राम आयेंगे!

गेल्या महिन्याभरापासून गळ्याशी आलेला आवंढा सुटता सुटत नाहीये. इतकं की तो ताण दिवसातून कितीतरी वेळा डोक्याच्या शिरा आवळून टाकतो. वाचता वाचता डोळे भरून वाहायला लागतात. टी व्ही बघता बघता दाटून येतं. मनात कुठेतरी खूप वर्ष थोपवून ठेवलेला बांध ढासळून आता ते थबकलेलं पाणी भरभरून वाहतंय. मुळात तो बांध मनात कुठे, कसा, कधी उभा झाला ह्याचीच कल्पना नव्हती. मात्र आता त्यातून उसळणारं पाणी लपवायची धडपड निष्फळ ठरते आहे.

कित्येक विचार आहेत, मनात गर्दी करून. त्यांची सुसंगत मांडणी कठीण आहे. खूप बोलायचंय पण शब्द खुंटलेत. त्यातले काही निसटलेले शब्द मधेच डोळ्यावाटे बाहेर पडतात. तस म्हटलं तर राम माझ्या आयुष्यात असून सुद्धा नव्हता. त्याची पूजा उघडपणे मांडायची सर्वसामान्यांना मुभा होतीच कुठे? तसा प्रयत्न केला तर कधी त्याच्या साध्या भोळ्या भक्तांना अतिरेकी ठरवलं गेलं, तर कधी मूढ, मागासलेले म्हणून त्यांची अवहेलना झाली. राजकारणाच्या कोलाहलात एकीकडे त्याचं देवपण हिरावून घेतलं आणि दुसरीकडे त्याच्या भक्तांची भक्ती कायम प्रश्नांकित ठेवली गेली. त्याचं 'रामत्व' कोर्टकचेर्यांच्या बासनात गुंडाळून ठेवल्या गेलं. कस्पटासमान असलेल्या मनुष्याकडून एखाद्या दैवी शक्तीचा पृथ्वीतलावर इतर कुठेही झाला नसेल एवढा त्याचा अपमान केला गेला. त्याचं अस्तित्व नाकारलं, त्याच्या भक्तांची गळचेपी केली गेली, तरी ते रामत्व वृद्धिंगत कसं होत राहिलं? कारसेवा किंवा रामजन्मभूमी च्या कार्यासाठी काहीही हातभार न लावलेल्या माझ्यासारखीच्या मनात तो रामांकुर कसा फुटला? आणि कसा फोफवला? आज त्याच्या परतून येण्याच्या कल्पनेने मी इतकी भावनाविवश कशी झाले?

उत्तर सरळ आहे. ते रामत्व आपल्या जनुकीय किंवा अनुवांशिक स्मृती मध्ये हजारो वर्षे अथक वाहतंय. त्याची दखल घेणं, ओळख पटवून घेणं ही सर्वस्वी व्यक्तिगत निवड आहे. पण ते जनमानसात व्यापून राहिलंय, ह्याबद्दल दुमत नको. ज्यांची स्मृती अजून जागृत व्हायची आहे, त्यांना हे  राममंदिर सहाय्यक ठरेल. ज्यांची झाली आहे, त्यांना क्षणभर त्याच्या साकार स्वरूपामध्ये विरघळण्याची संधी मिळेल.

भक्तीला तर्क नसावा. तर्क म्हणजे काहीसा अविश्वास, अहंकार. भक्ती आणि अविश्वास एकत्र कसे नांदणार? भक्ती म्हणजे दैवताच्या चरणी अर्पिलेली निव्वळ शरणागती! ह्या भक्तीच्या जोरावर एखादा समाज, पाचशे वर्ष अनवाणी चालतो, एखादा रामनामी समुदाय अंगभर रामनामाचे गोंदण करून घेतो, एखादी राममयी 30 वर्षे मौनव्रत घेते, एखादी वृद्धा वयाच्या साठाव्या वर्षी अंगावर गोळी झेलते, एखादा समूह दिवसरात्र पायपीट करून त्याच्यासाठी स्वत:च्या डोक्यावर वाहून भेटवस्तू आणतो. एखादा भाववेडा त्याला भेटायला डोक्यावर चालत येतो, एखादा दूरच्या गावाहून त्याला भेटायला येताना, रस्त्यात रांगोळी काढत येतो!

