चुनरी संभाल गोरी....

हा लेख खास ओढण्यांसाठी.. गेले दीड दशक नामशेष झालेल्या माझ्या प्रियसखी 'ओढणी'साठी! अचानक लुप्त झालेली ही मैत्रीण आता पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात अवतीर्ण होते आहे हे निमित्त साधून काही जुन्या आठवणीना उजाळा म्हणून घातलेला हा लेखनचा घाट!

ओढणीचा माझ्या आयुष्यात फॉर्मल प्रवेश अर्थात मोठ्या बहिणींमुळे झाला. मला लहानपणापासून ह्या ओढण्यांच खूप अप्रूप होतं. वेगवेगळ्या रंगातल्या, कधी कलाकुसर केलेल्या ओढण्या लपेटलेल्या सगळ्या मोठ्या बहिणी म्हणजे माझ्यासाठी हिरोईन पेक्षा कमी नव्हत्या. कधी एकदा मोठी होऊन अश्या मस्त झोकदार ओढण्या घेऊन फिरेन असं झालं होतं मला. मग कधीतरी ताईच्या ड्रेसवरची ओढणी फ्रॉक वर लावून गिरक्या घेऊन बघणे, कधी डोक्यावरून घेऊन आरश्यासमोर मिरवणे असं करता करता कधीतरी माझ्यासाठी पहिला ओढणीवाला ड्रेस शिवला आणि काय विचारता... चांगल्या अर्ध्या डझन सेफ्टी पिना इकडे तिकडे खोचून ऐटीत माझं पार्सल घराबाहेर पडलं आणि त्या दिवसापासून ओढणी माझी घट्ट आणि जवळची मैत्रीण झाली. ऐशी-नव्वद च्या दशकात बहुतेकींची होती तशीच..बालपणातून तारुण्यात प्रवेश करताना मिळालेली एक जिवलग सखी! 

एखाद्या वस्त्राने किती बहुआयामी असावं म्हणते मी! ड्रेस वर मिरवणं हा एक भाग झाला..मग ऊन, वारा पाऊस सगळ्यांत डोकं आणि केस वाचवून ठेवणे, कधी गाडीच्या सीट वर जमलेली धूळ झटकणे.. थंडीत शालिसारखी लपेटणे, पावसात भिजल्यास चेहेरा टिपणे, अगदीच वेळ पडली तर तिच्यात पुस्तकं, भाज्या अगर जिन्नस बांधून आणणे, दुचाकी चालवताना हेल्मेट च्या आत ती चेहऱ्यावर डाकू सारखी बांधून घेणे अश्या कित्येक वेळी देवासारखी धावून येणारी, जवळ जवळ सगळ्यांच्या आयुष्यात अढळपद मिळवलेली ही ओढणी! माझ्यासाठी ती कधीच उगीच वाढवलेला पसारा नव्हती. असलीच तर मुलींच्या नखरेल सौंदर्यात, नजाकतीत भर घालणारी एक आवश्यक घटक होती.

सुरुवातीला तीत जास्त प्रकार मिळत नसत. जॉर्जेट च्या कापडाच्या एकदम सॉलिड रंग असलेल्या ओढण्या सगळीकडे मिळायच्या. सलवारीला  मॅचिंग अश्या. कधी चुकून माकून धुवून त्यांना इस्त्री करायचा घाट घातल्या जायचा. आणि दहापैकी नऊ वेळी त्या ओढणीचा तुकडा प्रेमाने त्या तापलेल्या ईस्त्रीला जाऊन चिकटायचा. मग सुरी घेऊन ती भाजकी ओढणी खरवडण्याचा घाट वेगळा आणि 'माझी ओढणी जाळली' म्हणून आम्हा बहिणींमधला वाद वेगळा..मग त्यावर कायमचा उपाय म्हणून एकमेकिंमधले हेवेदावे सोडून दोघींच्या ओढण्या पाण्यातून काढून मग दोघीनी गच्चीवर जाऊन एकत्र दोन्ही टोक हातात धरून वर खाली करून वाऱ्यावर वाळवायच्या असे प्रताप केले जायचे. त्या वाऱ्यावर नुकत्या वाळलेल्या ओढण्या जरा जास्तच झुळझुळीत व्हायच्या..

