अक्षरांशी जडले नाते!!
गेल्या दोन महिन्यांत हो नाही करता करता शेवटी सोशल मीडिया ला राम राम ठोकला. सतत चे नको असलेले अपडेट्स, आत्यंतिक राजकीय आणि धार्मिक मतांमुळे दिसणारी आपल्याच मित्रपरिवाराची भेसूर स्वरूपं आणि अर्थशून्य तर्हेने घालवलेला वेळ ह्या सगळ्यांपासून फारकत घेतली. थोडा वेळ आणि प्रयत्न लागले पण जमलं! भरपूर पुस्तकं वाचायची हे ठरवून परत अक्षरांकडे वळले. वाचन तसं सुरू होतंच पण ह्या फेसबुक ट्विटर च्या कोलाहलात ते आतपर्यंत पोचत नव्हतं. सुरुवातीला त्रासच झाला. सर्वसुखसोयींनी सुसज्ज असलेल्या शहरातल्या नवीन घरातून गावातल्या जुन्या वाड्यात गेल्यावर कसं वाटेल, तसं काहीसं. इथे आता फक्त मी आणि ही अक्षरे..मनात आलं तर पटकन ऐकायला एखादं गाणं नव्हतं की वाटलं तर एखादा मेसेज टाकून गप्पा मारायला कोणी मित्र मैत्रिण नव्हते. काय करू या अक्षरांचं?? पण लहानपणापासून ह्या अक्षरांशी असलेल्या सलगीवर विश्वास ठेवला आणि परत एकदा वाचन सुरू केलं. मला आठवतंय तेव्हापासून मी वाचायचे. नुसतं पुस्तक वाचायचे असं म्हणणार नाही कारण घरी येणारा प्रत्येक कागद माझ्या डोळ्यांखालून गेलाच पाहिजे हा माझा दंडक होता. वाण सामान बांधून आले...