खूणगाठी

गेले काही महिने मी एका वेगळ्या मनस्थितीतून जात होते. भरपूर वाचन, थोडंसं अध्यात्म आणि आत्मचिंतन असा वेगळा प्रवास सुरु होता. विचारान्चा कल्लोळ माजला होता. त्याचा परिणाम असा झाला की माझे शब्दच थबकले. नियमित लेखन करण्याची आवड असताना असं एकदम अडखळलं की काय होतं त्याचा अनुभव पहिल्यांदा आला. डोक्याची अवस्था पार एखाद्या गजबजलेल्या यात्रेसारखी झाली होती. आणि त्या जत्रेचा exit अचानक बंद झाल्यामुळे आत अडकलेल्या  सगळ्या विचाररूपी यात्रेकरुंची कोंडी झाली होती. सगळे विचार बिचारे जागा मिळेल तिथे अंग चोरून बसून होते. दार कधी उघडतंय ह्याची वाट बघत. सांगण्यासारखं खूप काही असताना वाचा गेल्यावर होईल तशी घुसमटलेली अवस्था झाली होती.


गेल्या आठवड्यात एका लग्नाला जाणं झालं आणि तिकडे सगळ्या जिवलग बहिणी व वहिन्या कित्येक वर्षांनी भेटल्या. बहुतेक सगळ्यांचा 'तू खूप दिवसात काहीही लिहिलं नाहीस, परत लिखाण सुरु कर आणि आम्हांला सगळ्याची लिंक दे,' असा तक्रारीचा सूर लागला होता. त्यान्ची प्रेमळ अपेक्षा बघून आधीच गजबजलेले डोकं जरा अजून भाम्बावलं. पण त्या सगळ्याना भेटून कुठेतरी डिस्चार्ज झालेली बॅटरी हळूहळू चार्ज व्हायला लागली, मनाचे exit routes उघडले, आधीसारखी मनात शब्दांची जुळवाजुळव व्हायला लागली आणि आत अडकलेले पॅसेंजर्स शिस्तीत परत बाहेर निघण्यासाठी एकदाचे सज्ज झाले.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून परत श्रीगणेशा करावा असं मनात आलंय. असे लँडमार्क दिवस आले की बरेचदा आपण आयुष्यातले मोठे बदल घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नवीन वर्षाचे संकल्प वगैरे मी म्हणणार नाही कारण कधी कधी मनावर अश्या भारदस्त शब्दांच उलट नवीन दडपण येतं आणि मग परत डोक्यातले पॅसेंजर्स तिथेच थबकण्याची भिती बळावते. म्हणून मी खूणगाठी हा शब्द वापरणार आहे. गेला वर्षभर विचार करून झालेला डोक्याचा भुगा आता इथे पाडणार आहे असं समजा हवं तर! त्यातून ह्या खूणगाठी आता आयुष्यभर सोबत करणार, त्यांना कुठेतरी लिहून ठेवलं तर अधून मधून पडताळून पाहायला मदत होईल असं वाटतंय. लिस्ट मोठी आहे. तरी प्रयत्न करते.

सर्वात आधी - स्वतःवर अंगीभूत गुणदोषांसकट भरपूर प्रेम करायचंय. प्रेम म्हणजे काय ह्याबद्दल एकदा बोलत असताना अचानक माझ्या तोंडून निघून गेलं होतं की प्रेम म्हणजे 'unconditional acceptance'. कुठल्याही मार्गाने पडताळून पाहिलं तरी सगळ्यात तळाशी हेच सत्य सापडतं. आपल्या आयुष्यात कितीदातरी आपल्या लोकांसाठी आपण मनात किती सहज भाव धरतो. 'जाऊ दे त्याचा/तिचा स्वभाव आहे' असं म्हणून स्वीकारतो. स्वतःशी मात्र नको तितके कठोर वागतो. आपले आपल्याबद्दलचे स्टॅंडर्ड्स बरेचदा खूप काटेकोर असतात. हातून एखादी चूक झाली तर पुष्कळ वेळ आपण ते मनात धरून ठेवतो. ते बदलायचय. स्वतःला जरा मोकळीक द्यायची आहे. लहानमोठ्या चुका करायची मुभा द्यायची आहे. Perfectionism चं ओझं झुगारून थोडंसं सामान्य व्हायचंय.