थोडे नंतर म्हणजे कॉलेज ला गेल्यावर ओढण्यांमध्ये जास्त क्रीएटीव्हिटी आली. गरज असेल त्या रंगात आता ओढण्या डाय करून मिळायला लागल्या. डाईंग चे पॅटर्न पण वेगवेगळे.. कधी आडव्या रेषा, कधी मध्ये एक वेगळा गोल, कधी दुसर्या रंगाच्या लाटा. कधी तिच्यावर चमकी लावून घ्यायची..त्याला बादला वर्क म्हणायचे, कधी टिकल्या तर कधी खाली गोठ लावून घेत असू. नागपूरच्या मोदी नं 2 मध्ये खास ओढणीचं दुकान होतं. किरण मॅचिंग सेंटर बहुतेक. तिथे भारी ओढण्या मिळत. कुठल्या तरी मैत्रिणीला मॅचिंग ओढणी हवी असायची म्हणून तिच्या बरोबर तासंतास पायपीट करत काढलेले दिवस आठवतात. मैत्रिणींमध्ये ह्या ओढण्यांची देवाणघेवाण सर्रास चालायची.

तिला अंगावर ओढायचे पण किती प्रकार! आधी दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित पिन-अप केलेली ओढणी..ही ओढणी मागे गाठ बान्धून सुसाट गाडी चालवायची गम्मत होती. जॉर्जेंट च्या ओढण्या दोन्ही खांद्यावरून पुढे सोडून, केस मोकळे सोडून, उगीच जरा विचारमग्न वगैरे भाव आणून फिरलं की सिलसिला मधल्या रेखा सारख्या दिसायच्या मुली..😄 दुसरा प्रकार म्हणजे एकाच खांद्यावर पिन लावून दुसर्या खांद्यांवर मागून पुढून घेऊन गाठ बांधायची. मग पुढे एका खांद्यावर घेतलेली साईड पट्टा ओढणी. मला आठवतं, मी कॉलेजात असताना एक 'गंगा जमुना सरस्वती' नावाचा ड्रेसचा प्रकार मिळायचा. कुर्ता, सलवार आणि ओढणी तिन्ही वेगवेगळ्या रंगांचे तरीही परस्परपूरक. त्यातल्या गंगा आणि जमुना शिवून झाल्यावर उरलेली भलिमोठी कॉटन ची सरस्वती निऱ्या करून पिनेने शिस्तीत बांधून वर एप्रन घालून केलेले प्रॅक्टिकल्स आठवतात. थोडं खटपटीचं काम होतं, पण मला वाटतं तेव्हा आम्हाला जरा जास्त सोस होता काही गोष्टींचा..त्रास कधी वाटलाच नाही..हवेवर उडणारी ओढणी, दुचाकी चालवता चालवता मध्येच सीटवरून उडी मारून अलगद पकडणे जिला जमलं नाही तिला गाडी आणी ओढणी दोन्ही समजल्या नाहीत.

