लखलख चंदेरी...
माझ्या आईकडे एक जुनी भरजरी शाल होती. कोणीतरी भेट दिलेली. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेली ही पहिली भरजरी शाल! सोनेरी, निळ्या, जांभळ्या रंगाच्या रेशमाने विणलेल्या ह्या शालीचं मला खूप अप्रूप होतं. जपून ठेवलेली ही शाल फक्त सणासमारंभाला बाहेर निघत असे. तिचा मुख्यत्वे उपयोग औक्षण करताना, ओवाळताना पाटावर अंथरायला करत असू. ती भरजरी शाल ही माझी दिवाळीची पहिली आणि खूप जवळची आठवण आहे. ती शाल पेटीबाहेर निघाली की दिवाळी आल्याची नांदी मिळायची. तिला नीट इस्त्री करून निगुतीने जतन करून ठेवायचो. कालपरत्वे ती कोपऱ्यातून विरायला लागली. मग ती विरलेली बाजू दृष्टीस पडू नये म्हणून नेमकी गुंडाळून आम्ही वापरायला लागलो.
दिवाळी पण अशीच! भरजरी!! मनात असलेली दुःख, चिंता, काळज्या क्षणभर दुमडून साजरी करायची. तिचं स्वरूप आता बदललंय. लहानपणी ती ५ दिवस मला मी राजकन्या असल्यासारखं भासवायची. त्या भरजरी शालीमार्फत, मोती साबणाच्या गुलाबाच्या सुगंधातून, भल्या पहाटे उठून केलेल्या औक्षणातून, आणि माझ्या आंघोळीच्या वेळी बाहेर ताईने उडवलेल्या मोठ्ठया आवाजाच्या फटाक्यातून, तिने माझे भरपूर लाड केले. हळूहळू ह्या स्वप्नांच्या राज्यातून बाहेर आल्यावर मनातली राजकन्या पण जमिनीवर आली. मग थोडी गंभीर दिवाळी साजरी व्हायला लागली. लहानपणी वाटणाऱ्या मौजेचे रूपांतर जबाबदारीत व्हायला लागले. गेली दोन वर्षे दिवाळी बंद दाराआड साजरी झाली. थोडी घुसमटलेली, मरगळलेली.. वेदनांच्या छायेतून बाहेर आलेल्या जगाला ह्यावर्षी आनंदी राहण्याची थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे. खूप दिवस अंग आक्रसून बसलं की परत जशी चालायची नव्याने सवय करावी लागते, तसच!खरतर दिवाळी ह्या आधीही कितीतरी विविध प्रकारात भेटली आहे. लहानपणीची मजेची दिवाळी, एका वर्षी मी ऐन वेळी तापाने फणफणले होते ती ग्लानीतली विचित्र दिवाळी, भर दिवाळीच्या पाडव्याला मला भाचा झाला, तेव्हा हॉस्पिटल मध्ये चकरा मारत गेलेली दिवाळी - ह्या दिवाळीने माझं मावशीपदावर प्रमोशन केलं, पुढे बाबा गेले त्या वर्षीची उदास दिवाळी, खूप कामं पडतात म्हणून दिवाळीवर रागावून मुद्दाम बाहेर फिरायला गेलो ती दिवाळी, मग त्याच्या पुढच्या वर्षी न राहावून दुप्पट जोमाने साजरी केलेली दिवाळी, अश्या अनेक वेगवेगळ्या छटांमध्ये ती भेटत राहिली. ह्या वर्षी अजून एका वेगळ्या स्वरूपात भेटेल. पण दिवाळीचं माझ्या मनातलं नातं नेहमीसारखंच अबाधित राहील.
दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे रांगोळीच्या ठिपक्यांचे कागद, दिवाळी म्हणजे गेरू ने रंगलेले हात, दिवाळी म्हणजे घराघरातून येणारे घमघमाट, दिवाळी म्हणजे भिजत घातलेल्या पणत्या, दिवाळी म्हणजे बिघडलेल्या चकल्या, दिवाळी म्हणजे भल्या पहाटे उठून नरकात जायच्या भीतीने केलेले अभ्यंगस्नान, दिवाळी म्हणजे तिळाचं उटणं, दिवाळी म्हणजे किशोर चा दिवाळी अंक आणि त्यातली शेरलॉक होम्सची अनुवादित गोष्ट, दिवाळी म्हणजे हौसेने नेसलेल्या आईच्या साड्या, दिवाळी म्हणजे दूरच्या त्या एकट्या झोपडीसमोर तेवणाऱ्या लहान पणत्या, दिवाळी म्हणजे आकाशकन्दिलातून चमकणारे कवडसे, दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनाला घरभर उडवलेल्या लाह्या, दिवाळी म्हणजे न फुटलेला फुसका सुतळी बॉम्ब, दिवाळी म्हणजे 'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी' असं ओरडत फुलबाज्यानी हवेत कोरलेली चक्र, दिवाळी म्हणजे भाऊबीजेला कौतुकाने ओवाळलेल्या चंद्राची कोर, दिवाळी म्हणजे नातेवाईकांना पाठवलेली ग्रीटिंग कार्ड्स आणि त्यांच्या ग्रीटिंग कार्ड्स ची आतुरतेने पाहिलेली वाट, दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनाला हळदीकुंकवाला आलेल्या शेजारीणी, दिवाळी म्हणजे संपत आलेला फराळ, दिवाळी म्हणजे परत शाळा सुरू होणार म्हणून वाटणारी हुरहूर! दिवाळी म्हणजे झगमगते बालपण आणि त्या बालपणाच्या अगणित हृद्य आठवणी!
आपल्या सगळ्यांच्या मनातली दिवाळी! स्वतःच्या लखलखत्या चंदेरी तेजाने विश्व व्यापून टाकणारी ही दिवाळी, त्या भरजरी शालीप्रमाणे दुःखाची, भयाची, काळजीची किनार दुमडून तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अंध:कार दूर करो ही प्रार्थना! शुभ दीपावली! 🙏🏻🙏🏻



Khupach chaan..very nicely expressed..
उत्तर द्याहटवाफारच छान व्यक्त केले आहेस शलाका उत्तम 👍
उत्तर द्याहटवाखूप छान 👌👌👍👍🙏💐
उत्तर द्याहटवाखूप छान 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिले आहेस, शुभ दीपावली
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर ताई.... नेहमीसारखेच....वाचतानाही डोळे भरून येतील अश्या सुंदर आठवणी....🙂....,🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा