तुझे गीत गाण्यासाठी....

लहानपणी माझ्याकडे एक रांगोळीचं पुस्तक होतं. ठिपक्यान्च्या रांगोळ्या असलेलं. पुस्तकाच्या कव्हर वर आई आणी तिच्या दोन मुलांचे चित्र होतं. भर पहाटे उठून अभ्यंगस्नान करून रांगोळी काढणारे मायलेक. येऊ घातलेली दिवाळीची पहाट सुचवणाऱ्या तांबड्या निळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे मुखपृष्ठ मला खूप आवडायचं. रात्रभर लुकलूक करून थकलेल्या चांदण्यांचा पडदा बाजूला सारून आकाशात अलगद अवतारणारी रंगीबेरंगी, उत्सुकतेची ती पहाट मी अजूनही शोधते आहे. शांत स्तब्ध आसमंतात असे निळे गुलाबी वारे कधी कुठे सुटत असतील का? आकाशाचं आणि माझं नातं घट्ट करण्यात ह्या लहानश्या पुस्तकाचा मोठा हातभार आहे.


मला जवळून ओळखणाऱ्या सगळ्यांना माझं आभाळप्रेम ठाऊक आहे. शहरातल्या गलबलाटात कुठूनतरी दिसणारा आभाळाचा लहानसा तुकडापण मला पुरतो. संध्याकाळी रपेट मारायला गेलं की आता नेहमी भेटणारे लोक देखील जरा बिचकून चालतात. वर आकाशात बघून समोर चालणारी ही वेडगळ बाई चुकून धडकायला नको म्हणून. तासंतास निरखलं तरी दररोज नव्याने भेटणारे हे आकाश मला दिसत तसं सगळ्यांना दिसत असेल का? मला रोज नव्याने भुरळ घालणारे हे आकाश इतरांच्या मनात अशीच भावनांची उचंबळ करत असेल का?  शिवाय त्या आकाशामार्फत 'तो' भेटतो त्याची ओढ मनाला निराळीच लागलेली असते. त्याची कलाकुसर बघायची असेल तर, त्याचे आभार मानायचे असतील तर किंवा त्याच्यापर्यन्त पोचण्यासाठी पण आभाळ निरखण्याला पर्याय नाही. आता माझं हे वेड ओळखून तो पण रोज माझ्यासाठी नवीन मैफिल सजवतो.

दिवसभर काम करून दमून घरी जाणाऱ्या सूर्याला निरोप द्यावा तो त्यानेच. सूर्याचे आभार मानायला तो रंगांची लयलूट घेऊन येतो. सूर्याची पण वेगळी कथा..कधी एखाद्या पहाडाआड लुप्त होतानाची त्याची हुरहूर जशी मनात उमटते तशीच मावळतीला एखाद्या नदी अगर समुद्राच्या पाण्यात हेलकावे घेणारे त्याचे प्रतिबिंब मनात चमकत राहतं. सूर्य तसा लहरी! एखाद्या धूसर संध्याकाळी लिमलेटच्या गोळीसारखा दिसणारा हा सुहृद, दुसऱ्या एखाद्या सायंकाळी रागावल्यासारखा पश्चिमेला धगधगती भट्टी उघडून बसतो. दिवसभर एकटा काम करून कंटाळलेला सूर्य त्याच्याकडे तक्रार करतो. चंद्राबरोबर चांदण्या असतात, सूर्यावर खरंच जरा जास्त काम पडतं. मग तो नीट समजूत घालून सूर्याला परत पाठवतो. जाताना काही भिरभिरणारी पाखरं आणि ही रंगांची शिदोरी त्याच्या सोबतीला देतो. ह्या सगळ्यात सर्वात अधिक फायदा माझा होतो. 
 
एखादी संध्याकाळ अशी येते की सूर्याला निरोप देऊन तो केशराच्या पाण्यात आकाश स्वच्छ धुवून घेतो. त्या आकाशावर गोड गुलाबी लाली चढली की ठेवणीतल्या चांदण्या बाहेर काढतो. ह्या चंदेरी फुलांना घट्ट सायीच्या दुधात लखलखीत न्हाऊमाखू घालून मग हळूहळू आभाळात पेरतो. त्या चमकायला लागेस्तोवर अवकाश गडद निळ्या रंगाचा शेला पांघरायला लागते. नेमका त्याच वेळी चन्द्र आकाशात कुठूनसा अवचित अवतीर्ण होतो. हा उगवता चंद्र मला नेहमी थोडासा भेसूर वाटत आलाय. तो सूर्यासारखा हळूहळू वर चढत नाही. एकदम दिसायला लागतो आणि त्यावेळी तो आकाराने थोडासा मोठा आणि लालसर दिसतो. मनमौजी स्वभावाचा हा चंद्र, रोज वेगवेगळ्या स्थानावर उगवतो. दर दिवशी स्वतःच्या एका पत्नीच्या महालात जाणारा हा चंद्र, अश्विनी, भरणी, आर्द्रा, रोहिणी, अनुराधा, रेवती असा सत्तावीस नक्षत्रांचा प्रवास सत्तावीस दिवसात पूर्ण करतो आणि त्या प्रवासामार्फत पृथ्वीवर मनुष्याचे ज्योतिष्याचे आडाखे तयार करत जातो.  पण हा बेभरवश्याचा आणी रोज लहानमोठा होणारा चन्द्रच चांदण्यांचा खास लाडका! शुक्राची चांदणी असेल तर ती चंद्राबरोबर लाडीगोडी लावत अंमळ जास्त लकाकते. 'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले...' हळूहळू गडद होणाऱ्या त्या रात्रीशी हितगूज करत मी भानावर येते. त्याने ओंजळीतून उधळलेल्या हसऱ्या ताराफुलांना निरोप देत माघारी वळते.

