लोकातून..उदा. देवाबद्दल विचारलं की 'सामर्थ्य आहे चळवळींचे , जे जे करील तयाचे, परंतु तयाजागी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे'..ह्या ओळी त्यांच्याकडून हटकून येत असत. कधीकधी कमालीचे कठोर, परखड वागणारे बाबा, लहान मुलांमध्ये मात्र त्यांच्यापेक्षा लहान होऊन रमायचे. पुढे पुण्याला गेल्यावर तर त्यांचा एक खास बालमित्रांचा ग्रुप तयार झाला होता. दर संध्याकाळी ही मंडळी बाबांकडून गोष्टी ऐकायला आणि खाऊ खायला जमायची. तसे ते कर्मठ म्हणावं इतके धार्मिक नव्हते. पण रोज न चुकता पूजा करायचे. पण देवाशी संपर्क साधायला त्यांना पोथ्या वाचायची गरज पडत नव्हती हे ही तितकंच खरं! कुठल्याही कामात रममाण असताना, मी त्यांच्या तोंडून सतत मनाचे श्लोक, संस्कृत सुभाषिते, गीतेचे श्लोक ऐकले आहेत. भगवदगीतेतल्या 'स्थितप्रज्ञ' म्हणजे काय ह्यावर आजतागायत कितीतरी विवेचने झाली आहेत. पण स्थितप्रज्ञता काय असते त्याचं जिवंत उदाहरण मी बाबांच्या रूपात पाहिलं आहे. "शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः" ही गीतेतली त्यांची सर्वात आवडती उक्ती.. त्याप्रमाणे ते अवघे आयुष्य जगले.
कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या बाबांचं शिक्षण माझ्या मोठ्या काकांनी आणि नंतर त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीने सांभाळलं. इंजिनीअरिंग च्या परीक्षेत ते युनिव्हर्सिटीतून दुसरे आले, आणि मग त्यांचं नागपूरहून मुंबईकडे स्थलांतर झालं. बेताच्या परिस्थितून वर आलेल्या एखाद्या तरुण मुलाला अचानक महानगरात गेल्यावर जे अनुभव येतात, ते त्यांनाही आले. पण कुठलाही न्यूनगंड न बाळगता, ते आत्मविश्वासाने मुंबईत स्थिरावले, क्रॉम्प्टन ग्रीवस् सारख्या प्रचंड मोठ्या कंपनीत ते क्वालिटी कंट्रोल आणि रिसर्च सारख्या विभागातून उच्च पदावर कार्यरत होते. स्वतःचा जम बसवत असतानाच त्यांनी लहान भावंडांची जबाबदारी घेतली व त्यांना शिक्षणासाठी मुंबइत ठेवून घेतलं. पुढे जर्मनीला जाण्यासाठीं कंपनी ने बॉण्ड भरायला सांगितल्यावर, (आणि ते त्यांना मान्य नसल्याने,) तितक्याच सहजपणे मुंबइतल्या समृद्धीकडे पाठ फिरवून बाबा आमच्या सगळ्यांसह नागपूरला परतले. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
व्यवसायात येणाऱ्या सगळ्या यश -अपयशाला पचवताना त्यांना कित्येक कडूगोड प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तरीही भागीदारीत झालेले विश्वासघात, त्यामुळे येणाऱ्या सांपत्तिक अडचणी, घरातल्या न संपणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या साऱ्यातून मी बाबांना एक व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळं काढू शकते. दुर्दम्य इच्छाशक्ती, अतिशय कामसू स्वभाव आणि मानसिक सामर्थ्याचा कस लागत असताना, येणाऱ्या प्रसंगाला न डगमगता सामोरं जाण्याच्या चिवट वृत्तीची कास त्यांनी कधीच सोडली नाही. कुठल्याही वाईट अनुभवाची कटुता मनात झिरपू न देता, सतत प्रयत्नरत राहणे, आणि ह्या सगळ्यातून वेळात वेळ काढून, गरजवंताला मदत करणे, त्यांना चार अनुभवाचे बोल सुनावणे आणि गरज असेल तेव्हा कुटुंबियांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे राहणे हे काही मला जाणवलेले बाबांचे गुणविशेष! स्थितप्रज्ञतेचा याहून वेगळा अर्थ मला उमजलेला नाही.