ह्या ओढणी प्रेमात हिंदी चित्रपटसृष्टीचा भरपूर हात होता. चूडी, बिंदिया, पायल, काजल ह्या सौंदर्य प्रतिकांबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजल्या गेलेला मुख्य घटक म्हणजे ओढणी. अगदी जुन्या चित्रपटांपासून ते नंतरच्या ट्रेंडसेटर नायिकांपर्यंत सगळ्यांनी त्या ओढणीची ओढ जपून ठेवली होती..'हवा मे उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमलका' हे मी ऐकलेलं दुपट्ट्यावरच पहिलं गाणं.   'इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा' असं म्हणत जसं मीनाकुमारीने वेड लावलं होतं तेच पुढे आशा पारेख च्या 'चुनरी संभाल गोरी..'ह्या गाजलेल्या गाण्याने केलं. 'फिसले नही चलके कभी दुख की डगर पे, ठोकर लगे हस दे हम बसनेवाले दिलके नगर के'..ह्या ओळी तेव्हाच्या चिवट, कणखर पिढीचे जीवन सूत्रच जणू सांगतात आणि त्या गाण्यातून त्या चुनरीला अश्याच लवचिक तंतूनी मानवी मनाशी जोडून घेतात. कधी 'कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल' असं म्हणत आत्म्यारूपी ओढणीवरून सरळ अध्यात्मिक उंची गाठल्या जाते, तर "आज मिलन की बेला मे, सरसे चुनरिया क्यों सरके" ह्या शब्दांनी ती ओढणी मुलायम भावनांशी जोडल्या जाते.  'मेरी चूनर उड उड जाये,' हे फाल्गुनी पाठकच गोड गाणे खूप गुणगुणल्याच आठवत आणि अगदी अलीकडच्या 'जब जब मुझपे है उठा सवाल, माये तेरी चुनरिया लेहराये' ह्या ओळीतून लेकरावर कायम आशीर्वादाची ओढणी धरणाऱ्या आईच्या गोष्टीने डोळे पाणावले आहेत. मध्यंतरी चुनरीवर भरपूर आचरट गाणी लिहिल्या गेली. पण माझ्या मनातली चुनरी आणी ह्या गाण्यातल्या चुनरीचा काही ताळमेळ नव्हता. ती गाणी कधीच स्मृतीआड गेली.

गेल्या दहा पंधरा वर्षात मात्र, सुटसुटीतपणाच्या बहाण्याने ह्या ओढण्या अचानक सगळीकडून गायब झाल्या. 'कुर्ती' च्या नावाखाली स्त्रीयांची वेशभूषा काही साचेबंद प्रकारात कोंडल्या गेली. एकसारखे शिवलेले जास्त कलाकुसर नसलेले ड्रेस खूप प्रचलित झाले. 'मिक्स अँड मॅच' च्या नावाखाली वेशभूषेतलं वैविध्य बरच कमी झालं. स्टॅण्ड कॉलर असलेल्या काहीशा निष्प्राण कुर्त्या. त्यांच्यावर ओढणी शोभून तरी कशी दिसणार?वेस्टर्न प्रकाराच्या कपड्यांनी कपाटातील उरलेली जागा काबीज केली. बाजारात सहज उपलब्ध नाहीत म्हणून बायकांनी पण हा बदल निमूट स्वीकारला. काही अपवाद होतेच, उंची कपड्यान्वर त्या मिळत होत्या, पण रोजच्या जीवनातून गायब! सुरुवातीला मी चार ठिकाणी फिरून हट्टाने मॅचिंग ओढण्या शोधायची खटपट केली. पण त्यात ती मजा राहिली नव्हती. सुटसुटीतपणाबरोबर जोडीला आलेला शुष्कपणा बाकीच्यांना जाणवत नव्हता की काय..स्त्रीशृंगाराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग सरळ हिरावून घेतल्या गेला आणि आपल्यातील कित्येक जणींना हा बदल कळला पण नाही..

परवा खरेदीसाठी बाहेर गेले तेव्हा दुकानात आणि ऑनलाईन शॉपिंग सगळीकडे परत एकदा चांगल्या लांबलचक अडीच मीटर ओढण्या दिमाखात उभ्या राहिलेल्या बघितल्या आणि जरा हायस वाटलं. फॅशन चे नियम कोण ठरवत कोण जाणे.. पण ज्या कोणी ह्या ओढण्यांना कित्येक वर्ष आपल्या रोजच्या आयुष्यातून बाद केलं त्याला एकदा शोधून काढायचंय आणि ह्या ओढण्यांना लोढणी समजणाऱ्या त्या मूर्खाला जाब विचारायचाय..

