ती गेली तेव्हा...
हे असं कधीतरी होणार हे माहित होत. ही वेळ आता लवकर येइल हे ही कळत होत तरी तो विचार त्या त्या वेळी किती जीवघेणा वाटत असे. लता नसेल तेव्हा?? हा प्रश्न कितीदातरी मनात यायचा. धास्तावलेलं मन मग 'पण ती आहे ना? पुढचं पुढे' अशी तोकडी समजूत घालायचे.
लहानपणापासून तिचा माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो ह्याचं मला कोण कौतुक वाटत असे! नुसत्या त्या एका गोष्टीवर मी स्वत:ला सेलिब्रिटी समजायला लागले होते. लता विरुद्ध आशा ह्या वादामध्ये तेव्हा मी हिरीरीने लताचा पक्ष घेत होते..आशाताई पण प्रचंड आवडत असून सुद्धा! लतादीदी आणी माझं एक स्पेशल नाते मनात ठाण मांडून बसले होते.माझ्या आजीच्या पिढीला तिने त्यांच्या उमेदीच्या वर्षात साथ दिली आणी माझ्या आईच्या आणी माझ्या पिढीला घडवलं. ह्या एका गोष्टीवरून तिच्या प्रतिभेची व्याप्ती लक्षात यावी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत मीराबाई हे सगळे ह्या दोन पिढ्यांना मंगेशकर घराण्यामुळे आकळले. घनश्याम सुंदरा ह्या भूपाळीने अगणित वेळा उठवलंय. निळ्या पहाटवाऱ्यात तिच्या स्वर्गीय आवाजाने जागृत होणारं घर आजही आठवतं. सन्ध्याकाळी दिवे लागणीला ऐकलेल्या पसायदानाने भारलेल वातावरण आठवतं. ह्या सत्त्विक रचना तिच्यासारख्या तपस्विनीने गाव्या आणी त्यातला भक्तिरस अजून गहिरा करावा आणी हे सगळं आपल्याला आपल्या हयातीत अनुभवायला मिळावं हे आपल्या पिढीचे भाग्य आहे. भा. रा. तांबे, शांता शेळके, ग दी मा, कवी बी ह्यांच्या कविता लताताईने तिच्या मधुर आवाजाने अजरामर करून ठेवल्या. माझ्या मराठमोळ्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, पु ल देशपांडे आणी लता मंगेशकर ही अढळ श्रद्धास्थाने आहेत, ह्यांना दुसरा पर्याय नाही. असूच शकत नाही. सावरकरांच्या विशुद्ध, तेजस्वी मराठी भाषेत गुंफलेली त्यांची गाणी सादर करावी तर फक्त आणी फक्त मंगेशकर कुटुंबियांनी! एखाद्या समाजाला, त्यातील तरुण पिढीला संस्कार द्यावेत तर कसे हे लताताईने तिच्या सोज्वळ, शांत कलेतून दाखवून दिले आहे. आमच्या पिढीला घडवताना पालक, शिक्षक ह्याचबरोबर मंगेशकर कुटुंबीय आणी ओघानेच लतादीदींचे अनंत उपकार झालेले आहेत.
तशी तिची सोबत आयुष्यभर राहिली. हिंदी गाणी कळायला लागल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती वेगवेगळ्या रूपात भेटत राहिली. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव आणी त्यातून होणारी भावनिक चलबिचल अनुभवायची मला जास्त सवय आहे. खूप व्यावहारिक जगणे मला जमत नाही. अश्या सगळ्या कडूगोड अनुभवांमध्ये तिच्या गाण्यात मी अर्थ शोधत वाढले. कधी हसू, कधी अश्रू, कधी दिलासा, कधी दुःख..तिच्या गाण्यातून हवं तितकं घेऊन मी स्वतःची काळजी घेतली आहे, थकलेल्या मनाला विश्रांती दिली आहे, आनंदात असताना तो द्विगुणित केला आहे.
'शलाका तुझा वाढदिवस पोरका झाला बघ! It is raining here..ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता...' आज बरोबर साडे दहा वाजता मित्राचा मेसेज आला. मी डोळे पुसत नुसतं 'हो' एवढं उत्तर पाठवलं. बधीर झाले होते. म्हटलं तर काहीच फरक पडणार नाही. मी रोजच्यासारखी तिची गाणी ऐकेन, तसंच स्वतःला तिच्या गोड गळ्यात शोधत बसेन. त्या शब्दातून व्यक्त होईन. तिच्या आवाजातून ऊर्जा घेइन. पण तरीही 'ती नसेल तेव्हा?' ह्या प्रश्नाचं उत्तर मला आता समजणार आहे.
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
🙏
अप्रतिम आणि सुरेख. एकाच दिवशी वाढ़ दिवस येणे हे जरी योगायोग असले तरी त्यात दडलेली भावनात्मक आपुलकी, नेहमी प्रमाणे सुसंगत रचनेत् मांडले. 'ती नाही' हा दुख मनात खेळ करत असताना, तिच्या बद्दल हे वाचून आनंदित उर्जे चा स्पर्श जाणवला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद! 🙏
हटवाअप्रतिम ,👌👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर लिहिलं आहेस , प्रत्येकालाच एकदा जायचं आहे आणि तेच अंतिम सत्य आहे , लता दीदींच्या जाण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही पण तुझा हा ब्लॉग वाचल्यावर कोणीतरी दुखावलेल्या मनाला सांत्वन दिल्यासारखे वाटले फारच छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏 सुंदर...
उत्तर द्याहटवा😪😪😪💔
उत्तर द्याहटवाशलू किती सुंदर लिहिल आहेस
उत्तर द्याहटवाKhupach sunder lihilaay shalaka..tujha bhavana hridayala bhidlya
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌
उत्तर द्याहटवासर्वांचे मनापासून धन्यवाद🙏🏻..तिच्याबद्दल लिहिताना दिग्गजांचे शब्द तोकडे पडतात. तरीही धाडस केलं..हे लिहिलेलं वाचताना मनात कुठेतरी भिडलं हा लतादीदींच्या गायकीचा परिणाम..🙏🏻
उत्तर द्याहटवाखूप च सुंदर लिहलय 👌अगदी प्रत्येका च्या मनातले..
उत्तर द्याहटवाअप्रतिम..खूप छान.
उत्तर द्याहटवानेहमी सारखिच-'अप्रतिम' । आज बहूतेक प्रत्येकाच्या मनात ह्याच भावना असतील शलू ताई....,पण त्याला इतक्या सुरेख रितीने लिहिता येणं ही सुध्हा एक दैवी देणगी आहे।आज कळलं की 'why you share her birthday'🙂।लता दिदिंच्या आठवणीला तुझी ही एक एक अप्रतिम शब्दांजली।
उत्तर द्याहटवाThanks dear..🙏🏻
हटवा