बागकाम करणे हा त्यांचा छंद होता. मला नेहमी वाटायचं, की बाबांनी मुंबईची नोकरी सोडून नागपूरला येण्यामागे त्यांची बागकामाची आवड होती नक्की. नागपूरचे घर बांधून झाल्यावर अंगणात आणि उरलेल्या जागी त्यांनी रीतसर बागकामाला सुरुवात केली. बघता बघता अंगण वेगवेगळ्या झाडांनी भरून गेलं. तगर, शेवंती, झेंडू, मोगरा, निशिगंध आणि एक छोटीशी गुलाबाची बाग समोरच्या अंगणात तर पेरू, अंजीर, सीताफळ, आंबा, पपई इ फळांची झाडे मागच्या अंगणात. जोडीला जागा मिळेल तिथे भेंडी, टोमॅटो, वांगी, अळू, लिंबू, तुरीच्या शेंगा ही मंडळी दाटीवाटीने उभी असायची. आणि मग गच्चीला एकटं कसं सोडायचं ह्या उदार विचारामुळे गच्चीवर घोसाळ्याचे आणि डबल बी चे वेल. बाबा तासन्तास त्यांच्या बागेत काम करायचे. झाडांची आणि त्यांची खूप गट्टी जमली होती. प्रत्येक झाडाला उत्कृष्ट प्रतीचे फळ, फूल यायचे. पण गुलाबाच्या बागेवर त्यांचं विशेष प्रेम! 7/8 कलमी गुलाबाची रोपं होती आणि त्यांना भरभरून फुलं यायची. एकेका झाडाला एका वेळी 30/40 फुलं सहज असायची. ही झाडं बाबांचा जीव की प्राण! एकदा कोणीतरी गुलाबाची फुलं ओरबाडून तोडून घेऊन जातंय अस लक्ष्यात आलं. तसे बाबा सरसावले. पहाटे ३/४ वाजता उठून लक्ष ठेवू लागले. एक दिवस एक आजोबा अलगद जाळ्यात सापडले. आपली चालायची छडी आत घालून त्या आकड्याने फुलं काढायचा ते प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना बाबांनी गाठलं. त्यांना म्हणाले, 'तुम्हाला हवी तर मी नीट कात्रीने कापून देतो, देवासाठी नेत असाल ह्याची कल्पना आहे. पण अशी ओरबाडून नेऊ नका. किती लागतील ती सांगा मी स्वतः देतो.' आजोबा बिचारे खजील होऊन उभे होते, बाबांनी त्यांना स्वतः काही फुलं दिली. त्यादिवशी पासून फूलचोरी बंद झाली. त्यांनी आवडीने लावलेल्या दशेरी आंब्याच्या झाडाला मात्र म्हणावं तसं फळ येत नसे. दर वर्षी वेगवेगळे उपाय करून व्हायचे, पण अगदी कमी मोहोर आणि 10/15 आंबे ह्यापलीकडे यश मिळत नव्हतं. योगायोग असा की ज्या वर्षी आईबाबा नागपूर सोडून कायमचे पुण्याला निघाले त्या वर्षी त्या झाडाला शेकड्याने फळं आली. त्यांच्या प्रयत्नांसाठी शेवटचे आशीर्वाद दिल्यासारखी!