धर्मो रक्षती रक्षित:! धर्म जागवला तर राम जागृत राहील, तो जागृत राहिला तर आपण जगू. नराला नारायणामधे गुंतवून ठेवणाऱ्या आणि नारायणाला नराच्या भक्तीत अडकवणाऱ्या ह्या अश्या संस्कृतीचं काय करायचं? जिथे देव आणि भक्त एकमेकांशी  तादात्म्य पावलेत, एकरूप झालेत, अश्या संस्कृतीचा ऱ्हास कसा व्हायचा? राम कायम अक्षर, अढळ होता, आहे आणि आता हजारो वर्ष तसाच काळाचं शिवधनुष्य समर्थपणे पेलत उभा ठाकेल. त्याच्यासमोर असलेलं आपलं टीचभर अस्तित्व त्याच्यातच कधीतरी विरुन जाईल आणी त्याच्या सगूण साकार रूपातून त्याच्या लोचनांनी आपण हे जग अनंतकालापर्यन्त बघू.

22 जानेवारीचा दिवस मोठा आहे. तुमचा माझा सगळ्यांचा आहे. मनात जोजवलेल्या रामाचे मोकळेपणे स्वागत करण्याचा आहे. घराघरातून आवर्तलेल्या रामरक्षेचा आहे, शतकांपूर्वी देश सोडून अतिदूर प्रांतांमध्ये मजूरी करायला गेलेल्या भाबड्या लोकांचा आणि त्यांनी छातीशी कवटाळून जपलेल्या रामचरितमानसाचा आहे. घरोघरी सुंदरकांड पठण करणाऱ्या समाजाचा आहे, आपल्या स्वरलीलेतून रामाचे गुणगान करणाऱ्या लतादीदीचा आहे. गीत रामायणातून मनामनाचा सेतू बांधणाऱ्या गदीमा आणि बाबूजींचा आहे. 'राजाराणीची नको चिऊकाऊची नको, गोष्ट सांग मला आता रामाची, झाली आता वेळ माझ्या झोपेची' गाणाऱ्या चिमुकल्यांचा आहे, स्मृतिभ्रंश झाल्यावरही फक्त "कौसल्येचा राम" हे गाणाऱ्या माझ्या आजीचा आहे.

रामाच्या मागोमाग सीतेचं सत्त्व येईल, लक्ष्मणाचं समर्पण येईल, हनुमन्ताची भक्ती येईल, कौसल्येचं वात्सल्य येईल, भरताचा त्याग येईल. रामराज्य ह्यापेक्षा वेगळं काय असू शकेल?

त्याच्याशी माझी ह्या जन्मी सदेह भेट होईल की नाही ते ठरवायची जबाबदारी त्याचीच. तोवर मी मला मिळालेल्या चिमूटभर अक्षता जपून ठेवणार. युगायुगातून एकदा घडणाऱ्या  ह्या सोहळ्याचं आणि रामाच्या आणि माझ्यातल्या अतूट दुव्याचं प्रतिक म्हणून..

जय श्री राम!🙏🏻🙏🏻 


टिप्पण्या

  1. फारच उत्कृष्ठ आणि सुंदर लिहिले आहे
    जय श्री राम

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर शब्द व त्यांची मांडणी
    माझ्या कडे शब्दच नाही शलू इतके सुंदर लिहिलस

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौसल्येचा राम

आठवणीतली गाणी

अक्षरांशी जडले नाते!!