लखलख चंदेरी...
माझ्या आईकडे एक जुनी भरजरी शाल होती. कोणीतरी भेट दिलेली. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेली ही पहिली भरजरी शाल! सोनेरी, निळ्या, जांभळ्या रंगाच्या रेशमाने विणलेल्या ह्या शालीचं मला खूप अप्रूप होतं. जपून ठेवलेली ही शाल फक्त सणासमारंभाला बाहेर निघत असे. तिचा मुख्यत्वे उपयोग औक्षण करताना, ओवाळताना पाटावर अंथरायला करत असू. ती भरजरी शाल ही माझी दिवाळीची पहिली आणि खूप जवळची आठवण आहे. ती शाल पेटीबाहेर निघाली की दिवाळी आल्याची नांदी मिळायची. तिला नीट इस्त्री करून निगुतीने जतन करून ठेवायचो. कालपरत्वे ती कोपऱ्यातून विरायला लागली. मग ती विरलेली बाजू दृष्टीस पडू नये म्हणून नेमकी गुंडाळून आम्ही वापरायला लागलो. दिवाळी पण अशीच! भरजरी!! मनात असलेली दुःख, चिंता, काळज्या क्षणभर दुमडून साजरी करायची. तिचं स्वरूप आता बदललंय. लहानपणी ती ५ दिवस मला मी राजकन्या असल्यासारखं भासवायची. त्या भरजरी शालीमार्फत, मोती साबणाच्या गुलाबाच्या सुगंधातून, भल्या पहाटे उठून केलेल्या औक्षणातून, आणि माझ्या आंघोळीच्या वेळी बाहेर ताईने उडवलेल्या मोठ्ठया आवाजाच्या फटाक्यातून, तिने माझे भरपूर लाड केले. हळूहळू ह्या स्वप्नांच्या राज्यातून...