एक वडील म्हणून त्यांनी सुजाण पालकत्वाचा आदर्श आमच्यासमोर घालून ठेवलाय. त्यातलं १०% जरी आम्ही पुढच्या पिढीला देऊ शकलो तरी पुरेसं आहे. आमच्या शैक्षणिक विकासाबरोबर कल्पनाशक्तीचा विकास व्हावा ह्याकडे त्यांचं बरोबर लक्ष होतं. आम्ही लहान असताना आम्हाला पौराणिक गोष्टींबरोबर आवर्जून खास वैज्ञानिक गोष्टी सांगीतल्या जायच्या. पृथ्वीपासून खूप दूर असलेला 'कोसोटोटो' ग्रह, त्यावरून एक 'यु एफ ओ' यायची. पण ती फक्त स्पेशल अंजन डोळ्यात घातल्यावरच दिसायची. मग अजय आणि विजय नावाचे दोघे भाऊ त्यात बसून कोसोटोटो च्या सफरीवर निघत आणि मग तिथे येणारे त्यांचे (बाबांच्या कल्पनाशक्तीतून आलेले) अनुभव आम्ही डोळे विस्फारून ऐकत ऐकत कधीतरी गुंगून झोपून जायचो.
मला वाचनाची आवड लागण्यामागे ही त्यांचाच हात. बाबा पट्टीचे वाचक होते, मुंबईत असताना ब्रिटिश कौन्सिल चे सभासद असल्याने त्यांनी भरपूर वाचन केलं होतं. त्यांच्या तोंडून पुस्तकांची नावे आणि विषय समजून घेता घेता माझं नातं पुस्तकांशी कधी जमलं ते मलाच समजलं नाही. स्वयंपाकाची आवड हे त्यांचं अजून एक स्वभाव वैशिष्ट्य. क्रॉम्पटन च्या कॅन्टीन च्या शेफ कडून वेगवेगळे कॉन्टीनेंटल पदार्थ शिकून सगळ्यांना खाऊ घालण्यात त्यांचा हातखंडा! वयात येणाऱ्या दोन मुलींना वाढवताना जे प्रश्न उभे राहतात ते सोडवतानाही त्यांचं वेगळेपण जाणवलं. दोघींचे स्वभावाचे कंगोरे ओळखून त्यात आवश्यक बदल कसे घडवता येतील हा त्यांचा सतत प्रयत्न असे. 'विचार कसा करायचा हे शिका, 'आयुष्यात नाही म्हणणं कठीण आहे, नाही म्हणायला शिका' हा त्यांचा आमच्यासाठी असलेला कानमंत्र होता.
पुढे अमराठी घरी लग्न करायची माझी इच्छा त्यांनी थोड्याश्या विरोधानंतर पण नंतर अगदी मनापासून स्वीकारली. लग्नानंतर मात्र त्यांचा लेकीपेक्षा जास्त जीव जावयावर बसला. त्याला भल्या पहाटे थंडीचं बाहेर जाव लागतं म्हणून स्वतःचा मफलर इस्त्री करून काढून ठेवणे, त्याला सारखा खोकला होतो म्हणून काढे आणि हळदगूळ करून ठेवणे ही सगळी कामं करताना बघून मजा वाटायची.
थोडी समज यायला लागली होती तेंव्हापासून बाबा माझ्याशी राजकारणाबद्दल बोलत. सुरुवातीला कळत नसे. नंतर नंतर गोडी लागली. फार कोणी कधी मान वेळावून म्हणायला लागलं की 'आपल्याला बुआ राजकारणात रस नाही:, की बाबा आवर्जून सांगायचे, "असायला हवा. तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या लोकाना असायलाच हवा, वेळ असतो तेव्हा सहभागी व्हावं, नंतर रडण्यात अर्थ नाही".