अवचित एखाद्या दिवशी त्याला चित्रकारी करायची हुक्की येते. 'आज गोकुळात रंग खेळतो हरी..' गुणगुणत तो अक्षरशः मुठीमुठीने आभाळात रंगांची उधळण करतो. लाल, केशरी, निळ्या, जांभळ्या रंगांची रंगपंचमी साजरी होते. अष्टगंधाच्या अगणित सुगन्धी लाटा आकाशात उसळतात. ही किमया मी स्तब्ध होऊन बघत रहाते आणि मग थकून, दोन्ही हात झटकत, डोळ्यांवरच्या बटा बाजूला सारत, त्याने भुवया उडवत विचारलं की हसत 'thumbs up' करत त्याच्या कारागिरीला दाद देते.

एखादा दिवस त्याच्यातला खट्याळ मुलगा जागा होतो. निळ्याशार आसमंतात, तो मजेत पांढऱ्या रंगाचे कापसाचे पुंजके सोडतो. हे पुंजके कधी एखाद्या दाट मऊ दुलईसारखे दिसतात, कधी गुबगुबीत सशांसारखे, तर कधी एखाद्या काडीवर साखर जाळून तयार केलेल्या cotton candy सारखे! त्या पांढऱ्या शुभ्र ढगांच्या आडून गोड हसणारा बालकथेतला गोलमटोल सूर्य अचानक बाहेर येऊन डोळे मिचकावेल असं वाटतं. तेव्हा त्याच्याएवढीच लहान होऊन उडून आकाशात पोचून एखाद्या फावड्याने ते शुभ्र ढग नीट बाजूला गोळा करून ठेवावे किंवा ती दुलई पांघरून गुडूप झोपावं अशी तीव्र इच्छा मला ह्या वयातही होते.

कधीतरी त्याच्या सखीबरोबर झालेल्या वादावादीतून त्याचा वैताग बाहेर येतो. अबोल भावनांचा कळकट राखाडी गुंता आणि त्यामागून डोकावणारी पिवळ्या रंगाची मलूल झालर. मावळतीचा सूर्य मग बहुतेक दोघांचा समेट घडवायला सरसावतो. ती पिवळसर छटा पुन्हा एकदा हलके हलके गुलाबी होऊ लागली की मग मी निश्वास सोडते.

त्याच्या सुट्टीच्या दिवशी मात्र पंचाईत होते. चन्द्र, सूर्य, तारे सगळ्यांना सुट्टी देत हा मजेत मळकट दुलई घेऊन दिवसभर पडून राहतो. कंटाळलेला, कर्दमलेला! त्या आकाशाला नाव पण कस दिलंय...'मळभ '. नावातच आळस आहे. हे दिवस माझ्यासाठी खास कठीण. बघावं तिकडे अस्वस्थ करणारा विचित्र मातकट प्रकाश. एकदाचा त्याचा कंटाळा पाऊसस्वरूपात वाहून गेला आणि रोजचे सोयरे परत दिसायला लागले की मग काय तो जीवात जीव येतो.

त्या परमेश्वराने रचलेला हा सोहळा कॅमेऱ्यात पकडायची निष्फळ धडपड मी कित्येक वेळा केली आहे. पण ह्या कलाकृती खऱ्या अर्थाने गाजतात त्या माझ्या गात्रांमध्ये, रुजतात त्या माझ्या गाभ्यामध्ये, भिनतात त्या माझ्या नसांमध्ये.

कधीतरी सप्तरंगी शांत कमानीच्या आवरणात बसलेला ध्यानमग्न तो, कधी दुःखाला असलेली सुखाची सोनेरी झालर दर्शवणारा तो. चराचरात वास करणारा तो, नद्या, झऱ्यांमधून वाहणारा तो, तिन्ही लोकांतून पाझरणारा तो, पदोपदी साथ देणारा तो!  माझ्यासाठी दिगंतापर्यंत पसरलेला आणि त्याच्या पोटी असलेली ही खोल आभाळमाया माझ्यापर्यंत पोचवणारा तो, त्याच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची क्षमता नसलेल्या मला सांभाळून घेणारा तो, मला स्वतःबरोबर ह्या अभूतपूर्व यात्रेला नेणारा तो, त्याचे गाणे गाण्यासाठी...सूर लावू दे, सूर लागू दे!


तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे ...

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे...

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी












टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!