सुख, आनंद आणि समाधान ह्या तिन्ही अवस्था बाह्य जगावर अवलंबून नाहीत हे आत्मसात करायचंय. ह्या बाह्य जगात आपल्याच शरीराला आणि मनाला असलेले छोटे मोठे विकार सुद्धा येतात. मानसिक स्थिती ह्या सगळ्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतर्मनाशी निगडीत आहेत हे उमजून वागायचंय. आनन्द, शान्तता आणि समाधान हे विकल्प आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हे विकल्प निवडायची शक्ती माझ्यात आहे हे लक्ष्यात ठेवायचंय.

अपेक्षांच ओझं जे कदाचित भोवतालच्या जगावर मी टाकलं होतं, ते पूर्णपणे काढून टाकायचंय. खरंच आता कोणाकडून कसल्याच अपेक्षा नकोत. असलाच तर फक्त एक प्रेमळ ऋणानुबंध असावा, थोडीशी अनुकम्पा असावी. प्रत्येक जण त्याच्या परीने योग्य वागत असतो ही जाण असावी. लहानसहान गोष्टींत मानापमान नकोत की मनात धरून ठेवलेल्या अढी नकोत.

आजवर आयुष्यात कित्येक गोष्टी घडल्या. अनंत कडूगोड आठवणी आहेत. कित्येक वर्षे त्या आठवणीनी बेचैन केलंय. सुखाचे क्षण संपले म्हणून आणि दुःखाचे क्षण विसरता येत नाहीत म्हणून. आता त्या सगळ्या आठवणींपासून भावनिक फारकत घ्यायची आहे. त्यातली शिकवण काय ती फक्त बरोबर घेऊन पुढची वाटचाल करायची आहे.

'हजारो ख्वाहिशें ऐसी'..अशी अवस्था नेहमी समोर येऊन उभी ठाकते. कित्येक गोष्टी घडवून आणल्या, कित्येक घडवता नाही आल्या..काही छंद जोपासायचे राहिले, काही कला आत्मसात करायच्या राहिल्या. त्यासाठी 'नेक्स्ट टाईम', असं म्हणून पुढे जायचंय. हा आरंभ नाही आणि हा अंत ही नाही. एक अविरत चालणारा प्रवास आहे. कदाचित पुढच्या टप्प्यात हरवलेलं सगळं परत मिळेल. त्यासाठी आता कासावीस होणं सोडायचंय..

भावनिक रित्या संपूर्णपणे स्वतंत्र व्हायचंय. कुठेही समोरच्याला थोडी जाचक वाटेल अशी भावनिक गुंतवणूक नको, मला बर वाटावं म्हणून इतर कोणाला त्याच्या वागणुकीत बदल करावे लागतील इतक भावनिक पारतन्त्र्य तर नकोच. कोणाला माझी गरज भासली तर मनापासून मदत करून त्यातून खंबीरपणे मानसिकरित्या वेगळं होण्याईतपत बळ कमवायचंय.

भोवताली असलेल्या जगाच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून पाहायचंय. रोज घडत असणाऱ्या घटनांचा उहापोह करून, दुसऱ्या पद्धतीने ती घटना हाताळता आली असती का ते हेरायचय. समोरच्या व्यक्तीचा त्याची स्वतःची मते ठरवण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आकस न ठेवता मान्य करायचाय.

स्वतःच्या आणि जगाच्या बाह्य स्वरूपाला विसरून, अंतरंगात शिरायचंय. अशी कित्येक सुगंधी व्यक्तिमत्त्वे आजूबाजूला आहेत. त्यांच्या सुंदर मनाचा ठाव घ्यायचाय. ह्या वाटेवर त्यांचे मार्गदर्शन, त्यांची साथ अलौकिक ठरणार आहे. अश्या व्यक्तिमत्वाना स्वतःशी जोडून ठेवायचंय. गेल्या वर्षभरात कित्येक सुहृद अचानक माझ्या आयुष्यातून गळून पडले, त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत.

अहंकार सोडून द्यायचाय आणि आत्मसम्मान वाढवायचाय.

सरतेशेवटी शांता शेळक्यांची माझी आवडती कविता  - 'जे न देखे रवी ते देखे कवि'- ह्या उक्तीचा परिचय देणारी- त्या कवितेने ह्या लेखाचे समापन! 

कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागुन पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागता
दाटुन येते मनामध्ये भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळु

स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता

- शांता शेळके

नूतन वर्षाभिनंदन! 🙏🏻






टिप्पण्या

  1. किती सुंदर लिहितेस शलाका !
    Hats off to you, keep it up dear we are really proud of you

    उत्तर द्याहटवा
  2. शलू खूपच सुंदर लिहिलेय , अगदी माझ्या मनातल . पुन्हा पुन्हा वाचावस वाटत . अशीच लिहित रहा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!