लहान असताना बाबा संघात जायचे. मग मधली कित्येक वर्षे त्यांचा संघाशी असलेला संपर्क तुटला होता. पण संबंध कमी झाला तरी ती नाळ तुटली नव्हती. पाणी झिरपून गेल्यावर जशी ओल रहाते तसा संघ त्यांच्या मनात कायम राहिला. पुढे पुण्यात गेल्यावर वेळ होता म्हणून त्यांनी परत शाखेत जाणं सुरू केलं. तिथल्या व्याख्यानमालेत भाग घ्यायचे. सामाजिक कार्यात पुढाकार घ्यायचे. त्यांच्या मूळच्या तत्त्वनिष्ठ आणि परखड स्वभावाला अनुसरून, खटकणार्या गोष्टींवर खणखणीत टीका पण करायचे. पण त्यांनी कधीही त्या विचारसरणीवर अविश्वास दाखवला नाही. जे थोडेफार मतभेद असतात ते बोलून सोडवावे, पण विचारसरणीवर अढळ विश्वास हवा ह्या मताचे ते होते. बाबा गेल्यावर, एक दिवस सकाळी संघाचे ज्येष्ठ प्रचारक शंकर शास्त्री घरी आले. आमच्याशी बाबांबद्दल भरभरून बोलले. माझा आणि संघाचा हा पहिला संबंध. बाबांनी त्यांना सांगितले होते, "जोपर्यंत तुम्ही तरुण, नव्या उमेदीचे कार्यकर्ते जमवणार नाही तोवर कठीण आहे. तुम्ही चार म्हातारी डोकी मिळून करत असलेलं संचलन अत्यंत केविलवाणे वाटतं. आपण जर तरुणांना राष्ट्रसेवेचं महत्त्व पटवून देऊ शकत नसू तर आपली आयुष्य फुकट गेली शास्त्रीबुवा". आज संघ जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून भरभराटीला आली आहे. कित्येक तरुण आज स्वतःहून संघात प्रवेश करतात. आज बाबा असते तर नक्कीच आनंदले असते.
त्यांच्या कुटुंबावर, भावंडांवर त्यांचं विशेष प्रेम! त्यातल्या कोणाच्याही हाकेला तडक धावून जाण्याची आणि ती कठीण वेळ सरेपर्यंत सोबत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे, त्यांनी खूप माणसं जोडली. लोकही स्वतःहून त्यांच्याकडे सल्ले विचारायला येत. कधी कोणा दूरच्या नातेवाईकांकडे हॉस्पिटल मध्ये गरज असल्यास डबे करून पोचवणे, कोणाकडे मृत्यू झाल्यावर, जवळचे कोणी नसल्यास पुढाकार घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार करणे, प्रसंगी कानउघाडणी करून कोणाला हक्काने वठणीवर आणणे, एखाद्याच्या मरगळलेल्या मनाला उभारी देणे ह्या बाबांसाठी खूप सहज गोष्टी होत्या. कंपनीमध्ये त्यांनी आवर्जून दोन मुके बहिरे कामगार ठेवले होते. त्यांची खाणाखुणांची भाषा शिकून घेत, ते त्यांना काम शिकवत असत. जमेल तितकं नॉर्मल आयुष्य त्यांना जगू देण्यासाठी बाबांनी पुष्कळ कष्ट घेतले.ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भाग होत्या, त्यात आपण खूप काही जगावेगळं काम करतो आहोत किंवा उपकार करतो आहोत असं त्यांना कधी वाटलं नाही. सामाजिक बांधिलकीचा तो हिस्सा होता. अर्थात ह्या सगळ्यात त्यांना आईची भक्कम साथ मिळाली.
दोन्ही नातवंडांवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. त्यांच्यासाठी खपून 'वैज्ञानिक खेळणी' बनवणे हा अजून एक छंद! लहान लहान प्रयोगातून त्याना अभ्यासाची गोडी लावण्याचं काम त्यांनी आधीच सुरू केलं होतं. दोघांच्या तब्येतीच्या कुरकुरी असल्या की ते रात्र रात्र जागत. माझ्या मुलाला - ईशानला शाळेत घालायचं ठरलं, आणि मी नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या नातवाची काळजी घ्यायला आईबाबांचं माझाकडे येण्याचं ठरलं. पण त्याच्या २० दिवस आधीच, साध्या आजाराचं निमित्त होऊन एके दिवशी ते कोणाला कसली सूचना न देता आणि कोणाकडून कणभरही सेवा करून न घेता अलगद निघून गेले.