पण असो. आता आनंद ह्या गोष्टीचा आहे, की ओढण्या परत आल्या आहेत. दुप्पट जोमाने. सलवार कमीजवर अविभाज्यपणे मिळायला लागल्यात. मला आवडतात तश्या लांब, काठपदराच्या, गोठ लावलेल्या. गेल्या काही वर्षात हातमागावर तयार झालेल्या हॅन्डलूम वस्त्रांवर लोकांची मर्जी बसायला लागली आहे. त्यामुळे आता ओढण्या नुसत्याच परत आलेल्या नाहीत, येताना स्वतःवर भारतीय संस्कृतीचा साज चढवून आल्या आहेत. कोसा, चंदेरी, माहेश्वरी, तसर चे तलम पोत लेऊन आल्या आहेत. बांधणी, बनारसी, पैठणी आणि पटोला ह्या महावस्त्राचा दिमाख घेऊन आल्या आहेत. आधी ड्रेस ला मॅचिंग ओढणी शोधत असू, हल्ली, ओढणीला साजेसा ड्रेस शिवण्यावर भर आला आहे.  The Tables have turned!

काही गोष्टी बदलू नयेत. सरसकट एखादी वस्तू मूळ प्रवाहातून बाजूला करण्याची गरज नसते. त्या गोष्टी तश्याच पुढच्या पिढीला सोपवाव्या. त्यांना जुन्या-नव्याची सांगड घालायची संधी द्यावी. तशी सन्धी मिळाली तर गरजेप्रमाणे निवड करण्याची अक्कल सगळ्याच पिढ्यांना असते. जशी रोजच्या जीवनातून कालबाह्य झालेली नऊवार हल्ली मुली लग्नात आवर्जून नेसतात, तसच ह्या ओढण्यांबरोबर होईल ह्यात शंका नको. ह्या ओढण्यांमुळे जश्या आमच्या कित्येक गोड आठवणी जोडल्या गेल्यात, तश्या आठवणी निर्माण करण्याचा हक्क त्यांना पण दिला पाहिजे.

दुपट्टा, ओढणी, चुनरी- माझ्यासाठी स्त्रीत्वाचा एक मुख्य दुवा! A bond of sisterhood..असाच अखंड टिकून राहो! 

टिप्पण्या

  1. शलू ... ओढणी सारख्या सरळ साध्या प्रकाराला किती सुंदर सजवलेस . वा..... मजा आली वाचताना

    उत्तर द्याहटवा
  2. शलाका - वाह! उत्तम लिखाण! ८०/९० चे दशक हुबेहुब डोळ्यासमोर उभे केले तू. किती सुंदर शब्दांत ओढणीचे वर्णन गुंफले आहे. जॅारजेटची प्लेन ओढणी, dye केलेली ओढणी इ. कितीतरी सुंदर रूपे होती त्यांची! Dye करण्यासाठी order द्यावी लागायची. ती ओढणी नेमकी मध्ये मोठा एक गोल घेवून तयार व्हायची. खूप विरस व्हायचा. किरण मॅचिंग वाला पण आठवतोय. ओढणी मॅच करून देतांना ती ओढणी ड्रेस वर ठेवून मॅच करायचा. ओढणी पारदर्शक असल्याने ड्रेस चा रंग घ्यायची. घरी येवून शेड मधला फरक कळायचा. पण तो पर्यंत ओढणीबाई पिको होऊन तयार असायच्यात. ओढणी प्रेस करतांना जळल्याचा माझा पण अनुभव आहे. मी तर ओढणीची छान घडी करून प्रेस करायला घेतली. आणि गरम प्रेस मुळे सगळेच layers जळलेत. “सिलसिला मधील रेखा सारख्या मुली”, ही उपमा फारंच खास आहे. बांधणीच्या ओढण्या देखील खूप प्रिय होत्या नं आपल्याला! असो. कुर्ती style tops, western tops यांच्या गर्दीत आपली ही सखी कुठेतरी लपून गेली.
    असेच सुंदर लिहीत जा. तुझ्या पुढील लेखाची आतुरतेने प्रतीक्षा असेल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you Sheetal..आपल्या आठवणी किती सारख्या आहेत..घडी करून प्रेस करताना जळलेल्या ओढणी बद्दल वाचून एकदम हसू आलं..😄 glad you liked the blog..

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!