त्यांचं अचानक निघून जाणं जसं आम्हाला धक्कादायक होतं तसं ते आणखी किती लोकांना टोचलं होतं ते आम्हाला बाबा गेले त्यादिवशी कळलं. खरतर नागपूर सोडून पुण्यात गेल्यावर तिथे त्यांचं उणपुरं ४ /५ वर्षांचं वास्तव्य झालं. कुठून त्यांनी एवढी माणसं जोडली आणि कधी हे सगळं केलं, ते आम्हाला एक कोडं आहे. कुठल्याही परिस्थित अभेद्य राहणाऱ्या नवर्याला मी बाबा गेले तेव्हा हुंदके देऊन रडताना पाहिलं आहे. ते गेल्यावर पोरकं झाल्यासारखं वाटतय असं मला किती लोकांनी येऊन सांगितलं असेल. प्रत्येकाकडे त्यांच्याबद्दलची अशी खास वैयक्तिक आठवण होती. त्यांच्या नुसत्या असण्याने किती लोकांना आधार वाटायचा, हे तेव्हा मला कळलं. बाबा गेल्यावर काही दिवसांनी इंजिनिरिंग शिकत असलेली दोन मुलं अचानक आली, हातात एक इन्स्ट्रुमेंट्स चा बॉक्स आणि पुस्तकं घेऊन. आम्हाला म्हणाली, 'काकांनी दिली होती, ते दर आठवड्यात आम्हाला शिकवायचे. जे समजत नव्हतं ते सोपं करून सांगायचे. आज ह्या वस्तू परत करायला आलो आहोत'. त्या आम्ही अर्थातच परत घेतल्या नाहीत. व्यक्तीतून कुटुंब, कुटुंबातून समाज, समाजातून देश कसा घडत जातो ह्याचं प्रात्यक्षिक मी त्यांना बघून शिकले. फार काही भव्य दिव्य करायची गरज नसते, आपण आपल्या परिघामध्ये, थोडसं भान ठेवून वावरलो तर त्याचा प्रभाव दूरवर पसरतो, इतका साधा हिशेब आहे.
त्यांच्या जाण्याचा किती खोल प्रभाव आम्हा बहिणींवर पडला आहे, ते शब्दात सांगणं कठीण आहे. तो प्रयत्न ही मी करणार नाही. ते गेल्यावर कितीतरी वर्ष मी त्यांच्याबद्दल बोलायचं टाळत असे. काही जखमा भरायला वेळ लागतो. बाबांचं जाणं पटवून घायला मला पुष्कळ वर्ष लागली. तरीही ती जखम अजून ओलीच आहे.
आयुष्याच्या समीकरणाचे नियम खरेतर खूप सोपे आहेत. त्यात काय मिळवायचं, काय वजा करायचं, कशाने गुणायचं आणि कशाने भागायचं हे प्रत्येकाने ज्याचं त्याचं ठरवायचं. मग येणारं उत्तर ही त्या समीकरणाची आणि योगाने आपल्या आयुष्याची खरी किंमत ठरवते, ती रोजच्या जमाखर्चाच्या हिशोबापेक्षा थोडीशी वेगळी असते. बाबांकडून मला काय मिळालं असं जर कोणी आज विचारलं, तर मी म्हणेन, जे मिळालं ते भरभरून मिळालं. त्या आयुष्याच्या समीकरणात काय जोडायचं आणि काय काढून टाकायचं हे त्यांनी शिकवलं. हे अनाकलनीय अवघड गणित त्यांनी आमच्यासाठी आधीच सोडवून ठेवलंय. आम्हाला फक्त ते आता आमच्या वहीत उतरवून घ्यायचंय. बाबांच्याच आवडत्या ओळींमध्ये सांगायचं तर, 'सहत्रहस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने' अशी परिस्थिती आहे!
🙏🙏
Khupach chaan shalaka..
उत्तर द्याहटवाशलाका - खूप हृदयस्पर्शी लेख आहे तुझा. वाचत असतांना पूर्ण वेळ काका डोळ्यांसमोर येत होते. किती तत्वनिष्ठ होते ते! तुमची फूललेली बाग देखील आठवली. त्यामागे काकांची मेहनत होती, हे मात्र आज कळलं. ते गेल्याचं मला खूप उशीरा कळलं - २०१० मध्ये. मन खिन्न झालं. आज त्यांच्या आयुष्यातील कित्येक पैलूंबद्दल जाणता आलं, तेही इतक्या सुंदर शब्दांत!
उत्तर द्याहटवा